'Energy boost' by 'Agro tourism' | ‘अ‍ॅग्रो टुरिझम’मुळे मिळतोय ‘एनर्जी बुस्ट’
‘अ‍ॅग्रो टुरिझम’मुळे मिळतोय ‘एनर्जी बुस्ट’

- अबोली कुलकर्णी

औरंगाबाद : धकाधकीचे जीवन आणि कामाच्या व्यापामुळे आयुष्यातील चार निवांत क्षण कुटुंबासोबत जगण्यासाठी प्रत्येक जण संधी शोधत असतो. मग वीकेंडला असलेल्या सुटीचा पुरेपूर उपभोग घ्यायचा म्हणून कुठेतरी आऊटिंगला जाऊ असे विचार डोक्यात येऊ लागतात. अशावेळी निसर्गाच्या सान्निध्यात नेणारी ठिकाणे आकर्षित करू लागतात. मुंबई-पुण्याची वीकेंडला आऊटिंगसाठी जाण्याची संकल्पना आता औरंगाबादेतही रुजू पाहतेय. त्यामुळे ‘अ‍ॅग्रो टुरिझम’ या संकल्पनेला चालना मिळत असल्याचे दिसून येत आहे. 

ग्रामीण भागातील शेती, निसर्गसौंदर्य, पक्ष्यांचा किलबिलाट, दुर्मिळ झाडे, थंडगार सावली, विहीर, तलाव, जुनी घरे यांच्या सान्निध्यात जाऊन राहण्याचा आनंद काही औरच असतो. शहरात स्थायिक झालेली प्रत्येक व्यक्ती ही मजा क्षणोक्षणी ‘मिस’ करते. मात्र, मुंबई-पुणे येथे वीकेंडला आऊटिंगसाठी जाण्याचा ट्रेंडच आहे. आठवड्याच्या शेवटी कुटुंब, मित्र परिवार यांच्यासोबत रिलॅक्स होण्यासाठी दोन दिवस निसर्गरम्य ठिकाणी जातात. आता हाच ट्रेंड औरंगाबादेत रुजू पाहतोय. त्यामुळे ‘अ‍ॅग्रो टुरिझम’ या संकल्पनेला चालना मिळताना दिसत आहे. या संकल्पनेंतर्गत विविध सोहळे, प्री-वेडिंग फोटोशूट, गेट टुगेदर, समारंभ, पार्टी यांचे आयोजन करता येते. आठवडाभराच्या कामासाठी दोन दिवसांचे ‘एनर्जी बुस्ट’ या ट्रेंडमुळे मिळते.

चिकूच्या बागेत डोहाळ जेवण, व्याही भोजन
‘अ‍ॅग्रो टुरिझम’ या संकल्पनेंतर्गत शहराच्या बाहेर ठराविक हेक्टरच्या परिसरात झाडे, फुले, जुनी घरे, खेळण्या, वेगवेगळे खेळ, चिकूच्या बागा, विहिरी, बलुतेदारी यांच्या माध्यमातून त्या जागेला ग्रामीण टच देण्यात येतो. अशा ठिकाणी डोहाळ जेवण, व्याही भोजन, गेट टुगेदर, वाढदिवस, सहस्रचंद्रदर्शन, किटी पार्टी, भिशी पार्टी, शालेय सहली, घरगुती कार्यक्रम असे विविध कार्यक्रम घेतले जातात. शांत, निवांत जागी चार आनंदाचे क्षण अनुभवल्याचा आनंदही लुटता येतो. 

ग्रामीण टच
वाढते शहर, प्रदूषण, धकाधकीचे आयुष्य यांच्यामुळे प्रत्येकाला स्वत:ला आणि कुटुंबाला वेळ द्यायचा असतो. अ‍ॅग्रो टुरिझम या ताणावर अगदी योग्य उपाय झाला आहे. वेगवेगळी शक्कल लढवीत व्यावसायिक आऊटिंग अगदी नैसर्गिक ठेवतात. अगदी ग्रामीण टच ठेवून व्यवस्था असल्याने तुम्ही निसर्गाच्या अगदी जवळ जाता.


Web Title: 'Energy boost' by 'Agro tourism'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.