Only 18 thousand registered for the one lakh 20 thousand seats of the Polytechnic | तंत्रनिकेतनच्या एक लाख २० हजार जागासाठी केवळ १८ हजार नोंदणी 
तंत्रनिकेतनच्या एक लाख २० हजार जागासाठी केवळ १८ हजार नोंदणी 

ठळक मुद्देएकूण जागेच्या १५ टक्केही नोंदणी नाहीसंचालनालयाने नोंदणीची मुदत २७ जूनपर्यंत वाढविली आहे.

- राम शिनगारे

औरंगाबाद : राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांना घरघर लागलेली असतानाच तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) प्रवेशालाही अल्यल्प प्रतिसाद मिळाल्याने येणाऱ्या काही दिवसांत तंत्रनिकेतनही बंद पडण्याची चिन्हे आहेत. राज्यात ४३२ तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये १ लाख २० हजारांपेक्षा अधिक जागा उपलब्ध असून, या जागांवर प्रवेशासाठी मंगळवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अवघ्या १८ हजार १७०  विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती समोर आली. अत्यल्प प्रतिसादामुळे तंत्रशिक्षण संचालनालयाने नोंदणीची मुदत २७ जूनपर्यंत वाढविली आहे.

राज्यात शासकीय आणि खाजगी तंत्रनिकेतन महाविद्यालयांची संख्या तब्बल ४३२ एवढी आहे. या महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रिया मागील वर्षापर्यंत सीईटी सेलकडे होती. मात्र, मागील वर्षी मोठ्या संख्येने जागा रिक्त राहिल्यामुळे यावर्षी ही प्रवेश प्रक्रिया तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय  वाघ यांनी विभागाकडे घेतली. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी २२ मे रोजी मुंबईत राज्यातील सर्व तंत्रनिकेतन महाविद्यालयांचे प्राचार्य, विभागप्रमुखांची बैठक उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव विजय सौरभ, संचालक डॉ. अभय वाघ यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी तालुकास्तरावर समुपदेशन करण्याचा निर्णय घेत १०० टक्के प्रवेशाची जबाबदारी महाविद्यालयांवर टाकण्यात आली. यासाठी तंत्रशिक्षण मंडळातर्फे १ कोटी रुपये खर्च करून करिअर मार्गदर्शन मेळावे घेणे बंधनकारक करण्याचा निर्णयही एप्रिलमध्ये घेण्यात आला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करूनही विद्यार्थ्यांचा प्रतिसाद अल्प मिळाला आहे. राज्यातील एकूण जागांच्या तुलनेत दहा टक्के विद्यार्थ्यांनीही प्रवेशासाठी आॅनलाईन नोंदणी केलेली नसल्याचे स्पष्ट झाले. यामुळे राज्यातील ४३ शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील उपलब्ध २० हजारही जागा यावर्षी भरणार नसल्याची भीती या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करतात. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयांतील जागा रिक्त राहणार असल्यामुळे ३८९ खाजगी तंत्रनिकेतन महाविद्यालये ओस पडण्याची भीतीही व्यक्त होत आहे.

नोंदणी केलेली विद्यार्थी संख्या
तंत्रशिक्षण संचालनालयाने तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाच्या प्रवेश नोंदणीला ३ जूनपासून सुरुवात केली होती. १८ जून रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत नोंदणी करण्याची मुदत होती. या मुदतीपर्यंत राज्यात एकूण ५४ हजार ९१८ विद्यार्थ्यांनी अर्ज घेतले. त्यातील ३४ हजार ३४४ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. त्यापैकी केवळ १८ हजार १७० विद्यार्थ्यांनीच प्रवेशाची कागदपत्रे अपलोड करून तपासून घेत कन्फर्म केले. यामुळे तंत्रनिकेतनच्या प्रवेश प्रक्रियेत मंगळवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत केवळ १८ हजार १७० विद्यार्थीच होते. उपलब्ध जागांचा आकडा १ लाख २० हजारांपर्यंत आहे. अल्प प्रतिसादामुळे डीटीई विभागाने नोंदणीची मुदत २७ जूनपर्यंत वाढविली असल्याचे सूत्रांनी सांगितले.


Web Title: Only 18 thousand registered for the one lakh 20 thousand seats of the Polytechnic
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.