Maharashtra Bandh: After the attack on multinationals, officers of Mumbai Headquarters in the city | Maharashtra Bandh : बहुराष्ट्रीय कंपन्यांवरील हल्ल्यानंतर मुंबई मुख्यालयातील अधिकारी शहरात
Maharashtra Bandh : बहुराष्ट्रीय कंपन्यांवरील हल्ल्यानंतर मुंबई मुख्यालयातील अधिकारी शहरात

औरंगाबाद : वाळूज एमआयडीसीतील बंददरम्यान बहुराष्ट्रीय कंपन्यांवर झालेल्या हल्ल्याची उद्योगांच्या मुख्यालयांनी गंभीर दखल घेतली असून विविध कंपन्यांचे अधिकारी मुंबईहून शुक्रवारी शहरात दाखल झाले. 

मुंबई मुख्यालयाहून बहुतांश अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ शुक्रवारी सकाळच्या विमानाने औरंगाबादेत दाखल झाले. या अधिकाऱ्यांनी पोलीस तक्रारीच्या अनुषंगाने विमा कंपन्यांचे पेपर्स, आॅडिट आदीबाबतची पूर्ण माहिती घेतली. आंदोलकांनी केलेल्या तोडफोडीचे मोबाईल चित्रीकरणाचे फुटेज मुख्यालयांना पाठविण्यात आल्याचे काही स्थानिक उद्योग अधिकाऱ्यांनी सांगितले. सीमेन्स कंपनी आज बंद होती. कंपनीच्या नेमबोर्डपासून ते कँटीन, बाह्य सुशोभीकरणापर्यंतचा पूर्ण भाग आंदोलकांनी तोडफोड केला. वाहनांची तोडफोड केली, त्यामध्ये चारचाकी, दुचाकींचा व लॉजिस्टिक्सच्या वाहनांचा समावेश होता.

या तोडफोडप्रकरणी कंपनीच्या मनुष्यबळ विभागाने माध्यमांना काहीही माहिती दिली नाही. एनआरबी कंपनीच्या मुंबईहून आलेल्या अधिकाऱ्यांनी कंपनीच्या नुकसानीचा आढावा घेतला. मालकांनी थेट विचारणा करून हा प्रकार कशामुळे घडल्याची विचारणा केली. दरम्यान, चाकणच्या औद्योगिक क्षेत्रात झालेल्या हल्ल्यानंतर ९ आॅगस्ट रोजी औरंगाबादमध्येही औद्योगिक क्षेत्रात झालेल्या तोडफोडीची संपूर्ण औद्योगिक क्षेत्रासह पोलिसांमध्येही  चर्चा होती. या दोन्ही घटनांमागे अन्य काही ‘कनेक्शन’ आहे का याबाबतही पोलीस तपास करणार आहेत. 

मनुष्यबळ विभागातील डाटा करप्ट
बहुतांश कंपन्यांमधील सुरक्षा आणि मनुष्यबळ विभागाचे चेंबर्स आंदोलकांनी फोडले. त्या तोडफोडीमध्ये मनुष्यबळ विभागातील संगणक व इतर साहित्याचा चुराडा झाला. काही संगणकांमध्ये कंपनीच्या महत्त्वाच्या व्यवहारांचा, कर्मचाऱ्यांशी निगडित असा डाटा होता. संगणक विशेषत: लॅपटॉप फोडण्यात आल्यामुळे बहुतांश मजकू र (डाटा) करप्ट झाल्याची माहिती मिळाली. 

Web Title: Maharashtra Bandh: After the attack on multinationals, officers of Mumbai Headquarters in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.