लॉकडाऊन काळात १६० जणांची ३२ लाख ६० हजारांची ऑनलाईन फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 07:12 PM2020-06-27T19:12:44+5:302020-06-27T19:16:04+5:30

आॅनलाईन कर्ज मिळवून देतो, पेट्रोलपंपाची एजन्सी देतो, नोकरीच्या आमिषाने फसवणुकीच्या यात सर्वाधिक तक्रारी अधिक आहेत.

Online fraud of Rs 32 lakh 60 thousand of 160 people during lockdown | लॉकडाऊन काळात १६० जणांची ३२ लाख ६० हजारांची ऑनलाईन फसवणूक

लॉकडाऊन काळात १६० जणांची ३२ लाख ६० हजारांची ऑनलाईन फसवणूक

googlenewsNext
ठळक मुद्देसायबर सेलने ६ लाख ८५ हजार ७०० रुपये दिले परत मिळवूननोकरीच्या आमिषाने फसवणुकीच्या सर्वाधिक तक्रारी

औरंगाबाद : लॉकडाऊन काळात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात झाल्याचे समोर आले आहे. लॉकडाऊन शिथिल होताच जून महिन्यात  सायबर पोलीस ठाण्यात आॅनलाईन फसवणुकीच्या तब्बल १६० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यात सायबर गुन्हेगारांनी तब्बल ३२ लाख ६० हजार १०८ रुपये हडप केल्याचे समोर आले.

आॅनलाईन कर्ज मिळवून देतो, पेट्रोलपंपाची एजन्सी देतो, नोकरीच्या आमिषाने फसवणुकीच्या यात सर्वाधिक तक्रारी अधिक आहेत.
लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या.  व्यवसाय ठप्प झाले आहेत, अशा परिस्थितीत लोक कर्ज घेऊन संकटकाळावर मात  करण्याचा प्रयत्न करीत आहेत. याचाच गैरफायदा सायबर गुन्हेगारांनी घेण्यास सुरुवात केली आहे. हे गुन्हेगार  इंटरनेटवर आॅनलाईन झटपट कर्ज मिळेल अशा लिंक टाकतात. काही भामटे मोबाईलवर मेसेज पाठवून तुम्हाला मोठ्या रकमेचे  कर्ज मंजूर झाल्याचे कळवितात. त्यात त्यांचा मोबाईल नंबर असतो. त्यांच्या  मोबाईल नंबरवर अथवा लिंकशी संपर्क साधल्यानंतर फसवणुकीला सुरुवात होते.

गुन्हेगार अल्प व्याजदराने आणि अवघ्या काही दिवसांत कर्ज देण्याचे आमिष दाखवितात. कर्जाची फाईल तयार करणे, कागदपत्रांची पडताळणी करण्याची  कारणे सांगून त्यांच्या बँक खात्यात पैसे भरण्यास सांगून फसवणूक करतात. कर्ज मिळेल या आशेने सामान्य माणूस त्यांना पैसे देतो. मात्र, अनेक दिवस प्रतीक्षा करूनही ते कर्ज देत नाहीत आणि आरोपींनी मोबाईल बंद केल्याचे समजते. अशाप्रकारे कर्जाच्या आमिषाला बळी पडून फसवणूक झाल्याच्या  तक्रारी रोज सायबर पोलिसांकडे येत आहेत.  स्वस्तात ट्रॅव्हल पॅकेज देण्याच्या नावाखाली आॅनलाईन गंडविण्यात आल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या.  विविध फंडे वापरून ३२ लाख ६० हजार १०९ रुपयांची फसवणूक झाल्याच्या तब्बल १६० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. 


क्यूआर कोड पाठवून फसवणूक करण्याचा फंडा
नोकरी आणि व्यवसायाचे  आमिष दाखवून आॅनलाईन पैसे भरायला सांगून परराज्यातील भामटे राज्यातील बेरोजगारांची आॅनलाईन फसवणूक करीत आहेत. पेट्रोलपंपची एजन्सी देण्याच्या आमिषाने फसवणूक झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती सायबर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे यांनी दिली. त्यांनी सांगितले की, कोणतीही नामांकित कंपनी एजन्सी देण्यासाठी कायदेशीर करार  पूर्ण केल्यानंतर पैशाचा व्यवहार करीत असते.  ४क्यूआर कोड पाठवून स्कॅन करायला सांगून फसवणूक करण्याचा नवीन फंडा गुन्हेगार वापरत आहेत. क्यूआर कोड स्कॅन करताच बँक खात्यातून पैसे त्यांच्या खात्यात वर्ग होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. शिवाय ओएलएक्सवर चारचाकी वाहन स्वस्तात देण्याची जाहिरात टाकून फसवणूक केली जात आहे. आॅनलाईन वस्तू खरेदी करताना ती वस्तू घरी आल्यावर पैसे द्यायला हवे.  आॅनलाईन व्यवहार करताना काळजी घ्यायला हवी, असे पो. नि. बागवडे म्हणाल्या.

६ लाख ८५ हजार ७०० रुपये दिले परत मिळवून
शहर सायबर ठाण्यातील पोलिसांनी  केलेल्या जलद तपासामुळे महिनाभरात ६ लाख ८५ हजार ७०० रुपये तक्रारदारांना परत मिळवून देण्यात यश आले . फसवणूक झाल्यानंतर लगेच तक्रारदार ठाण्यात आल्यावर पैसे परत मिळविण्यासाठी तात्काळ पत्र व्यवहार करून भामट्यांच्या बँक खात्यातील रक्कम गोठविता येते . 

Web Title: Online fraud of Rs 32 lakh 60 thousand of 160 people during lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.