खुशखबर ! ‘आरबी’ समूहाचा ऑरिक सिटीमध्ये प्लांट उभारण्याचा आठवडाभरात निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 06:52 PM2020-08-07T18:52:34+5:302020-08-07T18:55:48+5:30

‘ऑरिक’मध्ये पहिल्या टप्प्यात ३५० कोटींची गुंतवणूक

Good news ! RB Group decides to set up plant in Auric City within a week | खुशखबर ! ‘आरबी’ समूहाचा ऑरिक सिटीमध्ये प्लांट उभारण्याचा आठवडाभरात निर्णय

खुशखबर ! ‘आरबी’ समूहाचा ऑरिक सिटीमध्ये प्लांट उभारण्याचा आठवडाभरात निर्णय

googlenewsNext
ठळक मुद्देतीन महिन्यांपूर्वी झाली होती चाचपणीआठवडाभरात उद्योग समूहाची बोर्ड मीटिंग  कंपनी दोन टप्प्यांत सातशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

- विजय सरवदे 

औरंगाबाद : घर, बाथरूम, कपडे स्वच्छ करण्यासाठी लागणारे हार्पिक, लायझॉल, डेटॉल, वॅनिश, फिनिश आदी आंतरराष्ट्रीय दर्जाची उत्पादने तयार करणाऱ्या रेकीट बेंकिजर (आरबी) या उद्योग समूहाच्या पुढील आठवड्यात होणाऱ्या बोर्ड मीटिंगमध्ये औरंगाबादेत प्लांट उभारण्याबाबत अंतिम निर्णय होणार आहे. 

यासंदर्भात आज गुरुवारी ऑरिकचे व्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव यांची ‘आरबी’ समूहाच्या अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा झाली. तीन महिन्यांपूर्वी या उद्योग समूहाच्या अधिकाऱ्यांनी ऑरिक सिटीमध्ये प्लांट उभारण्यासाठी चाचपणी केली होती. आज पुन्हा या अधिकाऱ्यांनी जाधव यांच्याशी चर्चा केली. तेव्हा औरंगाबाद जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे भविष्यात कंपनीला पाणीटंचाईचा सामना करावा लागेल, अशी त्या अधिकाऱ्यांनी शंका उपस्थित केली. तेव्हा व्यवस्थापकीय संचालक जाधव यांनी त्यांच्या शंकेचे निरसन केले.

औरंगाबादेत जायकवाडी जलाशय हे मोठे धरण आहे. मागील २० वर्षांत येथील उद्योगाला एक-दोन वेळेसच पाण्याची टंचाई जाणवली. येथे बहुराष्ट्रीय बीअर निर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. त्यांनाही कधीच पाणीटंचाई भासली नाही. पाणीटंचाईची भीती वाटत असेल, तर शेंद्रा-बिडकीन या औद्योगिक क्षेत्रात आम्ही चार-पाच तलाव विकसित करणार आहोत. तुम्ही त्यापैकी एक तलाव विकसित करा आणि टंचाईच्या काळात त्यातील पाण्याचा वापर करण्याचे जाधव यांनी सुचविले. शेवटी निसर्गापुढे कोणी काही करू शकत नाही. हे मुद्दे त्यांना पटले असून, आठवडाभरात या समूहाची बोर्ड मीटिंग होणार असून, त्यामध्ये औरंगाबाद येथे ऑरिक सिटीमध्ये प्लांट उभारण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असा विश्वास त्या अधिकाऱ्यांनी जाधव यांना दिला. ही कंपनी दोन टप्प्यांत सातशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

औरंगाबादची कार्यसंस्कृती जगात भारी
औरंगाबादच्या उद्योग क्षेत्राच्या कार्यसंस्कृतीची आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली ख्याती आहे. येथे उद्योगांत कधी टोळी युद्ध झाले नाही. कामगार संघटनांच्या हेकेखोरीमुळे उद्योगांमधील शांतता भंग झाली किंवा त्यामुळे इथला एखादा उद्योग बंद पडला, असे कधी झाले नाही. ही औरंगाबाद उद्योग क्षेत्राची जमेची बाजू आहे, हे मुद्दे गुंतवणूक करणाऱ्या उद्योगांना जास्त आवडलेले आहेत, असे व्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव यांनी सांगितले. 

‘एनएलएमके’च्या गुंतवणुकीवर शिक्कामोर्तब
‘नोव्होलिपेत्सक स्टील’ (एनएलएमके) या रशियातील सर्वात मोठ्या स्टील उद्योगाचे ‘ऑरिक’मध्ये प्रकल्प उभारण्यावर शिक्कामोर्तब झाले असून, करमाड रेल्वेस्टेशनच्या अलीकडे ऑरिकच्या बाजूला ४३ एकरवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. ही कंपनी या महिन्यातच जागेची रक्कम जमा करणार आहे. ट्रान्सफॉर्मरसाठी लागणारे विशेष स्टील ‘एनएलएमके’ ही कंपनी तयार करते. जगभरातील ३०-४० देशांत तसेच आपल्या देशातही ही कंपनी स्टीलचा पुरवठा करते. या कंपनीमुळे सुमारे दीड हजार स्थानिकांना रोजगार मिळेल तसेच निर्यातीलाही चालना मिळणार आहे. 

Web Title: Good news ! RB Group decides to set up plant in Auric City within a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.