लॉकडाऊननंतरची स्थिती : भाडे परवडत नसल्याने सुमारे ४०० व्यापाऱ्यांनी खाली केली दुकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 01:53 PM2020-08-08T13:53:18+5:302020-08-08T14:01:14+5:30

आजघडीला शहरात ३० हजार व्यापारी आहेत. त्यातील १८ हजार व्यापारी किरायाच्या दुकानात व्यवसाय करतात.

Post-lockdown situation: About 400 traders closed down their shops due to unaffordable rent | लॉकडाऊननंतरची स्थिती : भाडे परवडत नसल्याने सुमारे ४०० व्यापाऱ्यांनी खाली केली दुकाने

लॉकडाऊननंतरची स्थिती : भाडे परवडत नसल्याने सुमारे ४०० व्यापाऱ्यांनी खाली केली दुकाने

googlenewsNext
ठळक मुद्देदुकानमालक-व्यापाऱ्यांमध्ये भाड्यावरून वाढले वादलॉकडाऊनमध्ये व्यवसाय बंद व आता थंड व्यवहार, यामुळे भाडे देणे परवडत नाही

औरंगाबाद : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने तब्बल ७५ दिवस लॉकडाऊन केले होते. या काळात दुकाने बंद होती. त्यानंतर अनलॉक सुरू झाले. दुकानाचे शटर उघडले; पण अजूनही काही व्यवसायांची परिस्थिती अशी आहे की, भाडे देण्यापुरतीही आर्थिक उलाढाल होत नाही. अशात दुकानमालकांनी भाड्यासाठी व्यापाऱ्यांकडे तगादा लावला आहे. लॉकडाऊन काळातील  पूर्ण किंवा अर्धे भाडे माफ करा, अशी मागणी भाडेकरू व्यापारी करू लागले आहेत. यामुळे शहरात दुकानमालक व व्यापाऱ्यांत वाद होत आहेत. हे वाद आता जिल्हा व्यापारी महासंघापर्यंत जाऊन पोहोचले आहेत. 

कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था कोलमडून गेली आहे. त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर कमी-अधिक प्रमाणात झाला.   २२ मार्चपासून लॉकडाऊनला सुरुवात झाली आणि  ४ जूनपर्यंत लॉकडाऊन सुरू होते. म्हणजे ७५ दिवस दुकाने बंद होती. या काळात केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू होत्या. ५ जूनपासून अनलॉक सुरू झाले. त्यातही ‘पी वन, पी टू’चा नियम लावल्याने एक दिवसआड दुकाने उघडावी लागली. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन, पुन्हा शहरात १० ते १८ जुलैदरम्यान लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर मात्र उलाढाल वाढली असली तरीसुद्धा अजूनही बाजारात उभारी आलेली नाही. 

महिना ६० हजारांपेक्षा अधिक भाडे असणाऱ्या दुकानदारांना भाडे निघेल एवढासुद्धा व्यवसाय होत नसल्याचे दिसून आले. आजघडीला शहरात ३० हजार व्यापारी आहेत. त्यातील १८ हजार व्यापारी किरायाच्या दुकानात व्यवसाय करतात. लॉकडाऊनमध्ये व्यवसाय बंद व आता थंड व्यवहार, यामुळे भाडे देणे परवडत नसल्याने शहरात  सुमारे ४०० व्यापाऱ्यांनी दुकान रिकामे केले. त्यातील १०० व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय गुंडाळून ठेवला. उर्वरित व्यापाऱ्यांनी दुसऱ्या भागात दुकान थाटले. अनेक व्यापारी असे आहेत की, ते अजून तग धरून आहेत. मात्र, त्यांच्यासमोर एप्रिल, मे महिन्याचे भाडे कसे भरावे, असा यक्षप्रश्न उभा राहिला आहे. दुकानमालकांनी भाडे वसुलीसाठी तगादा लावला आहे. भाडे भरा नाही तर दुकान खाली करा, अशी भूमिका दुकानमालकांनी घेतल्याने वाद सुरू झाले आहेत. 

सिडकोतील कॅनॉट प्लेस, पैठणगेट, गुलमंडी, औरंगपुरा, रंगारगल्ली, मछलीखडक, सिटीचौक, सराफा मार्केट, भांडी मार्केट यासह हडको, जवाहर कॉलनी आदी भागांतील व्यापारी जिल्हा व्यापारी महासंघाकडे तक्रारी घेऊन येत आहेत. भाड्यासंदर्भातील वाद मिटवा, अशी मागणी केली जात आहे. येत्या काळात ‘भाड्याचे’ प्रकरण पोलिसांत जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही भाडेकरू दुकानदारांनी मार्च, एप्रिल, मे महिन्याचे भाडे माफ करावे, यासाठी  न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी वकिलांशी चर्चा करणे सुरू केले आहे. सिटीचौकातील व्यापाऱ्यांनी सांगितले की, आम्ही जून, जुलैचे भाडे दिले; पण आमचे मार्च, एप्रिल, मेचे भाडे थकले असून, दुकानमालक दसरा, दिवाळीत आम्हाला दुकान खाली करण्यास सांगतील. आता व्यापारी महासंघाने मध्यस्थी करावी, अशी मागणी आम्ही केली आहे. 

दुकानमालक व भाडेकरूंनी वाद सोडवावा
महासंघाकडे वेगवेगळ्या भागांतील व्यापाऱ्यांच्या दुकान भाड्यासंदर्भातील तक्रारी येऊ लागल्या आहेत. मात्र, दुकानमालक व व्यापाऱ्यांनी आपसात समजूतदारीने वाद सोडवावा. 
- जगन्नाथ काळे, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ

मालमत्ताकर, वीज बिल माफ करावे
महानगरपालिकेने २०० कोटी रुपयांच्या मालमत्ताकरापैकी १०० टक्के मालमत्ता कर माफ करावा, त्यासाठी राज्य सरकारकडून अनुदान घ्यावे. महावितरणाने ५० टक्के वीज बिल माफ करावे, तसेच दुकानमालकांनी भाडेकरू व्यापाऱ्यांचा सहानुभूतीने विचार करून लॉकडाऊन काळातील अर्धे भाडे माफ करावे व उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने घ्यावी. 
- लक्ष्मीनारायण राठी, महासचिव, जिल्हा व्यापारी महासंघ

महासंघाने मध्यस्थी करावी
सध्या शहरात १८ हजार दुकाने भाड्याने देण्यात आली आहेत. त्यातील अनेक दुकानमालक व भाडेकरू व्यापारी यांच्यात लॉकडाऊन काळातील भाड्यावरून वाद सुरू झाले आहेत. हे वाद मिटवण्यासाठी व्यापारी महासंघाने मध्यस्थी करावी. कारण, दुकानाचे भाडे, लाईट बिल, कर्मचाऱ्यांचे पगार भरणे अनेक व्यापाऱ्यांना कठीण होऊन बसले आहे. 
- प्रफुल्ल मालानी, अध्यक्ष, मराठवाडा चेंबर 

Web Title: Post-lockdown situation: About 400 traders closed down their shops due to unaffordable rent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.