कोट्यवधींच्या फसवणुकीचा तपास कासवगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 12:56 PM2021-01-20T12:56:08+5:302021-01-20T12:57:56+5:30

crime news २५ लाखांपेक्षा अधिक रकमेच्या फसवणुकीची तक्रार असेल तर अशा प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात येतो.

Investigating crores of frauds at a snail's pace | कोट्यवधींच्या फसवणुकीचा तपास कासवगतीने

कोट्यवधींच्या फसवणुकीचा तपास कासवगतीने

googlenewsNext
ठळक मुद्दे१२ पैकी केवळ दोन प्रकरणांचा तपास पूर्णदोषारोपपत्र न्यायालयात दाखल

- बापू सोळुंके 

औरंगाबाद : सामान्य नागरिकांची फसवणूक झालेल्या अनेक प्रकरणांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून कासव गतीने होत आहे. यात व्हाइट कॉलर आरोपी असल्यामुळे ते सापडत नाहीत, असा दावा पोलिसांकडून केला जातो. आरोपीच सापडले नसल्यामुळे २०२० मध्ये तपासांवर असलेल्या १२ पैकी केवळ दोन गुन्ह्यांचे दोषारोपपत्र पोलिसांना न्यायालयात सादर करता आले.

२५ लाखांपेक्षा अधिक रकमेच्या फसवणुकीची तक्रार असेल तर अशा प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात येतो. पोलीस आयुक्तांची शाखा म्हणून आर्थिक गुन्हे शाखेकडे पाहिले जाते. आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी थेट पोलीस आयुक्ताना रिपोर्टिंग करतात. २०२० मध्ये औरंगाबाद शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास सोपविलेल्या गुन्ह्यांपैकी १२ प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक डी. एस. सिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली चार अधिकाऱ्यांची पथके करीत असतात.

मोठ्या रकमेची फसवणूक करणारे आरोपीही व्हाइट कॉलर असतात. अशा आरोपींना अटक करणे, फसवणूक करून मिळविलेल्या पैशांतून आरोपींनी संपत्ती खरेदी केली असेल तर ती संपत्ती जप्त करण्यासाठी शासनाशी पत्रव्यवहार करणे, बॅंक खाती गोठविणे, आरोपींविरुद्ध तपास करून लवकरात लवकर त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणे, हे तपास अधिकाऱ्यांचे काम आहे. मात्र आर्थिक गुन्हे शाखेकडून बहुतेक गुन्ह्यांचा तपास कासवगतीने केला जात असल्याचे दिसून येते. गतवर्षी २०२० मध्ये पोलिसांनी केवळ दोन गुन्ह्यांचा तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. उर्वरित दहा प्रकरणांपैकी एक प्रकरण नोव्हेंबर २०२० मधील आहे. उर्वरित गुन्ह्यातील आरोपींना अटक करणे आणि तपास पूर्ण करून त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल होणे अपेक्षित होते, मात्र झाले नाही.

गतवर्षी गाजलेली प्रकरणे :
- २ कोटी २२ लाखांचा गंडा 

रिदास फायनान्स कंपनीच्या संचालकानी औरंगाबाद शहरातील गुंतवणूकदारांना अल्पावधीत मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून सुमारे २ कोटी २२ लाखांचा गंडा घातला. आरोपींनी ना परतावा दिला ना मुद्दल परत केली. यामुळे सुमारे ७५ गुंतवणूकदारानी पोलिसांत धाव घेतली. गुन्हा नोंद झाल्यापासून आरोपी फरार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या आरोपींनी गंगापूर तालुक्यात खरेदी केलेली ६० एकर जमीन पोलिसांनी जप्त केली आहे.

- नासाचे कंत्राट मिळाल्याची थाप
गतवर्षी जानेवारीत नासाचे कंत्राट मिळाल्याची थाप मारून शहरातील आर्किटेक्टची अडीच कोटींची फसवणूक केल्याच्या आरोपावरून नाशिक येथील अभिजित पानसरे, त्याची आई, बहीण आणि शहरातील ॲड. नितीन भवरविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता. या केसमध्ये फरार असलेल्या भवरला अकरा महिन्यांनंतर पोलिसांनी अटक केली. या आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र अद्याप दाखल नाही.

- रेल्वे आणि स्काउट-गाइडमध्ये नोकरीचे आमिष
रेल्वे आणि स्काउट-गाइडमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अनेक बेरोजगार तरुणांना ७० ते ८० लाखांचा गंडा घालणाऱ्या आरोपीला आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. आरोपी सध्या जेलमध्ये आहे. त्याच्यावर लवकर दोषारोपपत्र दाखल होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बनावट धनादेश बॅंकेत 
वाळूज एमआयडीसीमधील कंपनीचा बनावट धनादेश बॅंकेत टाकून फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारा कथित एनजीओचालक महिला सहा महिन्यांनुसारही पोलिसांना सापडली नाही. या महिलेला अद्याप अटक न झाल्यामुळे तिला हा बनावट धनादेश देणारा कोण? या प्रश्नाचे उत्तर सापडले नाही.

आर्थिक गुन्ह्याचा तपास किचकट असतो 
इतर गुन्ह्यांच्या तुलनेत आर्थिक गुन्ह्याचा तपास अत्यंत किचकट असतो. या गुन्ह्यात अनेक कायद्यांचा अभ्यास करावा लागतो. तज्ज्ञांचा अभिप्राय घ्यावा लागतो. यामुळे दोषारोपपत्र दाखल करण्यास उशीर होतो. पोलिसांचा तपास न्यायालयात वेळोवेळी सादर केला जातो. कुणाला यात काही शंका वाटत असेल तर येऊन भेटावे. 
- डॉ. निखिल गुप्ता. पोलीस आयुक्त

Web Title: Investigating crores of frauds at a snail's pace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.