महापौर कुटुंबियांकडे थकला मालमत्ता कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 12:21 PM2019-07-27T12:21:00+5:302019-07-27T12:22:43+5:30

मग नागरिक कर कसे भरणार 

Mayor families did not pay property tax | महापौर कुटुंबियांकडे थकला मालमत्ता कर

महापौर कुटुंबियांकडे थकला मालमत्ता कर

googlenewsNext
ठळक मुद्देमहापालिका प्रशासनाने कराची विभागणीच केली नाही

औरंगाबाद : महापौर नंदकुमार घोडेले यांच्या कुटुंबियांकडे जाधवमंडी येथील दोन मालमत्तांचा तीन लाख रुपयांहून अधिक कर थकला आहे. जाधववाडी येथील घरावर तब्बल २ लाख ७९ हजार कर थकला आहे. याच भागातील आणखी एका मालमत्तेवर ६५ हजार कर थकला आहे. या दोन्ही मालमत्ता महापौरांचे बंधू रमेश घोडेले यांच्या नावावर आहेत. २०११ मध्ये त्यांनी एका ठिकाणी अपार्टमेंट बनवून फ्लॅटही विक्री केले. मालमत्तांचे पोटविभाजन करून प्रत्येकाला वेगवेगळा कर लावावा, अशी मागणी रमेश घोडेले यांनी मनपाकडे केली. आठ वर्षांमध्ये प्रशासनानेही विभाजन करून दिलेले नाही. त्यामुळे मूळ मालकावरच  कर लावण्यात येत आहे.

शहराचे प्रथम नागरिक असणाऱ्या महापौरांचे कुटुंब कर भरत नसतील तर सर्वसामान्य नागरिकांनी कर का भरावा, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.  जाधवमंडी येथे महापौरांची वडिलोपार्जित मालमत्ता आहे. सध्या ही मालमत्ता त्यांचे मोठे भाऊ रमेश यांच्या नावावर आहे. एक मालमत्तेवर अपार्टमेंट बांधून विकण्यात आले. दुसरी मालमत्ता आजही जशास तशी आहे. २०११ पासून कर भरलाच नसल्याची मनपा दप्तरी नोंद आहे.

३०० कोटी तिजोरीत येणे अपेक्षित
महापालिका प्रशासन मालमत्ता कराच्या वसुलीसाठी दरवर्षी जोरदार प्रयत्न करते. प्रशासनाच्या वसुलीसाठी अनेकदा जोरबैठकाही होतात. यातून काहीच साध्य होत नाही. दरवर्षी किमान ३०० कोटी रुपये मालमत्ता करातून मनपाच्या तिजोरीत येणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात ११० कोटी रुपयेच येतात. प्रामाणिकपणे स्वत:हून वॉर्ड कार्यालयात रांग लावून मालमत्ता कर भरणारे मोजकेच नागरिक आहेत. त्यामुळे मनपाला किमान १०० कोटी रुपये तरी मालमत्ता करातून मिळत आहेत. 

अनेक मालमत्तांचा वाद
वॉर्ड कार्यालयांकडे अनेक नागरिक मालमत्ता कराचे विभाजन करून द्यावे म्हणून अर्ज करतात. या अर्जावर प्रशासन अजिबात विचार करीत नाही. शहरातील नऊ झोन कार्यालयांमध्ये किमान १५ ते १८ हजार मालमत्तांना कर विभाजन करून हवे आहे.

वॉर्ड कार्यालयाला दिला अनेकदा अर्ज
जाधवमंडी येथील मालमत्ताकराचे विभाजन करून द्यावे, असे पत्र अनेकदा वॉर्ड कार्यालयाला देण्यात आले आहे. प्रशासन पोटविभाजन करून देण्यास तयार नाही. त्यामुळे मालमत्ताकर थकला आहे. २०११ पासून प्रशासनाने सध्या मालक असलेल्यांना कर लावून दिला पाहिजे. प्रशासन आजही मूळ मालकावरच कर लादत आहे.
- नंदकुमार घोडेले, महापौर

Web Title: Mayor families did not pay property tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.