Rada in the office of Jalaj Mahavitaran | वाळूजच्या महावितरण कार्यालयात राडा
वाळूजच्या महावितरण कार्यालयात राडा

ठळक मुद्दे खंडित वीजपुरवठ्यामुळे सहायक अभियंत्यास मारहाण


वाळूज महानगर : वीजपुरवठा सतत खंडित होत असल्यामुळे तसेच विद्युत ट्रान्सफार्मर दुरुस्त करण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या कारणावरून संतप्त ग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयात बुधवारी (दि.२२) दुपारी २ वाजेच्या सुमारास गोंधळ घातला. या वादावादीनंतर एकाने सहायक अभियंत्यास मारहाण करून कागदपत्रे फाडली.
वाळूज गावातील मच्छी मार्केट व लांझी टी पॉइंटजवळील विद्युत ट्रान्सफार्मर सतत नादुरुस्त होत असल्यामुळे वीजपुरवठा कायम खंडित होत आहे. तेथे उच्च क्षमतेचे ट्रान्सफार्मर बसविण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अशातच मंगळवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास वाळूज एमआयडीसीतील सीएट फिडरवरील केबर वायर जळाल्यामुळे वाळूज, रांजणगाव, जोगेश्वरी, कमळापूर, नारायणपूर आदी भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणने दुरुस्ती केल्यानंतर बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास या परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत झाला होता.

बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास वाळूजच्या मच्छीमार्केटमधील ट्रान्सफार्मर जळाल्यामुळे या ट्रान्सफार्मरची क्षमता वाढविण्याची मागणी करीत नागरिकांचे शिष्टमंडळ वाळूजच्या महावितरण कार्यालयात गेले होते. यावेळी सहायक अभियंता प्रमोद महाजन, उपकार्यकारी अधिकारी दत्तात्रय पुंडे, अनंत बरसावणे, बाळासाहेब पहाडे हे चर्चा करीत असताना अफरोज ऊर्फ भय्या पठाण (रा.वाळूज) कार्यालयात आला. अफरोजने सहायक अभियंता महाजन यांना तू आमच्या डीपीचे काम का करीत नाही, असा वाद घालत त्यांची कॉलर पकडून मारहाण केली. महाजन यांना शिवीगाळ करून त्यांच्या टेबलवरील कागदपत्रे फेकून दिली. काही कागदपत्रे फाडून टाकली. या प्रकरणी महाजन यांच्या तक्रारीवरून अफरोज ऊर्फ भय्या पठाण याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक संदीप गुरुमे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामचंद्र पवार पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Rada in the office of Jalaj Mahavitaran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.