शेतकऱ्यांच्या तणामुक्तीसाठी चारा छावण्यांमध्ये फुटबॉल, व्हॉलीबॉलसह ध्यानाचे धडे

By गजानन दिवाण | Published: May 22, 2019 08:01 AM2019-05-22T08:01:01+5:302019-05-22T08:01:01+5:30

बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत प्रशासनाचे पाऊल

Fodder medicines with soccer, volleyball in the fodder camps to relieve farmers | शेतकऱ्यांच्या तणामुक्तीसाठी चारा छावण्यांमध्ये फुटबॉल, व्हॉलीबॉलसह ध्यानाचे धडे

शेतकऱ्यांच्या तणामुक्तीसाठी चारा छावण्यांमध्ये फुटबॉल, व्हॉलीबॉलसह ध्यानाचे धडे

googlenewsNext

- गजानन दिवाण

औरंगाबाद : दुष्काळाच्या संकटात अन्नदात्याचा आत्मविश्वास कमी होऊ नये, अपराधाची भावना निर्माण होऊ नये, तो तणावमुक्त राहावा यासाठी प्रशासनाने चारा छावण्यांमधील वातावरण हसते-खेळते ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. फुटबॉल, व्हॉलीबॉलपासून क्रिकेटपर्यंत आणि आरोग्यापासून ध्यानधारणेपर्यंतचे विविध उपक्रम बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतील चारा छावण्यांमध्ये राबविले जात आहेत.  

मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत सद्य:स्थितीत ७१९ चारा छावण्या सुरू आहेत. यातून चार लाख ८५ हजार ८७० जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न मिटला आहे. छावण्यांमध्ये आपल्या जनावरांसोबत एक माणूस राहणे आवश्यक आहे. छावण्यांवर जनावरांसोबत राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक आहे. या शेतकऱ्याने स्वत:च्या गावापासून दूर या छावणीत दिवसभर काय करायचे? अशावेळी दुष्काळी परिस्थितीच्या विचारातून त्याने खचून जाऊ नये, छावणीवरच त्याचे मन रमावे यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दोन दिवसांपूर्वी मराठवाड्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. अधिकाधिक उपक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवायला हवा, अशा सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

काही छावण्यांमध्ये विविध संस्थांच्या माध्यमातून, तर काही छावण्यांमध्ये मालकांतर्फे शेतकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. फुटबॉल, व्हॉलीबॉल, क्रिकेट आदी खेळाचे साहित्य उपलब्ध करून दिले आहे. जगभरातील घडामोडी कळाव्यात म्हणून छावण्यांवर डीटीएचसह टीव्हीची व्यवस्था करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे आरोग्य तपासणी शिबीर, वेगवेगळ्या पिकांसंदर्भात प्रशिक्षण शिबीर आयोजित केले जात आहेत. अनेक ठिकाणी लेझीम खेळले जाते. काही ठिकाणी भजन, प्रवचनाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. छावण्यांवर पथनाट्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जागृती केली जात आहे. वातावरण प्रफुल्लित ठेवण्यासाठी अनेक छावण्यांवर फुगे लावण्यात आले आहेत. घरकर्ता जनावरांसोबत छावण्यांवर गेल्याने गावात स्वस्त धान्य दुकानातील साहित्य घरपोच देण्याची व्यवस्था लवकरच केली जाणार आहे. 

मराठवाड्यातील चारा छावण्या
जिल्हा        छावण्या        छावण्यांतील जनावरे
बीड        ५९९        ३,९६,८८४
उस्मानाबाद    ८७        ६२,२८७
जालना        १८        ११,०८७
औरंगाबाद    १५        १५,६१२
(लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत एकही चारा छावणी सुरू झालेली नाही. लातूर, हिंगोली आणि परभणीतून एकही प्रस्ताव नाही, तर नांदेडमध्ये छावणीसाठी केवळ दोन प्रस्ताव आहेत.)

ग्रामगीतेतून प्रबोधन 
जिल्ह्यातील चारा छावण्यांवर भजन, कीर्तनासह आता ग्रामगीतेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रबोधन केले जाणार आहे. विविध कार्यक्रम आणि प्रशिक्षणातून शेतकऱ्यांना मानसिक बळ देण्याचा आमचा प्रयत्न आहे. 
- आस्तिक कुमार पांडेय, जिल्हाधिकारी, बीड 

ध्यानधारणा आणि प्रशिक्षण
शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी छावण्यांवर ध्यानधारणा शिबीर घेतले जात आहे. शिवाय परंडा परिसरात तुलनेने पाणी जास्त असल्याने उसाचे क्षेत्र अधिक आहे. उसाऐवजी कमी पाण्याचे पीक म्हणून शेतकऱ्यांनी हळद-अद्रककडे वळावे यासाठी छावण्यांवरच प्रशिक्षण दिले जात आहे. 
- दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हाधिकारी, उस्मानाबाद
 

Web Title: Fodder medicines with soccer, volleyball in the fodder camps to relieve farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.