नादूरुस्त व्हेंटीलेटरप्रकरणी गुन्हा दाखल करा, राष्ट्रवादीचे आमदार संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 04:09 PM2021-05-13T16:09:48+5:302021-05-13T16:11:19+5:30

औरंगाबादमधील खासगी आणि घाटीतील तब्बल ३६ व्हेंटिलेटर रुग्णांसाठी कुचकामीच ठरले. अन्य जिल्ह्यांत गेलेल्या ५५ व्हेंटिलेटरची काय अवस्था असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

File a case in case of faulty ventilator, NCP MLA satish chavan angry | नादूरुस्त व्हेंटीलेटरप्रकरणी गुन्हा दाखल करा, राष्ट्रवादीचे आमदार संतप्त

नादूरुस्त व्हेंटीलेटरप्रकरणी गुन्हा दाखल करा, राष्ट्रवादीचे आमदार संतप्त

googlenewsNext
ठळक मुद्देसध्या जिल्ह्यातील ४१४ व्हेंटिलेटरही कमी पडत आहेत. केंद्र शासनाकडून प्राप्त व्हेंटिलेटर सुसज्ज असते, तर ५०० हून अधिक व्हेंटिलेटर कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध झाले असते

औरंगाबाद : पीएम केअर फंडातून घाटीला मिळालेल्या १५० पैकी ८६ व्हेंटिलेटर शहरातील ४ खासगी रुग्णालयांना आणि अन्य ४ जिल्ह्यांना देण्यात आले. शहरातील ४ खासगी रुग्णालयांना दिलेल्या ३१ पैकी २२ व्हेंटिलेटर नादुरुस्त असून, वापराविनाच पडून असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या व्हेंटिलेटरचा रुग्णांना एकदाही वापर झालेला नाही. घाटीतील १४ व्हेंटिलेटरही नादुरुस्त असल्याची कबुली खुद्द घाटी प्रशासनाने दिली. त्यानंतर, पदवीधर मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते सतिश चव्हाण हे आक्रमक झाले असून संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.  

औरंगाबादमधील खासगी आणि घाटीतील तब्बल ३६ व्हेंटिलेटर रुग्णांसाठी कुचकामीच ठरले. अन्य जिल्ह्यांत गेलेल्या ५५ व्हेंटिलेटरची काय अवस्था असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच, या नादूरुस्त व्हेंटीलेटरप्रकरणी आमदार सतिश चव्हाण आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. ''औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाला पीएम केअर फंडातून पुरविण्यात आलेले व्हेंटिलेटर निरूपयोगी असल्याने या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी व्हावी व व्हेंटिलेटर पुरविणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आ. चव्हाण यांनी केली आहे. घाटी रुग्णालयात दाखल होणाऱ्या गंभीर कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे घाटीला व्हेंटिलेटरची गरज जास्त आहे. परंतु, मिळालेले व्हेंटिलेटर इतरांना वाटण्यात आले. वापरण्यायोग्य नसताना ते खासगी रुग्णालयांना देऊन प्रशासन मोकळे झाले. असे सदोष व्हेंटिलेटर परत पाठविणे, त्यांच्या दर्जाची चौकशी करण्याऐवजी रुग्णांना वापरण्याचा जीवघेणा अट्टाहास का केला जात आहे, कोणासाठी केला जात आहे, असाही प्रश्न निर्माण होत आहे.

सध्या जिल्ह्यातील ४१४ व्हेंटिलेटरही कमी पडत आहेत. केंद्र शासनाकडून प्राप्त व्हेंटिलेटर सुसज्ज असते, तर ५०० हून अधिक व्हेंटिलेटर कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध झाले असते. जिल्ह्यात २ महिन्यांत कोरोनामु‌‌ळे १,५०० अधिक रुग्ण दगावले आहेत. त्यातील अनेकांना वेळेत व्हेंटिलेटर, बेड व ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकला नाही. अशी भयावह परिस्थिती एकीकडे असताना पीएम केअर फंडातून मिळालेले ५० व्हेंटिलेटर घाटीमध्ये धूळखात पडलेले आहेत. दुसरीकडे व्हेंटिलेटर असूनही ते नादुरुस्त आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल २०२० मध्ये पीएम केअर फंडाची स्थापना करून यात दानशूरांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. यात नागरिक, उद्योजक, सेलिब्रेटींनी पुढाकार घेत मदत केली. यातूनच कोरोना उपचार साधने घेण्यात आली. त्यात व्हेंटिलेटरचादेखील समावेश होता.

‘सुपर स्पेशालिटी’त व्हेंटिलेटर पडून

१५० पैकी ‘धवन-३’ची ५० व्हेंटिलेटर सुपर स्पेशालिटी ब्लाॅकच्या इमारतीत पडून आहेत. या व्हेंटिलेटरची खोकीही उघडण्यात आलेली नाहीत. एकीकडे रुग्णसंख्येमुळे घाटीतही अनेकांना व्हेंटिलेटर मिळत नाही, तर दुसरीकडे व्हेंटिलेटर मिळूनही त्याचा काहीही उपयोग होत नाही.

व्हेंटिलेटरच्या दर्जाचा प्रश्न

प्राप्त व्हेंटिलेटर हे वापरण्यायोग्य नसल्याचे काही तज्ज्ञांनी स्पष्टपणे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. हे व्हेंटिलेटर वापरण्यायोग्य होते तर मग घाटीतच का नाही वापरले. कारण, घाटी प्रशासनाला व्हेंटिलेटरच्या अवस्थेची कल्पना पहिल्याच दिवशी आली होती.

कोणत्या आधारावर वाटप? काय गौडबंगाल?

खासगी रुग्णालयांना कोणत्या आधारावर व्हेंटिलेटर देण्यात आले, याची स्पष्टता कोणीही करत नाही. खासगी रुग्णालयांनी मागणी केली असेल तर मग त्यांना पीएम फंडातील आणि घाटीने नाकारलेले व्हेंटिलेटरच का देण्यात आले, व्हेंटिलेटर देताना त्यांच्या अवस्थेची माहिती खासगी रुग्णालयांना देण्यात आली का, व्हेंटिलेटर वाटपाची माहिती गुप्त का ठेवण्यात आली. यामागे काय गौडबंगाल आहे, हा प्रश्न निर्माण होत आहे.

१४ महिन्यांत सिस्टीम लागलीच नाही

गेल्या १४ महिन्यांपासून कोरोना प्रादुर्भावाला सामोरे जावे लागत आहे. विभागीय आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालय, आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक, अधिष्ठाता, अशी कार्यालये आणि वरिष्ठ अधिकारी शहरात आहेत. तरीही व्हेंटिलेटर कसे आहेत, त्यांची खरी गरज कोणाला आहे, कोणाला किती दिले, यावर देखरेख ठेवून वाटप करण्याची सिस्टीम अद्यापही लागलेली नाही.

इंजिनिअर घाटीत दाखल

घाटीत बंद अवस्थेत असलेल्या १४ व्हेंटिलेटरची तपासणी करण्यासाठी बुधवारी इंजिनिअर आले आहेत. हे व्हेंटिलेटर दुरुस्त झाले तरच सध्या खोक्यात बंद असलेल्या ५० व्हेंटिलेटर वापरण्याचा विचार केला जाईल, असे अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर यांनी सांगितले.

गुजरातमध्ये धमन व्हेंटिलेटर पडले होते वादात

गुजरातच्या ज्योती सीएनसी या कंपनीने बनवलेल्या धमन-१ व्हेंटिलेटर रुग्णांसाठी उपयोगी ठरत नसल्याचे मे २०२० मध्ये अहमदाबादमधील सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या निदर्शनास आले होते. राजकोटमधील या कंपनीबाबत एक पत्र डॉक्टरांनी उपमुख्यमंत्र्यांना लिहिले होते. कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढ्यात अतिमहत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या व्हेंटिलेटरवरून गुजरातमध्ये वाद सुरू झाला होता. या व्हेंटिलेटरवरून तेव्हा तेथे चांगलेच राजकारण पेटले होते.
 

Web Title: File a case in case of faulty ventilator, NCP MLA satish chavan angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.