शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने केली मराठवाड्याच्या विकासाची पायाभरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 05:55 PM2020-01-23T17:55:30+5:302020-01-23T18:01:09+5:30

जेथे पारंपरिक शिक्षणाचीच वानवा, अशा मराठवाड्याच्या प्रतिभेची पताका शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामुळे जगभरात फडकली. गेल्या ६० वर्षांत अनेक अडचणींवर मात करून हे महाविद्यालय नावारूपाला येतानाच स्वत:लाही तंत्रज्ञानात अद्ययावत करीत राहिले. येथून बाहेर पडलेल्या अभियंत्यांनी विविध क्षेत्रांत आपल्या कार्यशैलीचा अमीट ठसा उमटविला. हीरक महोत्सवानिमित्त ‘लोकमत’ने जागविलेल्या या आठवणी...

The foundation stone for the development of Marathwada by the Government Engineering College Aurangabad | शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने केली मराठवाड्याच्या विकासाची पायाभरणी

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने केली मराठवाड्याच्या विकासाची पायाभरणी

googlenewsNext
ठळक मुद्देजायकवाडीसह शेकडो सिंचन प्रकल्पांच्या उभारणीत तांत्रिक साहाय्यऔरंगाबादेतील उद्योगांना पुरविले कुशल मनुष्यबळ

- राम शिनगारे  

औरंगाबाद : मराठवाड्याच्या विकासाची पायाभरणीच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (जिका) विद्यार्थ्यांनी केली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. महाकाय जायकवाडी धरणाच्या उभारणीत तांत्रिक साहाय्य करीत ‘जिका’च्या विद्यार्थ्यांनी मोठे योगदान दिले. १९७२ च्या दुष्काळानंतर उभारण्यात आलेल्या बहुतांश सिंचन प्रकल्पांत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी खारीचा वाटा उचलला, तसेच  १९७० च्या काळातच औरंगाबादेत औद्योगिक कंपन्या येण्यास सुुरुवात झाली. या कंपन्यांमध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक अधिकारी, कर्मचारी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांचे विद्यार्थीच होते. त्यामुळे मराठवाड्याच्या विकासाची पायाभरणी करणाऱ्या प्रत्येक प्रकल्पात ‘जिका’च्या माजी विद्यार्थ्यांचा वाटा असल्याची माहिती उद्योजक तथा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या गर्व्हनिंग कौन्सिलचे अध्यक्ष विवेक भोसले यांनी दिली.

१९६० साली ८३ विद्यार्थ्यांनी सुरुवात; आतापर्यंत घडविले उच्च दर्जाचे १६ हजार अभियंते

मराठवाड्यातील पहिल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना १९६० साली करण्यात आली. हे महाविद्यालय ज्या इमारतींमध्ये सुरू झाले, ती इमारत पॉलिटेक्निक महाविद्यालयासाठी बांधण्यात आली होती. १९६०-६१ या शैक्षणिक वर्षात सुरू झालेली पहिली बॅच १९६३ साली शिक्षण घेऊन बाहेर पडली. त्यावेळी अभियांत्रिकीचे शिक्षण हे तीन वर्षांचे होते. सुरुवातीच्या काळात विद्यार्थ्यांना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध नव्हत्या. तरीही मराठवाड्यातील विद्यार्थी जिद्दीने अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होते. जायकवाडी प्रकल्प उभारण्यास सुरुवात झाली होती. या प्रकल्पावर छोटी-छोटी तांत्रिक कामे, विभाग सांभाळण्यासाठी सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल विभागातील उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने गरज होती. सिव्हिलमधील विद्यार्थी तात्काळ बांधकाम विभागात दाखल होत होती. यातील उर्वरित विद्यार्थी सिंचन विभागात म्हणजेच जायकवाडी प्रकल्पावर कामासाठी रुजू होत.

शासकीय अभियांत्रिकीच्या शेकडो विद्यार्थ्यांनी जायकवाडीच्या प्रकल्पात रात्रंदिवस मेहनत घेतली आहे. १९७० ते ७५ या काळात मोठ्या दुष्काळाला सामोरे जावे लागले. या काळात रोजगार हमीसह इतर कामे शासनाने सुरू केली होती. या कामांमध्ये रस्त्याची आणि सिंचनाची कामे मोठ्या संख्येने होती. ही कामे तांत्रिकदृष्ट्या योग्य करून घेण्याची जबाबदारी अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपासून शासकीय नोकरी लागलेल्या माजी विद्यार्थ्यांनी पार पाडली असल्याचेही विवेक भोसले यांनी सांगितले. त्यामुळे मराठवाड्यातील शेती, उद्योगासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा मोठा वाटा आहे.

'जीका'तील अभियंत्यांचा राजकारणाकडे नव्हे; व्यवसाय, उद्योग, नोकरीकडे ओढा

उद्योगांना पुरविले कुशल मनुष्यबळ
औरंगाबाद शहरातील औद्योगिक वसाहतींमध्ये जायकवाडीचे काम वेगाने सुरू झाल्यानंतर अनेक उद्योग येऊ लागले होते. यामध्ये १९७०-७१ मध्ये एपीआय, इंडियन टूल, ग्रिव्ह्यूज, फोर्ब्स, सेन्ट्रॉन या कंपन्यांचा समावेश होतो. या कंपन्यांमध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल विभागात बहुतांश विद्यार्थी हे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे होते. या कंपन्यांच्या नंतर औरंगाबादेत मोठ्या संख्येने उद्योग आले. त्यामध्ये बिर्ला केनामेटल, कॉस्मो, जॉन्सन, बागला ग्रुप, औरंगाबाद इलेक्ट्रिकल्स, वोखार्ड आदी कंपन्या वाळूज एमआयडीमध्ये दाखल झाल्या. या कंपन्यांनाही मोठ्या संख्येने कुशल मनुष्यबळ याच महाविद्यालयातून पुरविण्यात आले असल्याचेही विवेक भोसले यांनी सांगितले.

Web Title: The foundation stone for the development of Marathwada by the Government Engineering College Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.