Moment of breath and breath for the University's progress. | ‘विद्यापीठाच्या प्रगतीसाठी क्षण न् क्षण व श्वास न् श्वास दिला’
‘विद्यापीठाच्या प्रगतीसाठी क्षण न् क्षण व श्वास न् श्वास दिला’

ठळक मुद्देबी. ए. चोपडे : पाच वर्षांत एकही सुटी घेतली नाही


औरंगाबाद : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेल्या या विद्यापीठाच्या प्रगतीसाठी, हे विद्यापीठ आंतरराष्टÑीय दर्जाचे व्हावे यासाठी मी माझा क्षण न् क्षण व श्वास न् श्वास दिला. या विद्यापीठात आत्मा घातला. अहोरात्र कष्ट घेतले. सोळा सोळा तास विद्यापीठासाठीच दिले. माझ्या कारकीर्दीच्या पाच वर्षांत मी कधी सुटीही घेतली नाही’ असे उद्गार आज येथे अत्यंत भावुक होत कुलगुरू प्रो. बी. ए. चोपडे यांनी काढले. ‘इथे काम करण्यासाठी पोषक वातावरण नाही’ असे मत नोंदवत त्यांनी ‘कुठे नेऊन ठेवलाय मराठवाडा आणि विद्यापीठही? ’ असा खडा सवालही उपस्थित केला.
औरंगपुरा येथील गोविंदभाई श्रॉफ कला अकादमीच्या सभागृहात चोपडे यांचा सेवागौरव झाला. यानिमित्त महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते चोपडे पती- पत्नीचा स्मृतिचिन्ह, गौरवपत्र व शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी स.भु. शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष व उद्योजक राम भोगले हे होते.
‘असा कुलगुरू होणे नाही’ .... चौकट
मी अमेरिका- इंग्लंडमध्ये शिकलो. ठरवलं असतं तर मी तिकडेच स्थायिकही होऊन गेलो असतो. तिकडचे शास्त्रज्ञ माझ्या संशोधनाचा आजही संदर्भ घेतात. पण मातृभूमीची सेवा करावी या ओढीने मी भारतात परतलो. मराठवाड्याबद्दल माझ्या मनात लहानपणापासूनच आकर्षण होतं. परराज्यातील तीन विद्यापीठांच्या कुलगुरूपदाच्या आॅफर्स असताना माझ्या मराठवाड्याची सेवा घडावी व बाबासाहेबांच्या नावाने असलेल्या विद्यापीठात जाऊन हे विद्यापीठ आंतरराष्टÑीय दर्जाचे बनवावे हे स्वप्न घेऊन मी औरंगाबादेत आलो. कुलगुरूच व्हायचं हे माझं ध्येय होतं. तो योगायोग नव्हता. ती माझी गुणवत्ता होती. कुणाच्या मेहरबानीने मी कुलगुरू झालो नाही, असे सांगत चोपडे यांनी दावा केला की, माझ्यासारखा कुलगुरू होणे नाही.
.........
केवळ महाभारत नव्हे तर खंड लिहावे लागतील.... वर्तमानपत्रात बातम्या यायच्या. माझी पत्नी रडायची. मी चुकीचं काहीही करीत नाही, असा धीर मी तिला द्यायचो. तिला खूप त्रास झाला. या पाच वर्षांत अनेक आरोप माझ्यावर झाले. मी विद्यापीठाच्या कामानिमित्त बाहेर असलो तरी बातम्या यायच्या कुलगुरू दौऱ्यावर! त्याच्या खोलात कुणी गेले नाही. विद्यापीठाला नॅकचा ‘अ’ प्लस दर्जा मिळालाच असता. पण आपल्याच लोकांनी तो मिळू दिला नाही, अशी खंत
चोपडे यांनी यावेळी व्यक्त केली. विद्यापीठाच्या पाच वर्षांच्या माझ्या कारकीर्दीतील अनुभवावर मी लिहिणार आहे. त्याचा महाभारत नव्हे तर त्याचे अनेक खंड होतील, असेही त्यांनी जाहीर केले.
कुलगुरू चोपडे यांनी पाच वर्षांच्या त्यांच्या कारकीर्दीतील जमेच्या अनेक बाजू मोजल्या. त्याची यादीच त्यांनी सांगितली. या पाच वर्षांत विद्यापीठातील २ हजार ५०० संशोधकांचे पेपर्स प्रसिद्ध झाले. सीएसआरमधून पंधरा कोटी रुपये मिळविले. विद्यापीठाचा अर्थसंकल्प १२५ कोटींनी वाढवला, या व इतर अनेक मुद्यांची आकडेवारीनिशी माहिती देत आपल्या कर्तृत्वावर प्रकाश टाकला.
प्रारंभी, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रा. डॉ. सर्जेराव ठोंबरे यांनी प्रास्ताविक केले. निवृत्त सनदी अधिकारी आर. के. गायकवाड, एमआयटीचे विश्वस्त मुनीष शर्मा आदींची भाषणे झाली. मंचावर नलिनी चोपडे, विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. साधना पांडे, जिल्हा बँकेचे प्रभारी अध्यक्ष दामूअण्णा नवपुते आदींची मंचावर उपस्थिती होती. कुलगुरू प्रो. बी. ए. चोपडे सेवागौरव समारंभ समितीचे डॉ. वाल्मीक सरवदे, प्रा. शंकर अंभोरे, प्रा. गजानन सानप, संजीवनी मुळे, श्रीमती खापर्डे, प्रा. साळुंके आदींनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रा. लहाने यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमात काही संघटनांकडून व्यत्यय निर्माण होण्याची शक्यता होती; परंतु शेवटपर्यंत तसे काही घडले नाही.
 


Web Title: Moment of breath and breath for the University's progress.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.