रुग्णालयातील प्राध्यापकाची महिनोन्महिने ‘आरटीओे’त सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 07:27 PM2019-10-15T19:27:40+5:302019-10-15T19:29:05+5:30

रोज ५० पेक्षा अधिक वैद्यकीय प्रमाणपत्रांचे वाटप 

Monthly Service of the Hospital Professor at RTO | रुग्णालयातील प्राध्यापकाची महिनोन्महिने ‘आरटीओे’त सेवा

रुग्णालयातील प्राध्यापकाची महिनोन्महिने ‘आरटीओे’त सेवा

googlenewsNext
ठळक मुद्देघाटी प्रशासनाकडून अभय 

औरंगाबाद : वाहन चालविण्याचे परवाने नूतनीकरण करताना डॉक्टरांचे फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक असल्याने घाटी रुग्णालयातील सहयोगी प्राध्यापक अनेक महिन्यांपासून आरटीओ कार्यालयात बसून ५० रुपयांत अवघ्या ५ मिनिटांत चालकांना वैद्यकीय प्रमाणपत्रांची खैरात करीत होते. दररोज ५० पेक्षा अधिक वैद्यकीय प्रमाणपत्रे दिली जात होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.

घाटी रुग्णालयातील मेडिसीन विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. उद्धव खैरे यांच्याकडून गेल्या काही महिन्यांपासून आरटीओ कार्यालयात कोणत्याही तपासणीविना वैद्यकीय प्रमाणपत्र वाटपाचे काम होते. हा प्रकार ‘लोकमत’ने १४ आॅक्टोबर रोजी ‘घाटीतील प्राध्यापकांची आरटीओत सेवा’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून समोर आणला. वृत्त प्रकाशित होताच घाटी रुग्णालय आणि आरटीओ कार्यालयात एकच खळबळ उडाली. या अजब कारभाराविषयी अनेकांनी संताप व्यक्त केला. आरटीओ कार्यालयात नेहमीप्रमाणे सोमवारी अनेक एजंट वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी डॉ. खैरे उभे राहत असलेली जागा गाठत होते. परंतु त्यांना रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागत होते. कारण तेथे ते नव्हते. डॉ. खैरे हे मेडिसीन विभागातील पथक क्रमांक-५ चे प्रमुख होते. दर शुक्रवारी त्यांची ओपीडी असते. इतर वेळी वॉर्डांमध्ये राऊंड घेणे, रुग्णांची तपासणी करावी लागते. परंतु अनेकदा यासाठी ते वेळेवर हजर राहत नव्हते. त्यामुळे नर्सिंग स्टाफ आणि इतर डॉक्टरांवरच रुग्णसेवेची जबाबदारी पडत होती, असे सूत्रांनी सांगितले. 

आरटीओ कार्यालयात जूनमध्ये एका डॉक्टराचे नोंदणी क्रमांक बोगस असल्याचे समोर आले होते. बोगस नोंदणी क्रमांक टाकून वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याचा प्रकार सुरू होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर आरटीओ कार्यालयाने संबंधित डॉक्टराचे प्रमाणपत्र स्वीकारू नये, असे आदेश दिले होते. तेव्हापासून आरटीओ कार्यालयाच्या आवारात एकमेव डॉ. खैरे यांच्याकडूनच वैद्यकीय प्रमाणपत्र मिळत होते. त्यामुळे त्यांच्याकडे प्रमाणपत्रासाठी गर्दी होत होती. सकाळी ९ ते १२ या वेळेत ते आरटीओ कार्यालयात राहत असत. एका प्रमाणपत्रासाठी ५० रुपये आकारले जात असे. त्यातून दिवसाकाठी अडीच ते पाच हजार रुपये गोळा होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

चौकशी समिती नेमणार
या प्रकाराची प्रशासनाने गंभीर नोंद घेतली आहे. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर दोन दिवस सुटीवर आहेत. या प्रकाराविषयी वरिष्ठांना माहिती देऊन चौकशी समिती नेमली जाणार आहे, असे प्रभारी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी सांगितले.

Web Title: Monthly Service of the Hospital Professor at RTO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.