It is a rage to break the Rs 3 crore's new road in Paithan | पैठणमध्ये तीन कोटींचा नवाकोरा रस्ता फोडल्याने संताप
पैठणमध्ये तीन कोटींचा नवाकोरा रस्ता फोडल्याने संताप

ठळक मुद्देमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा प्रताप  नगर परिषदेची परवानगी न घेताच केली उठाठेव

पैठण (औरंगाबाद )  : तीन कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेला पैठण शहरातील मुख्य मार्ग असलेला नवा कोरा सिमेंटचा रस्ता पाईपलाईन टाकण्यासाठी फोडण्यात येत असल्याने पैठण -आपेगाव विकास प्राधिकरणाच्या कामातील असमन्वय पुन्हा एकदा समोर आला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सिमेंट रस्ता फोडण्याआधी नगर परिषदेची परवानगी तर सोडाच त्यांना साधी कल्पनासुद्धा दिली नाही, असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. दरम्यान, नागरिकांत रोष निर्माण झाल्याने चालू असलेले काम तूर्त बंद करण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर रस्ता फोडून ठेवण्यात आल्याने रस्त्याचे नुकसान झाले आहे.

पैठण -आपेगाव विकास प्राधिकरणातून पैठण शहरात नव्याने मंजूर झालेल्या पाण्याच्या टाक्या व जुने जलकुंभ यांना पाणीपुरवठा करण्यासाठी जुन्या भरणा लाईनला समांतर जलवाहिनी टाकण्याचे तीन कोटी रूपयांचे काम मंजूर झाले आहे. या अंतर्गत शहरात चार पाण्याच्या टाक्या व सहा किलोमीटर लांबीची व ४०० मि.मी. व्यासाची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. प्राधिकरणाने या कामासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची नियुक्ती केली आहे.
दरम्यान, ही पाईपलाईन टाकण्यासाठी पैठण शहरात तीन वर्षांपूर्वी प्राधिकरणातून तीन कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेला बसवेश्वर चौक ते कोर्ट मार्गे बसस्थानकपर्यंतचा सिमेंट रस्ता एका बाजूने दोन फुटापर्यंत पोकलेन लाऊन फोडण्यात येत होता. २० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर शहरातील नागरिकांना हा रस्ता तयार करून मिळाला होता. दरम्यान, हा रस्ता फोडण्यात येत असल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण निर्माण झाले. माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांच्या काळात हा रस्ता तयार झाल्याने नागरिकांनी त्यांना बोलावून घेतले. याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांशी दत्ता गोर्डे यांनी चर्चा करून रस्ता तोडू नका, पर्याय काढता येईल, असे सूचविले. यामुळे तूर्त हे काम बंद करण्यात आले आहे.

रस्ते तोडू नका, न.प. चे लेखी पत्र
काम सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्यांना न.प. मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी पत्र दिले असून या पत्रात पाईपलाईन रस्त्याच्या बाजूला असलेल्या काळ्या मातीतून टाकावी, रस्त्याच्या खालून हॉरिझांटल ड्रील करावे व हे काम करत असताना रस्त्यास हानी पोहचली तर ताबडतोब रस्ते तयार करून द्यावे, असे म्हटले आहे. असे असताना पंचायत समितीचे प्रांगण मोकळे असताना एमजेपीच्या अधिकाऱ्यांनी सिमेंटचा रस्ता तोडल्याने नागरिकात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित ठेकेदारावर कारवाई करू -नगराध्यक्ष 
पैठण शहरातील कोर्टरोड तोडण्याची परवानगी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने घेतलेली नाही, रस्ता तोडण्याआधी कल्पनासुद्धा दिली नाही. रस्ता तोडण्यात आल्याने नुकसान झाले आहे. विनापरवाना रस्ता तोडल्या प्रकरणी संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करू, असे नगराध्यक्ष सूरज लोळगे यांनी सांगितले.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने शहरात भूमिगत गटार योजनेचे काम ८ वर्षांपासून सुरू असून या कामासाठी खोदलेले रस्ते करण्यास टाळाटाळ करण्यात आल्याने नागरिकांना मोठ्या यातना भोगाव्या लागल्या आहेत. या योजनेसाठी कोट्यवधी खर्चून तयार केलेले रस्ते खोदण्यात आले आहे तर दुसरीकडे या योजनेचे ‘पुढे काम मागे सपाठ’ अशी अवस्था झालेली आहे. योजना यशस्वी होणार की नाही, या बाबत शंका घेण्यात येत आहे.
 

रस्ता खचून जाईल
या परिसरात ब्लॅक सॉईल असल्याने हेव्ही इस्टिमेट घेऊन हा रस्ता माझ्या नगराध्यक्ष कार्यकाळात  बांधकाम विभागाकडून करून घेण्यात आला होता. दरम्यान, एका बाजूने रस्ता खोदल्यास कालांतराने पाणी मुरून रस्ता खचण्याची भीती आहे. सिमेंट रस्त्याला दुरूस्ती करणे अवघड असल्याने पाईपलाईन टाकण्यासाठी पर्यायी मार्ग शोधायला हवा होता, असे दत्ता गोर्डे यांनी सांगितले.

तोडलेले रस्ते तयार करून देऊ  
पाईपलाईन टाकण्यासाठी जागाच नसल्याने रस्ता तोडण्याचा निर्णय झाला. तोडलेले रस्ते परत तयार करून देऊल, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे शाखा अभियंता पाथ्रीकर यांनी सांगितले.


Web Title: It is a rage to break the Rs 3 crore's new road in Paithan
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.