औरंगाबादचे मोठे यश ! जीवन गुणवत्तेत शहर देशामध्ये १३ व्या स्थानावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 11:38 AM2021-03-05T11:38:16+5:302021-03-05T11:40:50+5:30

Ease of Living Index केंद्र शासनाकडून २०१८ पासून सर्वेक्षणाला सुरुवात

Great success of Aurangabad! The city ranks 13th in the country in quality of life | औरंगाबादचे मोठे यश ! जीवन गुणवत्तेत शहर देशामध्ये १३ व्या स्थानावर

औरंगाबादचे मोठे यश ! जीवन गुणवत्तेत शहर देशामध्ये १३ व्या स्थानावर

googlenewsNext
ठळक मुद्दे औरंगाबादचे जीवनमान चंदीगड, नाशिक, नागपूर, पिंपरी चिंचवड, जयपूरपेक्षा चांगलेराहण्यायोग्य शहरांच्या यादीत औरंगाबाद ३४ व्या क्रमांकावर

औरंगाबाद : केंद्र सरकारकडून राहण्यायोग्य सर्वोत्तम शहरांची यादी गुरुवारी दुपारी (इज ऑफ लिव्हिंग इन्डेक्स) जाहीर करण्यात आली आहे. ऐतिहासिक औरंगाबाद शहराचा क्रमांक मागील वर्षी ६३ वा होता. अवघ्या वर्षभरात शहराने गरुड झेप घेत ३४ वे स्थान मिळविले. अत्यंत भूषणावह बाब म्हणजे नागरिकांच्या जीवन गुणवत्तेत शहराने चक्क १३ वे स्थान पटकावले.

''इज ऑफ लिव्हिंग इन्डेक्स'' पहिल्यांदा २०१८ मध्ये जारी करण्यात आला होता. या सर्वेक्षणात प्रशासन, शिक्षण, स्वच्छता आणि सुरक्षा यांसारख्या अनेक गोष्टींच्या आधारावर प्रश्न विचारले जातात. त्याचप्रमाणे गुणवत्ता, आर्थिक योग्यता, विकासाची स्थिरता या तीन गोष्टींचा विचार मुख्यत्वे केला जातो. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्री हरदीपसिंह पुरी, गृहनिर्माण आणि नगर विकास खात्याचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा, स्मार्ट सिटीज मिशनचे संचालक कुणाल कुमार आणि राहुल कपूर यांच्या उपस्थितीत गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वेगवेगळ्या शहरांची क्रमवारी घोषित करण्यात आली.

औरंगाबादला इज ऑफ लिव्हिंग इन्डेक्समध्ये एकूणच ३४ वा क्रमांक मिळाला आहे, जो नाशिक, रांची आणि जबलपूरसारख्या शहरांपेक्षा उच्च आहे. औरंगाबादची जीवनमान गुणवत्ता चंदीगड, नाशिक, नागपूर, पिंपरी चिंचवड आणि जयपूरसारख्या शहरांपेक्षा चांगली आहे. औरंगाबादचा सिटी स्कोअर ५२.९० आहे, जी सरासरी स्कोअर ५२.३८ च्या सिटी स्कोअरपेक्षा चांगला आहे. नगरपालिका कामगिरी निर्देशांकात औरंगाबाद १० लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ४७ व्या क्रमांकावर आहे. मुनिसिपल परफॉर्मन्स इंडेक्सचे परिणाम जाहीर करण्यात आले. यात औरंगाबादने देशात ४७ वा क्रमांक मिळवला. शहराने गव्हर्नन्स या निकषात चांगली कामगिरी केली आहे.

शहराची रँकिंग अत्यंत उत्साहवर्धक
केंद्र शासनाने घोषित केलेल्या रँकिंगबद्दल बोलताना मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय म्हणाले की, रँकिंग उत्साहवर्धक आहे आणि हे दाखवत आहे की मागच्या वर्षात मनपा, स्मार्ट सिटी आणि अन्य संस्थांद्वारे चांगले काम झालेले आहे. शहरातील विकासकामांचा वेग असाच कायम राहिला तर पुढच्या वर्षी यापेक्षा चांगल्या परिणामांची अपेक्षा करू शकतो.

सर्वेक्षणात कोणकोणत्या गोष्टींना महत्त्व
सर्वेक्षणात संस्थात्मक (इन्स्टिट्यूशनल), सामाजिक (सोशल), आर्थिक (इकॉनॉमिक) आणि भौतिक सुविधा (फिजिकल) असे चार प्रमुख निकष तपासले जातात. त्याचप्रमाणे शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, सुरक्षितता, रोजगार निर्मिती, वाहतूक, गृहनिर्माण, पाणी पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, प्रदूषण, वीजवापर, सार्वजनिक मोकळ्या जागा अशा इतर पूरक निकषांवर प्रमुख शहरांची काटेकोर तपासणी करण्यात येते. त्यासाठी, संबंधित शहरातील काही नागरिकांशी संवाद साधण्यात येतो. नागरिकांकडून ऑनलाइन स्वरूपातही शहरातील राहणीमानाच्या दर्जाविषयी त्यांची मते जाणून घेण्यात येतात. या सर्व माहितीचे विश्लेषण केल्यानंतर राहण्यायोग्य सर्वोत्तम शहरांची क्रमवारी निश्चित केली जाते.

Web Title: Great success of Aurangabad! The city ranks 13th in the country in quality of life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.