स्वस्त इंधनाकडे वाढता कल; सीएनजी कारसाठी औरंगाबादकर वेटिंगवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 06:54 PM2021-09-23T18:54:01+5:302021-09-23T19:01:06+5:30

CNG Pumps in Aurangabad : पेट्रोलपेक्षा सीएनजी स्वस्त असल्याने वाहन धारकांचा कल वाढत आहे

Growing trend towards cheaper fuels; Aurangabadkar waiting for CNG car | स्वस्त इंधनाकडे वाढता कल; सीएनजी कारसाठी औरंगाबादकर वेटिंगवर

स्वस्त इंधनाकडे वाढता कल; सीएनजी कारसाठी औरंगाबादकर वेटिंगवर

googlenewsNext
ठळक मुद्दे९ महिन्यांपर्यंत प्रतीक्षा सेमी कंडक्टरचा तुटवडा

- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : पेट्रोलपेक्षा ( Petrol - Diesel Fuel ) कॉम्प्रेस्ट नॅचरल गॅस (CNG) ३७ रुपयांनी स्वस्त असल्याने आणि शहरात ४ सीएनजी पंप सुरू झाल्याने आता जनतेचा कल सीएनजी कारकडे वाढू लागला आहे. परिणामी विविध मॉडेलच्या सीएनजी कार खरेदीसाठी २ ते ९ महिन्यांपर्यंत प्रतीक्षा यादी तयार झाली आहे. ( Growing trend towards cheaper fuels; Aurangabadkar waiting for CNG car) 

पेट्रोल, डिझेल वाहनांमुळे होणारे वायू प्रदूषण ( Air Pollution ) कमी करण्यासाठी शहरात सीएनजीवर धावणाऱ्या कार दोन कंपन्यांनी उपलब्ध केल्या आहेत. यात मारुती-सुझुकी व ह्युंदाई या कंपन्यांचा समावेश आहे. मारुतीने चार, तर ह्युंदाईने तीन सीएनजी मॉडेल बाजारात उतरविले आहेत. शहरात ८ सीएनजी पंप सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यातील ४ सीएनजी पंप सुरू झाले आहेत. दोन्ही इंधनांवर कारचा ‘ॲव्हरेज’ सारखाच मिळत आहे. शिवाय पेट्रोलच्या तुलनेत सीएनजी ३७.२५ रुपयांनी स्वस्त मिळत असल्याने ग्राहक आता पेट्रोल प्लस सीएनजी असलेल्या कार खरेदीसाठी पुढे येऊ लागले आहेत. अहमदनगर येथून सीएनजी पाइपलाइन बीड बायपास ओलांडून शेंद्राकडे गेली आहे. लवकरच पाइपलाइन शहरात येईल तेव्हा सीएनजी सर्व पेट्रोलपंपांवर उपलब्ध होईल, तेव्हा सीएनजीची किंमत आणखी कमी होईल. पेट्रोलला सीएनजी पर्याय उपलब्ध झाल्याचे मत ग्राहकांनी व्यक्त केले.

हेही वाचा - औरंगाबादमध्ये ऑनर किलिंग ? वडिलांनीच खड्डा खोदून पुरला मुलीचा मृतदेह 

सेमी कंडक्टरचा तुटवडा
सीएनजी कारसाठी सेमी कंडक्टरचा वापर होतो. मलेशियातून ते आयात करावे लागते. मात्र, तिथे लॉकडाऊन असल्याने आयात कमी झाली आहे. यामुळे देशात सीएनजी कारच्या उत्पादनावर परिणाम झाला. याशिवाय मागणी वाढल्याने सीएनजी कार खरेदीसाठी ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत आहे.
- संदेश झांबड, अध्यक्ष चेंबर ऑफ ऑथोराइज ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन

पंप वाढल्यानंतर कारला मागणी वाढेल
देशात सीएनजीचे उत्पादन कमी आहे. जसजसे सीएनजी व पंपांची संख्या वाढेल तसतसे कारला मागणी वाढेल. सध्या सीएनजी कारला प्रतीक्षा आहे. पेट्रोल प्लस सीएनजी कार महाग आहे. यामुळे पेट्रोलवर चालणाऱ्या कारची विक्री काही कमी झाली नाही.
- राहुल पगारिया, माजी अध्यक्ष, चेंबर ऑफ ऑथोराइज ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन

लांब पल्ल्यासाठी सीएनजी कारचा वापर
पेट्रोलपेक्षा सीएनजी स्वस्त असल्याने जे नेहमी लांब पल्ल्याचा प्रवास करतात त्यांच्याकडून सीएनजी कारची मागणी वाढली आहे. सीएनजी कार लगेच मिळत नाही. मॉडेलनुसार १० ते ३६ आठवड्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे.
- बिनय पंजियार, शाखा व्यवस्थापक, ऑटोमोटिव्ह मारुती-सुझुकी

हेही वाचा - बिबी-का-मकबरा परिसरात दडले काय ? उत्खननात स्नानगृह, शौचालयाचा पाया उघडा

इंधनाचे दर(प्रतिलिटर) ॲव्हरेज (कार)
पेट्रोल १०८.६० रु. १२ ते २० कि.मी.
डिझेल ९७.५२ रु. १२ ते २० कि.मी.
सीएनजी ७१.३५ रु.(कि.ग्रॅ) २५ ते ३२ कि.मी.
एलपीजी ६१.८५ रु. (रिक्षासाठी) १९ ते ३५ कि.मी.

शहरात इंधन पंपांची स्थिती
पेट्रोल पंप - ४०
एलपीजी पंप-१३
सीएनजी पंप-४

Web Title: Growing trend towards cheaper fuels; Aurangabadkar waiting for CNG car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.