इंडस्ट्रियल ऑक्सिजनवरील कोरोना रुग्णांपासून ‘म्युकरमायकोसिस’ दूरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 06:27 PM2021-07-22T18:27:11+5:302021-07-22T18:29:44+5:30

Mucormycosis Cases : राज्यात ज्या ठिकाणी इंडस्ट्रियल ऑक्सिजन वापरण्यात आला, तेथे केवळ ३२ जणांना म्युकरमायकोसिस झाल्याचे समोर आले.

‘Mucormycosis’ away from corona patients on industrial oxygen | इंडस्ट्रियल ऑक्सिजनवरील कोरोना रुग्णांपासून ‘म्युकरमायकोसिस’ दूरच

इंडस्ट्रियल ऑक्सिजनवरील कोरोना रुग्णांपासून ‘म्युकरमायकोसिस’ दूरच

googlenewsNext
ठळक मुद्देइंडस्ट्रियल ऑक्सिजन वापरलेल्या ठिकाणी केवळ ३२ रुग्ण म्युकरमायकोसिस रुग्णांवरील अभ्यासातून स्थिती स्पष्ट

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यभरात म्युकरमायकोसिस या गंभीर आजाराला काेरोना रुग्णांना तोंड द्यावे लागले. या आजाराला इंडस्ट्रियल ऑक्सिजन हा मुख्यत्वे कारणीभूत असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. यासंदर्भात राज्यात केलेल्या एका अभ्यासात इंडस्ट्रियल ऑक्सिजनच्या तुलनेत नाॅन इंडस्ट्रियल, मेडिकल ऑक्सिजनवरील रुग्णांमध्ये ‘म्युकरमायकोसिस’चे प्रमाण अधिक आढळल्याचे समोर आले आहे.

राज्यात ज्या ठिकाणी इंडस्ट्रियल ऑक्सिजन वापरण्यात आला, तेथे केवळ ३२ जणांना म्युकरमायकोसिस झाल्याचे समोर आले. त्याउलट नाॅन इंडस्ट्रियल म्हणजे मेडिकल ऑक्सिजनवरील रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसचे प्रमाण जास्त राहिल्याचे सांगण्यात आले. कोरोनाच्या पहिल्या लाटेत बहुतांश ठिकाणी सिलिंडरमधील ऑक्सिजनचा वापर झाला. दुसऱ्या लाटेपर्यंत लिक्विड ऑक्सिजनची यंत्रणा ठिकठिकाणी उभी करण्यात आली. दुसऱ्या लाटेत रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज पडली. त्यामुळे उद्योगांना पुरवठा होणारा ऑक्सिजनही अनेक ठिकाणी रुग्णांसाठी वापरण्यात आला. लिक्विड ऑक्सिजन अधिक प्युअर असतो आणि तो रुग्णालये, उद्योग या दोन्ही ठिकाणी वापरला जातो. केवळ उद्योग आणि वैद्यकीयसाठी वापरण्यात येणारे सिलिंडर हे वेगवेगळे असतात, असे तज्ज्ञांनी सांगितले.

नाॅन इंडस्ट्रियल ऑक्सिजनचे अधिक रुग्ण
इंडस्ट्रियल ऑक्सिजनमुळे म्युकरमायकोसिस होत असल्याच्या चर्चेमुळे यासंदर्भात अभ्यास करण्यात आला; पण ज्या ठिकाणी इंडस्ट्रियल ऑक्सिजन वापरण्यात आला, तेथील अभ्यासात केवळ ३२ जणांना म्युकरमायकोसिस झाल्याचे समोर आले. त्याउलट ज्या लोकांना नाॅन इंडस्ट्रियल ऑक्सिजन वापरण्यात आला, त्यांना अधिक प्रमाणात म्युकरमायकोसिस झाल्याचे आढळले
- डाॅ. तात्याराव लहाने, माजी संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय

अनेक बाबी कारणीभूत
म्युकरमायकोसिस होण्यास इंडस्ट्रियल ऑक्सिजन कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. परंतु, त्यासाठी अनेक बाबी कारणीभूत आहेत. ह्युमिडिफायर न बदलणे, त्यासाठी साधेच पाणी वापरणे, अशी अनेक कारणे आहेत.
- डाॅ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक, औरंगाबाद

औरंगाबादेतील म्युकरमायकोसिस रुग्णांची स्थिती
एकूण रुग्ण- १,१६२
उपचार सुरू असलेले रुग्ण- १२३
रुग्णालयातून सुटी झालेले रुग्ण- ८९४
एकूण मृत्यू - १४५

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत औरंगाबादेत ऑक्सिजनची रोजची मागणी- ६० टन
इंडस्ट्रियल ऑक्सिजन हा ९९.५ टक्के प्युअर
लिक्विड ऑक्सिजन हा ९९.५ टक्के प्युअर.

Web Title: ‘Mucormycosis’ away from corona patients on industrial oxygen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.