लाख खंडाळा प्रकरण : कृती समिती आयुक्त कार्यालयावर काढणार मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 07:47 PM2020-03-20T19:47:31+5:302020-03-20T19:50:14+5:30

दलित अत्याचारविरोधी कृती समितीचा निर्णय

Lakh Khandala case: Action march will be held at Commissioner's office | लाख खंडाळा प्रकरण : कृती समिती आयुक्त कार्यालयावर काढणार मोर्चा

लाख खंडाळा प्रकरण : कृती समिती आयुक्त कार्यालयावर काढणार मोर्चा

googlenewsNext
ठळक मुद्देया घटनेपूर्वी पोलिसांकडे पीडित गायकवाड कुटुंबियांनी संरक्षण देण्याची मागणी केली होती.

औरंगाबाद : लाख खंडाळा, ता. वैजापूर येथील हत्याकांडाच्या निषेधार्थ येत्या २७ मार्च रोजी परवानगी मिळो न मिळो मास्क लावून मोर्चा काढूच. क्रांतीचौकातून सकाळी ११ वा. हा मोर्चा निघेल व तो विभागीय आयुक्त कार्यालयावर जाईल. आंबेडकरवादी अत्याचारविरोधी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज पत्रपरिषदेत ही माहिती दिली. 

जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या कार्यकाळात औरंगाबाद जिल्ह्यात दलितांवरील अन्याय-अत्याचाराची मालिकाच सुरू झाली आहे. हे लक्षात घेता मोक्षदा पाटील यांना बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच लाख खंडाळा येथे भीमराज गायकवाड या निष्पाप मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली. त्याच्या आई-वडिलांवरही क्रूर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले. जिवाला धोका आहे, या गायकवाड कु टुंबियाच्या लेखी तक्रारीची गंभीर दखल न घेणाऱ्या पोलीस निरीक्षक कुळकर्णी व डीवायएसपी गोपाळ रांजणकर यांना अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत सहआरोपी करण्यात यावे व फास्ट ट्रॅकवर हा खटला चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, याप्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, आंतरजातीय विवाह व प्रेमविवाह केल्यामुळे होणाऱ्या हत्याकांडाला आळा घालण्यासाठी हॉनर किलिंगचा कायदा लागू करण्यात यावा आदी मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. 

या घटनेमुळे आंबेडकरी समाजामध्ये तीव्र असंतोष पसरला असून यापूर्वीही औरंगाबाद जिल्ह्यात अंधारी, डोंगरगाव येथे जातीयवाद्यांकडून अन्याय-अत्याचार झालेले आहेत. हे प्रकार जिल्हा पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे घडले आहेत. त्यास पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील जबाबदार असल्याचा स्पष्ट आरोप करण्यात आला. आंबेडकरी विचारधारेच्या विविध पक्ष-संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते पत्रपरिषदेस उपस्थित होते. 


कोपर्डी घटनेप्रमाणे द्रुतगती न्यायालयात खटला चालवा
वैजापूर तालुक्यातील लाख खंडाळा गावात भीमराज गायकवाड या अल्पवयीन मुलाची केलेली निर्घृण हत्या व त्याच्या कुटुंबावरील हल्ल्याचा खटला कोपर्डी हत्याकांडाप्रमाणे द्रुतगती न्यायालयात चालवून दोषींना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी दलित अत्याचारविरोधी कृती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. मनोहर टाकसाळ यांनी केली. अ‍ॅड. टाकसाळ, अ‍ॅड. बी.एच. गायकवाड आणि भीमराव बनसोड यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. कृती समितीचे शिष्टमंडळ काल लाख खंडाळा येथे जाऊन आले. तत्पूर्वी, या शिष्टमंडळाने घाटी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी गायकवाड दाम्पत्याच्या प्रकृतीची चौकशी केली. तेव्हा तेथे जखमी गायकवाड यांचे बंधू दादासाहेब गायकवाड यांनी घटनाक्रम कथन केला. अजूनही जखमी गायकवाड दाम्पत्याला लहान मुलगा हल्ल्यात ठार झाल्याची माहिती समजू दिलेली नाही. त्यांचे नातेवाईक अजूनही धास्तावलेले आहेत. वैजापूर पोलीस स्टेशनमध्ये हे शिष्टमंडळ गेले. तेथे उपस्थित पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या निदर्शनास पोलिसांचा हलगर्जीपणा आणून दिला. 

या घटनेपूर्वी पोलिसांकडे पीडित गायकवाड कुटुंबियांनी संरक्षण देण्याची मागणी केली होती. सरंक्षण देणे तर दूरच; पण गायकवाड कुटुंबाला त्या पोलीस अधिकाऱ्याने अतिशय उर्मटपणे प्रश्न करून तेथून काढून दिले. विशेष म्हणजे, या गुन्ह्याचा तपासही त्याच पोलीस अधिकाऱ्याकडे आहे. त्यामुळे तो हा तपास पारदर्शीपणे करील, यावर आमचा विश्वास नाही. या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत केला जावा व या प्रकरणात हेतुपुरस्सर हलगर्जीपणा करणाऱ्या त्या पोलीस अधिकाऱ्याला सहआरोपी करण्यात यावे. तीक्ष्ण हत्याचाराने गळा चिरून ठार केलेल्या भीमराज गायकवाडच्या पार्थिवावर ताबडतोब अंत्यसंस्कार उरकून घ्या, नाही तर तुमच्यावरही कारवाई होईल, अशी धमकी देणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करण्यात यावी, फरार आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी प्रा. भारत सिरसाठ, अनिल थोरात, प्रा. बाळासाहेब कुलकर्णी आदी उपस्थित होते.'

Web Title: Lakh Khandala case: Action march will be held at Commissioner's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.