Maharashtra Bandh : मराठवाड्यात जवळपास पाच हजार आंदोलकांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 06:32 PM2018-08-11T18:32:21+5:302018-08-11T18:34:29+5:30

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोेर्चाच्या वतीने गुरुवारी पुकारलेल्या बंददरम्यान जाळपोळ, रेल्वरोको आणि दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या.

Maharashtra Bandh: Crime against five thousand protesters in Marathwada | Maharashtra Bandh : मराठवाड्यात जवळपास पाच हजार आंदोलकांवर गुन्हे

Maharashtra Bandh : मराठवाड्यात जवळपास पाच हजार आंदोलकांवर गुन्हे

googlenewsNext
ठळक मुद्देमराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत जवळपास पाच हजार आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोेर्चाच्या वतीने गुरुवारी पुकारलेल्या बंददरम्यान जाळपोळ, रेल्वरोको आणि दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत जवळपास पाच हजार आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शुक्रवारपर्यंत एकुण ३६ जणांना ताब्यात घेतले आहे. 

औरंगाबादेतील  वाळूज एमआयडीसीतील तोडफोड आणि जाळपोळप्रकरणी एमआयडीसी वाळूज ठाण्यात पाच गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी ३० संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रेल्वे रोखल्याप्रकरणी जवळपास चार हजार आंदोलकांवर लोहमार्ग गुन्हा नोंद केला आहे. 

उस्मानाबादेत ३५ आंदोलकांवर गुन्हे 

उस्मानाबाद : जिल्ह्यात बंददरम्यान वाशी येथील ग्रामीण रूग्णालयासमोरील महामार्गावर टायर जाळण्यात आले होते़ या प्रकरणी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाच जणांविरूध्द गुरूवारी वाशी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे शुक्रवारी वाशी शहर बंद ठेवण्यात आले़ भूम शहरात  बसवर दगडफेक केल्याप्रकरणी आगारप्रमुखांनी दिलेल्या फिर्यादीवरून ३० जणांविरूध्द भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ भूम पोलिसांनी शुक्रवारी चौघांना ताब्यात घेतले होते़

लातूरात तीन ठिकाणी दगडफेक; २७ जणांविरूद्ध गुन्हा
लातूर : आंदोलनादरम्यान औसा तालुक्यातील नागरसोगा येथे एका बसवर दगडफेक झाली. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. तर लातूर महापालिकेसमोर उभ्या असलेल्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली. त्यात २० अज्ञातांविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे. तसेच अहमदपूर शहरात अग्निशमन दलाच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली असून, सदर प्रकरणात चौघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद आहे.

परभणी जिल्ह्यात ४४ जणांवर गुन्हे 
परभणी : जिल्ह्यात मानवत तालुक्यातील रत्नापूर येथील राष्ट्रीय महामार्ग २२२ वर टोल नाक्याची तोडफोड केल्या प्रकरणी २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. जिंतूर येथे रस्त्यावर झाड टाकून रस्ता अडवून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदिलाबाद- परळी या रेल्वेवर दगडफेक केल्याप्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री परभणी- गंगाखेड रस्त्यावर एस.टी.बसवर दगडफेकीच्या घटनेत गुरुवारी मध्यरात्री दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

बीड जिल्ह्यात ३२ जणांविरूद्ध दाखल
बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला होता. यादरम्यान, वाहनांवर दगडफेक करणे, ट्रक जाळणे व रस्त्यावर टायर जाळून वाहतूकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी जवळपास २० जणांविरोधात बीड ग्रामीण व पिंपळनेर पोलीस ठाण्यात असे दोन ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. तामिळनाडू येथून औरंगाबादकडे नारळ घेऊन जाणार ट्रक दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तरुणांनी अडवून पेट्रोल टाकून पेटविला. याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतल्याचेही पोलीस सूत्रांकडून समजते. बीड तालुक्यातील घाटसावळी येथे रस्त्यावरच टायर जाळण्यात आले. तसेच काही लोकांनी रस्त्यावरील वाहनांवर दगडफेक केली. त्यामुळे मोठे नुकसान झाले. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात १२ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या सर्वांचा शोध सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी सांगितले.

जाळपोळ प्रकरणी ११ जणांवर गुन्हा
सेनगाव (जि. हिंगोली) : बंददरम्यान सेनगाव शहरात जाळपोळ करण्यात आली होती. याप्रकरणी ११ जणांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आहेत. यामध्ये  शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संदेश देशमुख, निखिल पानपट्टे, हेमंत संघई, अमोल तिडके, प्रवीण महाजन, अनिल गिते, दत्ता देशमुख, जगदीश गाढवे, पंढरी गव्हाणे, सनी व चालक हरण आदींचा समावेश आहे. तर तोष्णीवाल महाविद्यालयाची स्कूल बस जाळल्याच्या प्रकरणात अज्ञात चार ते पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारीही तणावपूर्ण परिस्थितीत असून, संपूर्ण शहरात कडकडीत बंद होता. दरम्यान, तहसीलसमोर सकल मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन सातव्या दिवशीही कायम होते.

नांदेडात ३०० जणांविरोधात गुन्हे
नांदेड : क्रांती दिनी पुकारलेल्या आंदोलनादरम्यान जिल्ह्यात झालेल्या जाळपोळ आणि दगडफेक घटनांच्या पार्श्वभूमीवर सात पोलीस ठाण्यात ३०० हून अधिक जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत़ जिल्ह्यातील हदगाव, तामसा, देगलूर, कंधार, उमरी, अर्धापूर, मरखेल या सात पोलीस ठाण्यात आंदोलनकर्त्या ३०० हून अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ जाळपोळ आणि दगडफेकीमुळे गुरुवारी २४ लाख ६१ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे़ 

जालन्यात दोन प्रकरणात २२ जणांवर गुन्हे 
जालना : सकल मराठा समाजातर्फे गुरूवारी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते. यादरम्यान जालन्यातील हॉटेल अंबर परिसरात काही जणांनी दगडफेक केली होती. याप्रकरणी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी सदरबाजार पोलीस ठाण्यात ९ आणि जाफराबाद तालुक्यातील १३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस विशेष शाखेकडून देण्यात आली.

Web Title: Maharashtra Bandh: Crime against five thousand protesters in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.