late flight take off on time; 30 passengers missed flight at Auranagabad | उशिरा होणारे उड्डाण वेळेवर झाल्याने ३० प्रवाशांचे विमान हुकले
उशिरा होणारे उड्डाण वेळेवर झाल्याने ३० प्रवाशांचे विमान हुकले

ठळक मुद्देदिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांचीही गैरसोय

औरंगाबाद : एअर इंडिया विमान कंपनीमार्फत स्वातंत्र्यदिनी मुंबई- औरंगाबाद- दिल्ली, असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची कंपनीच्या चुकीमुळे चांगलीच तारांबळ उडाली आणि या सर्व धावपळीत काहीही चूक नसताना निष्कारण मुंबईहून औरंगाबादला येणाऱ्या ३० प्रवाशांचे विमान हुकले.

दि.१५ आॅगस्ट रोजी उड्डाण करणारे एएल-४४२ हे मुंबई- औरंगाबाद- दिल्ली विमान नियोजित वेळेच्या तीन तास उशिरा औरंगाबादला येईल, असे मेलच्या साहाय्याने दि.१४ आॅगस्ट रोजी प्रवाशांना कळविण्यात आले होते. त्यानुसार विमानाचे उड्डाण मुंबई येथून दु. ३.२५ ऐवजी सायं. ६.३० ला होणार होते. त्यामुळे विमानाला उशीर असल्यामुळे प्रवासी बदललेल्या वेळेनुसार मुंबई विमानतळावर आले आणि विमान चक्क नियोजित वेळेवर येऊन त्याचे औरंगाबादकडे उड्डाणही झाले असल्याची माहिती प्रवाशांना मिळाली. यामुळे काहीही चूक नसताना विमान हुकल्यामुळे प्रवाशांना मात्र ऐनवेळी प्रचंड मनस्तापाला तोंड द्यावे लागले.

कामानिमित्त मुंबई- औरंगाबाद असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी अगोदरच त्यांच्या मुंबई- औरंगाबाद प्रवासाचे तिकीट आरक्षित करून ठेवलेले होते; पण ऐनवेळी नियोजनाच्या अभावामुळे झालेला गोंधळ प्रवाशांचा तणाव वाढविणारा आणि ऐनवेळी त्यांना धावपळ करायला लावणारा ठरला.
उद्योजक रवी माछर याविषयी सांगताना म्हणाले की, त्यांना एअर इंडिया कंपनीचा विमानाच्या उड्डाणाला उशीर होण्याविषयी माहिती देणारा मेल दि.१४ आॅगस्ट रोजी मिळाला. त्यामुळे ते उद्योजक मधुसूदन अग्रवाल यांच्यासह  बदललेल्या वेळेनुसार मुंबई विमानतळावर पोहोचले असता त्यांना औरंगाबादला जाणारे विमान नियोजित वेळेवर म्हणजेच दु. ३.३० वा. औरंगाबादसाठी रवाना झाल्याचे समजले. अग्रवाल हे रक्षाबंधनासाठी मुंबईहून औरंगाबादला येत होते. औरंगाबादचे काम आटोपून त्यांना त्याचदिवशी सायंकाळी दिल्लीला रवाना व्हायचे होते. मात्र, त्यांचे विमान हुकल्यावर ते चार्टर्ड प्लेनने औरंगाबादला आले आणि माछर हे अग्रवाल यांच्यासह याच विमानात औरंगाबादला आले. कंपनीच्या गलथान कारभारामुळे तब्बल ३० प्रवाशांचे विमान हुकले असल्याची बाब मुंबई विमानतळावर निदर्शनास आल्याचेही माछर यांनी सांगितले.

उद्योजक नंदकुमार कागलीवाल यांनाही या प्रसंगाला सामोरे जावे लागले. या अनुभवाविषयी सांगताना ते म्हणाले की, आम्हाला मेलवरून सूचना आल्यानुसार आम्ही उशिरा विमानतळावर पोहोचलो; पण विमान आगोदरच्याच वेळेला रवाना झालेले होते. या सर्व गोष्टीमुळे मला मुंबई ते शिर्डी असा प्रवास निरर्थक करावा लागला आणि शिर्डीहून मग मी औरंगाबादला आलो. असे केले नसते, तर एकच विमान असल्यामुळे मला दुसऱ्या दिवशीच्या विमानापर्यंत मुंबईला वाट पाहत विनाकारण ताटकळत बसावे लागले असते. 

गलथानपणा
आधीच तोट्यात असलेल्या एअर इंडिया कंपनीला गलथान कारभारामुळे वेळोवेळी प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. याविषयी एअर इंडियाच्या मुंबई आणि औरंगाबाद येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांचीही गैरसोय
प्रवाशांच्या पुढील सर्वच प्रवासाचे नियोजन या प्रकारामुळे विस्कळीत झाले. या घटनेमुळे औरंगाबाद येथून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांचीही चांगलीच गैरसोय झाली. 

Web Title: late flight take off on time; 30 passengers missed flight at Auranagabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.