डॉक्टरांचा सेवाभाव; रेल्वेत प्रवाशावर उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी शुल्काचे ५ हजार रुपये नाकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 04:11 PM2019-12-11T16:11:33+5:302019-12-11T16:14:21+5:30

लासूर स्टेशन येथे डॉक्टरांनी धाव घेत प्रवाशावर औषधोपचार केले.

Physician social service; After treating the passenger on the train, the doctor rejected the charge of Rs 5 thousand | डॉक्टरांचा सेवाभाव; रेल्वेत प्रवाशावर उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी शुल्काचे ५ हजार रुपये नाकारले

डॉक्टरांचा सेवाभाव; रेल्वेत प्रवाशावर उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी शुल्काचे ५ हजार रुपये नाकारले

googlenewsNext
ठळक मुद्देप्रवासी रुग्णासह कुटुंबियांनी व्यक्त केली कृतज्ञताडॉ. गायकवाड यांनी आतापर्यंत २०० जणांना दिली मोफत सेवा

औरंगाबाद : नागपूर-मुंबई-नंदीग्राम एक्स्प्रेसने सोमवारी रात्री प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाची प्रकृती बिघडली. लासूर स्टेशन येथे डॉक्टरांनी धाव घेत प्रवाशावर औषधोपचार केले. धावत्या रेल्वेत मिळालेल्या उपचारामुळे कृतज्ञता व्यक्त करीत प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबियांनी शुल्क म्हणून ५ हजार रुपये देऊ केले. मात्र, डॉक्टरांनी ही रक्कम नाकारून सेवाभावाची भावना व्यक्त केली.

नंदीग्राम एक्स्प्रेसमधून मंगळवारी व्यंकटेश एस. (३८) हे कुटुंबासह प्रवास करीत होते. रात्री ८ वाजता जालना रेल्वेस्टेशन सोडल्यानंतर व्यंकेटश यांना अचानक पोटदुखीचा त्रास होऊन घाम येण्यास सुरुवात झाली. त्रास वाढल्याने कुटुंबातील महिला व लहान मुलांनी रडण्यास सुरुवात केली. ही माहिती मिळताच रेल्वेचे तिकीट तपासनिस मीणा यांनी वाणिज्य नियंत्रण कक्षाला माहिती देऊन औरंगाबादला डॉक्टर उपलब्ध करण्याचे कळविले. नंदीग्राम एक्स्प्रेस औरंगाबादला रात्रीच्या ९.४५ वाजता येऊन निघून गेली; परंतु डॉक्टर उपलब्ध झाले नाहीत.  

रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांना ही माहिती मिळाली. त्यांनी या घटनेविषयी नांदेड रेल्वे नियंत्रण कक्ष प्रमुख संजय सिंग यांना माहिती दिली. लासूर येथे उपचारासाठी नंदीग्राम एक्स्प्रेस अतिरिक्त ५ मिनिटे थांबविण्याची विनंती केली. मनमाड-सिकंदराबाद-अजिंठा एक्स्प्रेस ही पोटूळ रेल्वेस्टेशनला थांबवून नंदीग्राम एक्स्प्रेसला नॉन स्टॉप लासूरला नेण्यात आले. सदर रुग्णासाठी लासूरला रेल्वे सेना गोल्डन ग्रुप सदस्य मनीष मुथा यांना डॉक्टर उपलब्ध करण्याविषयी कळविण्यात आले. ही रेल्वे लासूरला पोहोचल्यानंतर डॉ. रणजित गायकवाड यांनी उपचार केले. डॉ. रणजित गायकवाड यांनी औषधोपचार केल्यानंतर रुग्णाच्या कुटुंबियांनी शुल्क म्हणून ५ हजार रुपये देऊ केले. मात्र, त्यांनी ते नाकारले. ‘काळजी करू नका, योग्य उपचार दिले आहेत’, असे त्यांनी सांगताच कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. नंदीग्राम एक्स्प्रेस १०.५० वाजता मुंबईकडे रवाना झाली.

२०० जणांना मोफत सेवा
डॉ. गायकवाड यांनी आतापर्यंत २०० जणांना मोफत सेवा दिली आहे. या सेवाकार्यासाठी रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी, रेल्वे सेना गोल्डन ग्रुप सदस्य मनीष मुथा, डॉ. रणजित गायकवाड, डॉ. अबरार शेख आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Physician social service; After treating the passenger on the train, the doctor rejected the charge of Rs 5 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.