शरीरात सर्वाधिक ताण डोळ्यांवर; ३० टक्के लोकांना ‘डिजिटल व्हिजन सिंड्रोम’चा त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 02:54 PM2020-01-16T14:54:04+5:302020-01-16T14:59:53+5:30

१८ वर्षांनंतर चष्मा लागत असे. आता ५ व्या, ६ व्या वर्षीही चष्मा लागत आहे.

most stress is on eyes; 30 % of people have 'digital vision syndrome' | शरीरात सर्वाधिक ताण डोळ्यांवर; ३० टक्के लोकांना ‘डिजिटल व्हिजन सिंड्रोम’चा त्रास

शरीरात सर्वाधिक ताण डोळ्यांवर; ३० टक्के लोकांना ‘डिजिटल व्हिजन सिंड्रोम’चा त्रास

googlenewsNext
ठळक मुद्देसंगणक, मोबाईलचा अतिवापर३० टक्के लोकांना ‘डिजिटल व्हिजन सिंड्रोम’

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : आधुनिक काळात संगणक, लॅपटॉप, मोबाईल, टॅब या आधुनिक इलेक्ट्रॉनिक गॅझेटमुळे अनेक कामे सोपी झाली आहेत. अनेक कामे तर त्याशिवाय अशक्य आहेत. त्यामुळे त्यांचा वापर करावाच लागतो. मात्र, ही साधने सध्या गरजेबरोबरच मनोरंजनाचीही झाली आहेत. म्हणजे त्यांचा अतिवापर वाढला आहे. त्यामुळे शरीरातील इतर अवयवांच्या तुलनेत डोळ्यांवर सर्वाधिक ताण येत आहे. या सगळ्यातून ३० टक्के लोकांना ‘डिजिटल व्हिजन सिंड्रोम’ला सामोरे जावे लागत असल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली.

नेत्रतज्ज्ञांकडे डोळ्याच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांमध्ये ‘डिजिटल व्हिजन सिंड्रोम’ आढळून येण्याचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. आयटी क्षेत्रासह संगणकाशी संबंधित कामे करणाऱ्यांना किमान ८ तास काम करावे लागते. तेव्हा संगणक, लॅपटॉपचा वापर करण्याशिवाय पर्याय नसतो. अशा वेळी काम करताना सतत स्क्रीनकडे पाहावे लागते. त्याबरोबरच संवादसाठी मोबाईल हे महत्त्वाचे साधन बनले आहे. संवादाबरोबर अनेक कामे मोबाईलमुळे अगदी काही मिनिटांत होतात. परंतु याच मोबाईलचा वापर मनोरंजनासाठीही वाढला आहे.  मोबाईलच्या स्क्रीनकडे सतत पाहण्याचा वेळ वाढला आहे. यालाच स्क्रीन टाईम म्हटले जात आहे. हा स्क्रीन टाईम कमीत कमी ३ ते ४ तासांवर गेला आहे. अनेकांचा वेळ यापेक्षा अधिक जातो. त्यातूनच डोळ्यांच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यालाच ‘डिजिटल व्हिजन सिंड्रोम’ म्हटले जात आहे.

वयाच्या ५ व्या वर्षी चष्मा
‘डिजिटल व्हिजन सिंड्रोम’मध्ये डोळे लाल होणे, डोळ्यांवर ताण येणे, डोळ्यातून पाणी गळणे, डोळ्यात काहीतरी टोचल्यासारखे वाटणे असा त्रास होतो. नेत्रतज्ज्ञांकडे येणाऱ्या १०० पैकी ३० जणांमध्ये हा त्रास दिसून येतो. यात ५० टक्के लहान मुलांचा समावेश असतो. पूर्वी १८ वर्षांनंतर चष्मा लागत असे. आता ५ व्या, ६ व्या वर्षीही चष्मा लागत आहे. कारण पालक मुलांना खेळण्यासाठी सर्रास मोबाईल, लॅपटॉप देतात. मैदानी खेळाकडे दुर्लक्ष होते. त्यातून डोळ्यांचे विकार वाढत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. 

स्क्रीन टाईम वाढला
जवळपास ३० टक्के लोकांमध्ये डिजिटल व्हिजन सिंड्रोम आढळून येत आहे. यामध्ये लहान मुलांचे प्रमाण ५० टक्के आहे. कमीत कमी ३ ते ४ तास  मोबाईल, संगणकाच्या स्क्रीनकडे (स्क्रीन टाईम) पाहिले जाते. संगणकाशी संबंधित काम करणाऱ्यांची वेळ यापेक्षा कितीतरी अधिक आहे.
- डॉ. मनोज सासवडे, नेत्ररोगतज्ज्ञ

काळजी घेतल्यास बचाव
संगणक, मोबाईलचा वापर वाढला आहे. त्यातून डिजिटल व्हिजन सिंड्रोमला सामोरे जावे लागत आहे. यामुळे डोळ्यांवर अनेक परिणाम होत आहे. परंतु योग्य ती काळजी घेतल्यास त्यापासून बचाव करणे शक्य आहे. स्क्रीनचा उजेड योग्य ठेवला पाहिजे. अंधारात संगणक, मोबाईलचा वापर टाळावा. संगणकावर काम करताना थोड्या थोड्या वेळेने इतरत्र पाहिले पाहिजे.
- डॉ. सुनील कसबेकर, अध्यक्ष, औरंगाबाद नेत्ररोगतज्ज्ञ संघटना

Web Title: most stress is on eyes; 30 % of people have 'digital vision syndrome'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.