सुशिक्षितांचे बेजबाबदार वर्तन; मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तब्बल २३ हजार मते ठरली बाद

By सुमेध उघडे | Published: December 4, 2020 12:46 PM2020-12-04T12:46:36+5:302020-12-04T12:58:28+5:30

Marathwada Graduate Constituency Election : मतपत्रिकेवर चुकीचा पसंती क्रम, सह्या, खुणा, मजकूर, घोषणा लिहिलेला आढळून आल्याने मतदान बाद ठरविण्यात आले 

Legislative Council elections: Irresponsible behavior of well-educated people; In Marathwada graduate election, 23,000 votes were cast | सुशिक्षितांचे बेजबाबदार वर्तन; मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तब्बल २३ हजार मते ठरली बाद

सुशिक्षितांचे बेजबाबदार वर्तन; मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तब्बल २३ हजार मते ठरली बाद

googlenewsNext
ठळक मुद्देमहाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना पहिल्या पसंतीचे १ लाख १६ हजार ६३८ मते मिळाली दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे शिरीष बोराळकर राहिले . त्यांना ५८ हजार ७४३ मते पडली. तिसऱ्या क्रमांकावर २३ हजार ०९२ अवैध मते होती.

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तब्बल २३ हजार मते बाद ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. पदवीधरसाठी नाव नोंदणी केलेल्या ३ लाख ७३ हजार १६६ पैकी २ लाख ४० हजार ७९६ मतदारांनी मतदान केले होते. यातील ९.५ टक्के मते बाद ठरली आहेत. यामुळे पदवीधरांच्या या निवडणुकीत मतदान करताना सुशिक्षितांचे बेजबाबदार वर्तन दिसून आले. 

महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढत झालेल्या मराठवाडा पदवीधर निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार अशी चर्चा होती. मात्र मतदारांनी 'सच' का साथ देत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना पहिल्या पसंतीचे १ लाख १६ हजार ६३८ मते देत ५७ हजार ८९५ मतांनी विजयी केले आहे. दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे शिरीष बोराळकर राहिले . त्यांना ५८ हजार ७४३ मते पडली. लक्षणीय बाब म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर २३ हजार ०९२ अवैध मते होती. म्हणजेच एकूण मतदान झालेल्या २ लाख ४० हजार ७९६ मतांमध्ये ९.५ टक्के मते बाद ठरली आहेत. मतमोजणीच्या पोस्टल मतांच्या फेरीपासून पाचही फेऱ्यांमध्ये अवैध मतांची संख्या मोठी होती. मतपत्रिकांवर चुकीचे पसंती क्रम टाकणे, सह्या करणे यासह मराठा आरक्षण मागणी, अनुदान मागणी अशा घोषणा लिहिलेल्या आढळून आल्या आहेत. यामुळे ही मते बाद ठरविण्यात आली. 

पहिल्या चार फेऱ्यांमध्ये ५ हजाराच्यावर मते अवैध 
सुरुवातीला १०७३ पोस्टल मतांची मोजणी सुरु झाली. यातील १ हजार ४४ मते वैध तर २९ मते अवैध ठरली. यानंतर ५६ हजार १ मतांच्या पहिल्या फेरीत ५ हजार ३८१, ५६ हजार मतांच्या दुसऱ्या फेरीत ५ हजार २६०, ५६ हजाराच्या तिसऱ्या फेरीत ५ हजार ३७४, ५६ हजार मतांच्या चौथ्या फेरीत ५ हजार ३४४ आणि १६ हजार ८३४ मतांच्या पाचव्या फेरीत १ हजार ७०४ मते बाद ठरली. एकूण मतदानाच्या ९. ५ टक्के मते बाद झाली आहेत.   

अशी झाली मतमोजणी प्रक्रिया
सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होताच सर्व मतपेट्यांमधील मतपत्रिका या एका दहा बाय दहाच्या मिक्सिंग ड्रममध्ये टाकण्यात आल्या. त्यानंतर दोन सभागृहांमध्ये प्रत्येकी २८ टेबलवर २५ मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे मोजणी करण्यात येत आहे. हे करीत असतानाच वैध मतपत्रिका काढण्यात आल्या. त्यानंतर ३५ उमेदवारांच्या पसंतीनुसार मतपत्रिका पिजन बॉक्समध्ये वर्ग करण्यास येतात. मतमोजणीच्या एकूण पाच फेऱ्या झाल्या. त्यामध्ये वैध मतांची बेरीज करून पहिल्या पसंतीच्या मतानुसार विजयी होण्यासाठी कोटा ठरविण्यात आला. वैध मतांच्या संख्येला दोनने भागून त्यात १ अधिक केल्यानंतर जी संख्या येईल, ती संख्या विजयासाठी कोटा म्हणून निश्चित करण्यात येते.

Web Title: Legislative Council elections: Irresponsible behavior of well-educated people; In Marathwada graduate election, 23,000 votes were cast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.