मातीतून निघालेले सोने मातीतच...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 01:53 PM2019-11-07T13:53:06+5:302019-11-07T13:54:21+5:30

जुई नदीकाठावरील शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान

Gold like crop emitted from the soil is vanished in soil... | मातीतून निघालेले सोने मातीतच...!

मातीतून निघालेले सोने मातीतच...!

googlenewsNext
ठळक मुद्देअतिवृष्टीचा शेतकऱ्यांना फटका 

- रघुनाथ सावळे

उंडणगाव (जि. औरंगाबाद) : सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव परिसरात तळहाताच्या फोडांप्रमाणे जगविलेली पिके अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत नदीच्या पुरात वाहून गेली. मातीतून निघालेले सोने मातीतच मिसळल्याने येथील बळीराजा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून, सध्या परिसरात प्रशासनाच्या वतीने पंचनामे सुरू असले तरी आर्थिक मदत मिळणार कधी, याकडे हजारो शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

जवळपास २० दिवसांपासून परिसरात कधी रिमझिम तर कधी जोरदार वृष्टी झाल्याने येथील मका, कापूस, बाजरी, सोयाबीन, ज्वारी आदी पिके हातातून गेली. सध्या येथील बहुतांश शेतांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले असून, विशेषत: येथील जुई नदीकाठी राहणाऱ्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा अधिक फटका बसला आहे. नदीने रौद्ररूप धारण करून काठावरील मका, सोयाबीन, भाजीपाला ही सर्वच्या सर्व पिके आपल्या कवेत घेतल्याने बळीराजा अक्षरश: रस्त्यावर आला आहे.

उंडणगावसह खुल्लोड, विरगाव, वसई, जळकी, खंडाळा, मोहाळ आदी गावांत शेतकऱ्यांनी काढणी केलेले मक्याचे पीक अक्षरश: कुजले असून, कपाशीच्या कैऱ्यांना झाडावरच कोंब फुटले. तसेच सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मिरची, अद्रक आदी पिकांचे मातेरे झाले.  शेतांमध्ये पाणी साचलेले असल्याने येणाऱ्या रबी हंगामात पीक कसे येणार, या चिंतेत शेतकरी सापडला आहे.

गतवर्षी ११० क्विंटल पीक, यावर्षी मात्र हाती भोपळा 
उंडणगाव येथील महिला शेतकरी तान्हाबाई विठ्ठल नरवडे म्हणाल्या, गतवर्षी आम्ही मक्याचे ११० क्विंटल पीक घेतले होते. मात्र, यावर्षी अवकाळी पावसाने पूर्ण मका उद्ध्वस्त झाल्याने एक किलोभराही पीक शिल्लक राहिले नाही. याबाबत मक्यावर केलेला खर्चही निघणार नसल्याने पतीने या पिकासाठी घेतलेले कर्ज, उसनवारी कशी फेडणार याची सध्या चिंता आहे. 

नुकसानीचे आकडे मोठे 
परिसरातील जवळपास १०० टक्के पिकांचे नुकसान झाले असून, नुकसानीचे आकडे हे खूपच मोठे आहेत. त्याचे गणित लावणे अशक्यच आहे. एकीकडे बळीराजा संकटात असताना महसूल व कृषी विभागाच्या वतीने पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. मात्र, सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय पेचामुळे नुकसानभरपाई मिळेल किंवा नाही, याबाबत शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला.

Web Title: Gold like crop emitted from the soil is vanished in soil...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.