मराठवाड्यात दीड लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 05:21 AM2019-11-16T05:21:43+5:302019-11-16T05:21:50+5:30

परतीच्या जोरदार पावसाने शेती व पिकांचे मोठे नुकसान झाले.

Rabbi sowing on one and half lakh hectares in Marathwada | मराठवाड्यात दीड लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी

मराठवाड्यात दीड लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी

googlenewsNext

प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : परतीच्या जोरदार पावसाने शेती व पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र, दु:ख विसरत आता पुन्हा नव्या जोमाने बळीराजाने रब्बी हंगामाची तयारी सुरू केली आहे. मराठवाड्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र ८ लाख १६ हजार ४२९ हेक्टर इतके आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ४५ हजार ३३१ हेक्टरवर म्हणजेच १७.१८ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. यंदा पाण्याची उपलब्धता वाढल्याने सरासरीपेक्षा १ लाख हेक्टर पेरणी क्षेत्र वाढू शकते, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
यंदा मराठवाड्याने पावसाळ्यात सुरुवातीला कोरडा दुष्काळ आणि उत्तरार्धात ओला दुष्काळ अनुभवला. पहिल्यांदाच अशी परिस्थिती पाहावयास मिळाली. आॅक्टोबर महिन्यात पडलेल्या परतीच्या पावसाने यंदा रब्बी हंगामातील पेरणीला उशिरा सुरुवात झाली. सरासरी ४ लाख ९२ हजार ७८९ हेक्टरपैकी १ लाख १७ हजार ३९३ हेक्टर म्हणजेच अवघी २३.८२ टक्के पेरणी झाली आहे. यामुळे ज्वारीचे क्षेत्र यंदा घटणार हे निश्चित झाले आहे. बीड जिल्ह्यात ३० टक्के ज्वारी पेरणी पूर्ण झाली आहे. खरिपात मक्याला आधी लष्करी अळीचा व नंतर परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे मका पेरणी कमी होऊ शकते. ३ लाख १८४ हेक्टर पैकी ३,६५७ हेक्टर (१२.१३ टक्के) क्षेत्रावर मका पेरणी झाली. यातही औरंगाबाद, जालना व बीड मिळून १२.३६ टक्के, तर लातूर, उस्मानाबाद व हिंगोली मिळून ३.२२ टक्के पेरणी झाली. हरभऱ्याच्या पेरणीचा काळ चालू महिना अखेरपर्यंत असून, १ लाख ६३ हजार ३६० हेक्टर पैकी २० हजार ४०६ हेक्टरवर (१२.४९ टक्के) पेरणी झाली आहे.
।भूजलपातळी वाढली
यंदा मराठवाड्यातील भूजलपातळी वाढली आहे. विहिरी, तलाव, धरणात पाणीसाठा मुबलक आहे. यामुळे गव्हाची पेरणी वाढू शकते. शेतकरी डिसेंबरअखेरपर्यंत गव्हाची पेरणी करू शकतात. सरासरी १ लाख १९ हजार ७७ हेक्टरवर गव्हाची पेरणी होते. आतापर्यंत ३ हजार ७५६ हेक्टरवर (३.१६ टक्के) पेरणी झाली आहे. तृणधान्याची पेरणी ३३ टक्क्यांपर्यंत झाली.
मागील वर्षी दुष्काळ होता. परिणामी, मराठवाड्यात सरासरी ८ लाख १६ हजार ४२९ हेक्टरपैकी अवघ्या २ लाख ८४ हजार हेक्टरवर रबीची पेरणी झाली होती. मात्र, यंदा परतीच्या पावसाने परिस्थिती बदलली आहे. सरासरीपेक्षा १ लाख हेक्टर म्हणजे ९ लाख हेक्टरवर पेरणी होईल, असा अंदाज आहे.
- एस. के. देवकर, विभागीय कृषी सहसंचालक, औरंगाबाद

Web Title: Rabbi sowing on one and half lakh hectares in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.