रशिया-युक्रेन युद्धाने भारतीय गव्हाला सोन्याचा भाव; अस्सल शरबती गहू ५ हजार रुपये क्विंटलवर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 01:09 PM2022-05-13T13:09:29+5:302022-05-13T13:10:37+5:30

सध्या भारत १० प्रमुख देशांत गव्हाची निर्यात करीत आहे यामुळे किंमती आणखी वाढण्याची शक्यता

Gold price of Indian wheat due to Russia-Ukraine war; Genuine sharbati wheat at Rs. 5,000 per quintal | रशिया-युक्रेन युद्धाने भारतीय गव्हाला सोन्याचा भाव; अस्सल शरबती गहू ५ हजार रुपये क्विंटलवर

रशिया-युक्रेन युद्धाने भारतीय गव्हाला सोन्याचा भाव; अस्सल शरबती गहू ५ हजार रुपये क्विंटलवर

googlenewsNext

- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद :
सध्या वार्षिक धान्य खरेदीचा हंगाम अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. मात्र, यंदा मध्यम प्रकारचा गहू २७०० ते ३९०० रुपये क्विंटलपर्यंत विकत आहे. यामुळे ज्याच्या त्याच्या तोंडातून ‘गहू भयंकर महाग झाला आहे’, असेच उद्गार बाहेर पडत आहेत. असली शरबती तर हजार रुपयांनी वाढून ५ हजारापर्यंत गेला आहे. गव्हातील भाववाढीने आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढत नवीन उच्चांक गाठला आहे.

युद्धाने गहू उत्पादकांच्या हाती पैसा
रशिया-युक्रेन युद्धाचा संपूर्ण जगावर परिणाम झाला आहे. मात्र, हेच युद्ध भारतीय गव्हासाठी फायदेशीर ठरले आहे. आता तुम्ही म्हणाल की, त्या युद्धाचा व येथील गव्हाचा काय संबंध? जगात गहू निर्यातदार देशांमध्ये रशियाचा पहिला क्रमांक असून, युक्रेन पाचव्या स्थानावर आहे. या युद्धात गव्हाचे मोठे नुकसान झाले. यामुळे भारतीय गव्हाला मागणी वाढल्याने गव्हाच्या किमती वधारल्या.

कोणत्या देशात गव्हाची निर्यात
सध्या भारत १० प्रमुख देशांत गव्हाची निर्यात करीत आहे. यात बांगलादेश, श्रीलंका, यूएई, इंडोनेशिया, फिलिपाइन्स, येमेन, नेपाळ, कोरिया, कतार, ओमान या देशांचा समावेश आहे.

स्थानिक ठोक बाजारात गव्हाचे भाव
गव्हाचे प्रकार मे २०२१ (क्विंटल) मे २०२२
अस्सल शरबती ३८००-४००० रु. ४३००- ४७०० रु.
मिनी शरबती २२००-२८०० रु. २७००-३१०० रु.
लोकवन २१००-२६०० रु. २६००-३००० रु.
४९६ वाण २१००-२४०० रु. २५००-२९०० रु.

हलक्या प्रतीच्या गव्हाचा रवा, मैदा, आटा
हलक्या प्रतीचा गहू मागील वर्षी २००० रुपये क्विंटलने विकला होता. यंदा तोच २४०० ते २५०० ला आहे. रवा, मैदा, कणिक तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. हा गहू महागल्याने रवा, मैदा, पीठही महागले आहे.
- नीलेश सोमाणी, गव्हाचे व्यापारी

गहू आणखी महागणार
दर महिन्याला निर्यात वाढत आहे. सरकारी गोदामात यंदा तुटवडा राहणार आहे. युद्ध कधी संपणार, माहीत नाही. युद्ध संपले तरी पूर्वपदावर परिस्थिती येण्यास किती काळ लागेल, हे माहिती नाही. यामुळे पुढील दोन ते तीन वर्षे भारतीय गव्हाला विदेशातून मागणी राहील. यामुळे किमतीत आणखी वाढ होऊ शकते.
- जगदीश भंडारी, गव्हाचे व्यापारी

Web Title: Gold price of Indian wheat due to Russia-Ukraine war; Genuine sharbati wheat at Rs. 5,000 per quintal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.