मराठवाड्यात तीन जिल्ह्यांत दमदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 01:52 PM2020-07-03T13:52:06+5:302020-07-03T13:54:09+5:30

नांदेडमध्ये मालेगाव मंडळात अतिवृष्टी झाली. त्याचप्रमाणे पावसामुळे ८ लाख रुपयांचे धान्य ओले झाल्याने नुकसान झाले.

Heavy rains in three districts of Marathwada | मराठवाड्यात तीन जिल्ह्यांत दमदार पाऊस

मराठवाड्यात तीन जिल्ह्यांत दमदार पाऊस

googlenewsNext

औरंगाबाद : मराठवाड्यात काही जिल्ह्यांत बुधवारी आणि गुरुवारीही दमदार पावसाने हजेरी लावली. नांदेडमध्ये मालेगाव मंडळात अतिवृष्टी झाली. त्याचप्रमाणे पावसामुळे ८ लाख रुपयांचे धान्य ओले झाल्याने नुकसान झाले. नांदेड जिल्ह्यातीलच  सुरेश जंगू कनाके या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतही पावसाने हजेरी लावली.

नांदेड : मालेगाव मंडळात अतिवृष्टी
नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या विविध भागांत बुधवारी रात्री तसेच गुरुवारीही दमदार पाऊस झाला़ गुरुवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी ७़२६ मि़मी़ पावसाची नोंद झाली असली तरी देगलूर तालुक्यात ४०़६७ मि़मी़ पाऊस झाला असून तालुक्यातील मालेगाव मंडळात अतिवृष्टी झाली. येथे ६५ मि़मी़ पावसाची नोंद झाली असून या पावसामुळे  सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. मागील २४ तासात नांदेड जिल्ह्यातील लोहासह बिलोली, नायगाव, मुखेड आणि मुदखेड तालुक्यात दमदार पाऊस झाला़ मुखेड येथे २१़१४ मि़मी़ पावसाची नोंद झाली असून बिलोली तालुक्यात १२ मि़मी़ तर लोहा तालुक्यात १०़८३ मि़मी़ पाऊस झाला. उमरी तालुक्यात ५़६७, मुदखेड तालुक्यात ५़३३ मि़मी़ पावसाची नोंद झाली. नायगाव तालुक्यातही ८़६० मि़मी़ पाऊस बरसला.

लोह्याला धान्य भिजल्याने ८ लाख रुपयांचे नुकसान
नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरातील मोंढा भागात अडत व्यापाऱ्यांनी दुकानाबाहेर  सोयाबीन, हळद, तूर, ज्वारी आदी धान्य पावसाने भिजू नये म्हणून प्लास्टिक कापड झाकून ठेवले होते. मात्र, बुधवारी झालेल्या पावसामुळे नाल्या तुंबल्याने मोंढा भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले़ त्यामुळे धान्य भिजून व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. ८,00,000 रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. मोंढ्यासह रोहिदास नगर, जुना लोहातील कलालपेठ, इंदिरानगर आदी सखल भागातील नागरिकांच्या घरातही नालीचे पाणी शिरल्याने रहिवाशांचीही तारांबळ झाली़ 

परभणी जिल्ह्यात पोषक पाऊस
परभणी : परभणी शहरासह परिसरात गुरुवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस होत असून पिकांना हा पाऊस पोषक ठरत आहे. बुधवारी रात्रीही जिल्ह्यात पाऊस झाला. त्यात मानवत तालुक्यामध्ये सर्वाधिक १६.३३ मि.मी. तर सेलूमध्ये ११.४० मि.मी. पावसाची नोंद झाली.जिल्ह्यात सरासरी ५.८३ मि.मी. पाऊस झाला आहे. यावर्षीच्या हंगामात परभणी जिल्ह्यात सरासरी २११ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारीही ढगाळ वातावरण होते. परभणी शहरात सायंकाळी पावसाने हजेरी लावली. इतर तालुक्यांमध्येही पाऊस होण्याची शक्यता आहे.

हिंगोली जिल्ह्यात पावसाची हजेरी
हिंगोली : जिल्ह्यात गुरुवारी पुन्हा विविध भागात पावसाने हजेरी लावली. हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव, डिग्रस कºहाळे, बासंबा, खानापूर परिसरात पाऊस झाला. कळमनुरीसह तालुक्यात करवाडी, म्हैसगव्हाण, नांदापूर, वारंगा फाटा, आखाडा बाळापूर, डोंगरकडा, पोत्रा भागात पावसाने हजेरी लावली. वसमतसह तालुक्यातील आडगाव रंजे परिसरात पावसाने हजेरी लावली. सेनगावसह तालुक्यातील मन्नास पिंपरी, औंढा तालुक्यातील पोटा शेळके परिसरात पावसाने हजेरी लावली. दुपारनंतर जिल्हाभर ढगाळ वातावरण होते. काही भागात रिमझिम तर काही भागात मुसळधार पाऊस पडला.

Web Title: Heavy rains in three districts of Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.