परीक्षा पूर्वीप्रमाणे 'ऑफलाईन'; ‘ऑनलाईन’ शिक्षणाच्या मानसिकतेतून बाहेर निघावे लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2021 05:56 PM2021-11-13T17:56:03+5:302021-11-13T18:03:14+5:30

Uday Samant: आता परिस्थिती निवळत आहे. त्यासाठी ऑफलाईन शिक्षण पद्धत गरजेची आहे.

Exam as before 'offline'; We have to get out of the mindset of 'online' education | परीक्षा पूर्वीप्रमाणे 'ऑफलाईन'; ‘ऑनलाईन’ शिक्षणाच्या मानसिकतेतून बाहेर निघावे लागेल

परीक्षा पूर्वीप्रमाणे 'ऑफलाईन'; ‘ऑनलाईन’ शिक्षणाच्या मानसिकतेतून बाहेर निघावे लागेल

googlenewsNext

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ऑनलाईन शिक्षण व ऑनलाईन परीक्षेचा निर्णय घेतला होता. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. त्यामुळे महाविद्यालये उघडण्याचा निर्णय घेतला असून, परीक्षाही पूर्वीप्रमाणे ऑफलाईनच घेतल्या जातील (Exam as before 'offline'). ‘ऑनलाईन’च्या मानसिकतेतून सर्वांनी बाहेर निघावे, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात शुक्रवारी ‘उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ औरंगाबाद’ हा जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, या विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, आमदार अंबादास दानवे, आमदार विक्रम काळे, कुलगुरु डॉ. प्रमोद येवले, प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, उच्चशिक्षण संचालक डॉ. धनराज माने, तंत्रशिक्षण अभय वाघ, सहसचिव दत्तात्रय कहार, सहसचिव डॉ. रणजितसिंह निंबाळकर, डॉ. महेश शिवणकर, मंत्रालयातील कक्ष अधिकारी उपस्थित होते.

यावेळी सामंत म्हणाले, आता परिस्थिती निवळत आहे. त्यासाठी ऑफलाईन शिक्षण पद्धत गरजेची आहे. पारंपरिक अध्यापन-अध्ययन झाले पाहिजे. प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमध्ये संवाद घडला पाहिजे. यासाठी महाविद्यालये व विद्यापीठ विभागात शंभर टक्के लसीकरण झाले पाहिजे. यामध्ये प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी लसीकरण करुन घेणे गरजेचे आहे. प्रामुख्याने प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी ज्यांनी लसीकरण केलेले नसेल, त्यांच्या संदर्भात कुलगुरुंनी निर्णय घेतला पाहिजे. संतपीठात ७५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. विद्यापीठाचे हे संतपीठ देशातील अग्रेसर होईल, अशी अपेक्षा आहे. विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण मार्चपूर्वी आपण करु.

या विद्यापीठ कार्यक्षेत्रांतर्गत सातव्या वेतन आयोगाची आतापर्यंत १,०६९ प्रकरणे प्रलंबित होती. आज या कार्यक्रमामुळे फक्त ३२ प्रकरणे प्रलंबित राहिलेली आहेत. अनुकंपा तत्वावरील नियुक्तीची प्रकरणे ३८ होती. यापैकी ३२ प्रकरणे निकाली निघाली. सेवानिवृत्तीची १९२ प्रकरणे होती. शंभर टक्के ही प्रकरणे मार्गी लागली. सेवा उपदानाची सर्व १७८ प्रकरणे निकाली निघाली. वर्षभरात ३,७६९ प्रकरणांपैकी आजपर्यंत ३,४५८ प्रकरणे मार्गी लागली आहेत. हे या उपक्रमाचे फलित आहे, असे उदय सामंत म्हणाले.

व्यासपीठावर मांडले गाऱ्हाणे
यावेळी तक्रारदारांनी व्यासपीठावर जाऊन मंत्री व अधिकाऱ्यांसमोर तक्रारी मांडल्या व निवेदन सादर केले. तेव्हा उदय सामंत यांनी प्रत्येकाच्या तक्रारींचे निवारण केले. यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाला प्रकुलगुरु ना हरकत देत नाहीत, अशी तक्रार जे. के. जाधव यांनी केली. तेव्हा सामंत यांनी प्रकुलगुरुंची चांगलीच कानउघाडणी केली. नागराज गायकवाड यांनी कुलसचिवांविरुद्ध शपथपत्राद्वारे तक्रार दाखल केली व आरोप चुकीचा निघाल्यास आपणास विद्यापीठ गेटसमोर फाशी द्यावी, अशी मागणी केली. तेव्हा शिक्षण संचालकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. या कार्यक्रमात अनुकंपा तत्वावर १० जणांना विविध महाविद्यालयांमध्ये नियुक्ती आदेश देण्यात आले.
 

Web Title: Exam as before 'offline'; We have to get out of the mindset of 'online' education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.