प्रत्येकाच्या मनात एक सुसंस्कृत माणूस असतोच; तो माणूस सतत जागृत ठेवण्याची सध्या गरज...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 02:33 PM2020-03-09T14:33:44+5:302020-03-09T14:36:40+5:30

वीरशैव, जैन, सूफी तत्त्वज्ञान, महानुभाव, संत साहित्यावर सतत चिंतन, मनन, संशोधन करून विपुल लेखन करणारे डॉ. यु. म. पठाण यांनी त्यांच्या ९० वर्षांच्या जीवन प्रवासातील कडूगोड आठवणींची गाठोडी ‘लोकमत’साठी अक्षरश: खुली केली.

Everyone has a cultured person in mind; The man needs to be constantly awake ... : Y.M. Pathan | प्रत्येकाच्या मनात एक सुसंस्कृत माणूस असतोच; तो माणूस सतत जागृत ठेवण्याची सध्या गरज...

प्रत्येकाच्या मनात एक सुसंस्कृत माणूस असतोच; तो माणूस सतत जागृत ठेवण्याची सध्या गरज...

googlenewsNext
ठळक मुद्दे१९६० मध्ये मी मराठवाडा विद्यापीठात रुजू झालो देशाच्या हितासाठी आपण सर्वांनीच एकत्र आले पाहिजे. मला सतत चांगलीच माणसं मिळत गेली

- शांतीलाल गायकवाड 

औरंगाबाद : प्रत्येकाच्या मनात एक सुसंस्कृत माणूस दडलेला असतोच. तो माणूस सतत जागृत ठेवण्याचीच सध्या गरज आहे. पठाण नावाचा कुणी तरी एक माणूस महाराष्ट्रात फिरून आवाहन करतो काय अन् त्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपल्या देवघरातून पुजल्या जाणाऱ्या प्राचीन हस्तलिखितांच्या पोथ्या लोक सहज काढून देतात काय? कशाच्या भरवशावर विचार करा. मराठा समाजात किती एकात्मता आहे. हीच एकात्मता व धर्म पुन्हा एकदा जोडण्याची गरज आहे, असे प्रांजळ मत संत साहित्याचे गाढे अभ्यासक पद्मश्री डॉ. यु. म. पठाण यांनी व्यक्त केले. 

वीरशैव, जैन, सूफी तत्त्वज्ञान, महानुभाव, संत साहित्यावर सतत चिंतन, मनन, संशोधन करून विपुल लेखन करणारे डॉ. यु. म. पठाण यांनी त्यांच्या ९० वर्षांच्या जीवन प्रवासातील कडूगोड आठवणींची गाठोडी ‘लोकमत’साठी अक्षरश: खुली केली. आपल्या आयुष्यातील सर्वोच्च क्षण व त्याच्या आठवणीही त्यांनी सांगितल्या.

ते म्हणाले, माझा जन्म करमाळ्याचा. घरातील वातावरण मराठमोळं. वडील मामलेदार होते. त्यांचा विविध धर्मांवर अभ्यास होता. नोकरीनिमित्त ते सतत फिरतीवर असत व सोबत आम्हीही. बालपणीच रावेर, निफाड, नाशिक, धुळे, महाड असा महाराष्ट्र फिरलो. त्यामुळे माणसे पाहता आली. वडिलांनी खूपच प्रोत्साहन मला दिले. त्या काळात देव मामलेदार खूप प्रसिद्ध होते. माझे वडीलही त्याचप्रमाणे प्रसिद्ध होते. तसे पाहिले तर माझे कुटुंब उच्चशिक्षित व सुसंस्कृत होते. माझे आजोबा (आईचे वडील) त्याकाळात लोकप्रिय डॉक्टर होते. मामा शिक्षण संचालक होते. यांचे संस्कार माझ्यावर झाले. माझे कुटुंब मोठे होते. आम्ही ८ भावंडे. त्यात तीन बहिणी व पाच भाऊ. दोन भाऊ सहकार खात्यात जॉइंट रजिष्ट्रार व एक भाऊ कलेक्टर झाला. त्यात मी सर्वांत मोठा. वडिलानंतर भावांच्या संगोपनाची जबाबदारी मी घेतली. १९५३ मध्ये मी सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झालो तेव्हा मला पहिला पगार मिळाला होता अवघे ३०० रुपये; परंतु कुटुंबासाठी ते पुरेसे होते. 

कृतार्थ मी... मी निष्ठेने काम केले व समाजाने मला खूप-खूप प्रेम दिले

१९६० मध्ये मी मराठवाडा विद्यापीठात रुजू झालो व त्यानंतरच खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात झाली. मराठवाडा ही संतांची भूमी. येथील जनमानसात अनेक महत्त्वाची हस्तलिखिते होती. ही हस्तलिखिते जमा करण्याचे मी ठरविले. तब्बल पाच हजार हस्तलिखिते जमा करून विद्यापीठाच्या ग्रंथालयात ठेवली. पठाण याचे काय करतील, असे कधी कुणाला वाटले नाही. हा ठेवा अभ्यासण्यासाठी देश-विदेशातून अभ्यासक येतात. माझ्यासारख्या माणसाने केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद लोकांनी दिला. देवघरातील पोथ्या मला काढून दिल्या. ते केवळ मी निष्ठेने काम करतोय, हे पाहूनच. मराठी माणसातच ही एकात्मता दडलेली आहे, असे मला वाटते. लोकांनी मला भरभरून प्रेम दिलेय. आताचे वातावरण पाहून मला वाटतेय, धर्माचाही विचार झाला पाहिजे व एकात्मतेचाही विचार झाला पाहिजे. देशाच्या हितासाठी आपण सर्वांनीच एकत्र आले पाहिजे. तेथे कोणताही भेदभाव होता कामा नये, असा संदेशही शेवटी त्यांनी सर्वांना दिला. 

संगीतातही मला रुची : माझे वडील हार्मोनियम चांगले वाजवायचे. काका व्हायोलिन वाजवायचे. मलाही त्यांनी हार्मोनियम वाजवायला शिकविले. लहानपणी मीही संगीताकडे वळलो होतो. संगीत मला प्रिय आहे. शास्त्रीय संगीत जास्त आवडते; परंतु मी संगीतात पुढे जाऊ शकलो नाही. भीमसेन जोशी, किशोर कुमार मला आवडतात. मी सिनेमेही खूप पाहिलेत. आता बंद झाले. व्ही. शांतारामचे पिक्चर मला आवडायचे. डॉ. श्रीराम लागू हे माझे आवडते नट. अशोककुमारांचा बंधन नावाचा चित्रपट मला खूप आवडायचा. तो मी अनेकदा पाहिला.

पुणेकर मला आवडतात...
पुणेकरांबद्दल खूप काही लिहिले जाते; परंतु ६३ व्या साहित्य संमेलनात अध्यक्ष म्हणून चौकाचौकात माझे औक्षण झाले. माझी निवडही मोठ्या मताने झाली. पुणेकर चांगले वागतात, असा माझा अनुभव आहे. ‘मराठीतील बखरीतील फारशीचे स्वरूप’ हा प्रबंध मी पहिल्या पीएच.डी.साठी सादर केला तेव्हा माझे गाईड होते डॉ. तुळपुळे. मला त्यांनी सतत प्रोत्साहनच दिले. 

प्राध्यापक होणेच माझी पसंती
माझ्या कुटुंबात मोठे प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर आदी मंडळी होती; परंतु पहिल्यापासून मला प्राध्यापक होण्याचीच स्वप्ने पडत. प्राध्यापकीशिवाय दुसरा विचार मी कधीच केला नाही. तसे पाहिले तर प्राध्यापक मंडळीला तेव्हा पगार खूपच तुटपुंजा होता; परंतु पगार ही माझी प्राथमिकता नव्हतीच. लोकांमध्ये काही सकारात्मक बदल घडवून आणण्याची जिद्द होती. 

मला सतत चांगलीच माणसं मिळत गेली
मला घरात, समाजात, देशात व परदेशात वावरतानाही सतत चांगलीच माणसं मिळत गेली. वाईट अनुभव कधी आलेच नाहीत. मला सतत चांगलेच अनुभव येत गेले. त्यातून मी घडत गेलो. म.भी. चिटणीस, डॉ. कोलते, प्राचार्य मा.गो. देशमुख, प्रा. फडकुले यांनी खूप मदत केली. 

नामकरण अन् सत्यनारायण...
धर्म आणि एकात्मतेचा आता मुद्दा उपस्थित होतो आहे; पण मी माझ्या लहानपणाची गोष्ट सांगतो. माझे नामकरण युसूफ असे झाले. त्यानंतर गावातील मराठी माणसांनी आमच्या कुटुंबाकडे सत्यनारायण घालण्याची विनंती केली व माझ्या कुटुंबांनी ती मान्यही केली होती. पठाण मुस्लिम आहेत व ते काही तरी वेगळे आहेत, असा तेव्हा भावच नव्हता.

डॉ. आंबेडकर यांच्या भाषणाने प्रेरित
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पाहण्याचा व त्यांचे भाषण ऐकण्याचा योग मला आला. मी सोलापुरात असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाच्या उद्घाटनासाठी आले होते. तेथे त्यांनी शिक्षणावर मूलगामी भाषण केले होते. त्या भाषणाने मी प्रेरित झालो. पुढे २०१६ मध्ये मला त्यांचे शिक्षणविषयक विचारावर पुस्तक लिहिता आले. 

आजही वाचन, लेखन सुरूच...
९० व्या वर्षातही खणखणीत आवाज व आपली शरीर प्रकृती ठणठणीत असल्याचे रहस्य सांगताना डॉ. पठाण म्हणाले, मला कोणतेच व्यसन नाही व मी कुणाचे दुर्गुणही शोधत नाही. इतरांचे सद्गुण शोधले की आपले आयुष्य वाढते, असे ते सांगत असताना, मध्येच त्यांना थांबवत, वाचन-लेखनाचे व्यसन तर आपणास आहे की, असे म्हणताच, ते खदखदून हसले. हे व्यसन सर्वांनीच जोपासावे, असा सल्लाही त्यांनी दिला. या वयातही त्यांच्या दररोजच्या दिनचर्र्येत काहीही फरक पडलेला नाही. दररोज उठून वृत्तपत्रांचे वाचन, मग काही पुस्तके चाळणे, चिंतन, मनन सुरूच असते. दररोज काही तरी लिहिले पाहिजे, ही त्यांची शिस्तच. शिवाय काही मित्रांशी चर्चा, गप्पागोष्टीही सुरूच आहेत. 

Web Title: Everyone has a cultured person in mind; The man needs to be constantly awake ... : Y.M. Pathan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.