पावसाळ्यात मुकुंदनगर, राजनगरवासीयांचे होताहेत हाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 07:09 PM2019-07-15T19:09:02+5:302019-07-15T19:14:42+5:30

चिखल तुडवत करावे लागतेय मार्गक्रमण

During the monsoon season, the residents of Mukundnagar and Rajnagar are facing the difficulties | पावसाळ्यात मुकुंदनगर, राजनगरवासीयांचे होताहेत हाल 

पावसाळ्यात मुकुंदनगर, राजनगरवासीयांचे होताहेत हाल 

googlenewsNext
ठळक मुद्देपाणी, रस्ते, दिव्यांचा अभाव  पाणी साचून तुटतो संपर्कआबालवृद्धांची गैरसोय

- साहेबराव हिवराळे
औरंगाबाद : महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या मुकुंदनगर, राजनगरातील नागरिकांचा पावसाळ्यात शहराशी संपर्क तुटतो. शाळकरी चिमुकल्यांना चिखलातून वाट काढीत शाळा गाठावी लागते. तर कामगारांना मुकुंदवाडी रेल्वेगेटच्या अलीकडील परिसरात वाहने उभी करण्याशिवाय गत्यंतर नाही.  

शहरालगतच्या नवीन वसाहतीचा मनपात समावेश करून २० ते २५ वर्षांचा कालावधी लोटला. परंतु त्या वसाहतीच्या विकासाकडे स्थानिक प्रशासनाने सतत दुर्लक्ष केले. मुकुंदनगर, राजनगरातून बीड बायपासला जाताना हालहाल होतात, अनेकदा वाहने चिखलात रुतलेल्या अवस्थेत सोडून द्यावी लागतात. त्यामुळे वाहनातील पेट्रोल किंवा इतर साहित्याची चोरीदेखील कायमचीच बाब झाली आहे. मनपाने या भागात गुंठेवारी लावून मुकुंदनगर, राजनगर, मुर्तुजापूर, स्वराजनगर परिसराचा विकास करणे गरजेचे आहे. परंतु कुणीही या नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देत नसल्याचे विष्णू गाडगे, सौरभ सौदे, सुशील भालेराव यांच्यासह स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. 

चिखलामुळे होते कसरत
या परिसरात मनपाची शाळा नाही. त्यामुळे पालकांना आपल्या पाल्यांना शाळा, महाविद्यालयासाठी पटरीपलीकडे स्वत: नेऊन शाळेत सोडावे लागते. पटरीलगत चालणाऱ्यांना अतिदक्षतापूर्वक ये-जा करावी लागते. अन्यथा अपघाताचे प्रसंगही ओढावले आहेत. 
पायातील चपला, बूट काढून मुलांना अनवाणी पायाने शाळेपर्यंत न्यावे लागते. ही जीवघेणी कसरत महानगरपालिका केव्हा थांबविणार, असा सवाल शिवाजी जाधव, कृष्णा पवार, सुरेश जाधव यांनी उपस्थित केला आहे.

दूध व गॅससाठी रस्त्यावर
चिखलामुळे दूध व गॅस व पाण्याचे जार घेऊन फिरणारी वाहने घरापर्यंत येऊ शकत नाहीत, त्यामुळे रेल्वेगेटजवळ डांबरी रस्त्यावर थांबलेल्या वाहनातून साहित्य घेऊन जाण्याची कसरत करावी लागते. मुकुंदनगर व राजनगरला मूलभूत सेवा- सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी कविता कीर्तिशाही, बबिता राठोड, संगीता जाधव आदींनी केली आहे. 

भुयारी रस्ता करावा
मुकुंदवाडी रेल्वेस्थानक ते राजनगर, मुकुंदनगर परिसरातील नागरिकांना गेट ओलांडून जाण्याशिवाय पर्याय नाही. पादचारी रेल्वेरुळावरून जीवघेणा प्रवास करतात. गंभीर आजारी व्यक्तीला दवाखान्यात नेण्यासाठी साधी रुग्णवाहिका घरापर्यंत जात नाही. वेदनेने विव्हळणाऱ्या रुग्णाला खांद्यावर उचलून डांबरी रस्त्यापर्यंत आणावे लागते. त्यामुळे भुयार बनवून रस्ता करावा. 
-शैलेश भालेराव 

सेवा-सुविधा कोसोदूर 
परिसरातील एकही रस्ता व्यवस्थित नसल्याने पावसाळ्यात अनेक विद्यार्थ्यांना शाळेला दांडी मारावी लागते किंवा पायपीट करीत शाळा गाठावी लागते. त्यासाठी पालकांना सर्व कामे सोडून अधिक त्रास सहन करावा लागत आहे. मनपाच्या कार्यक्षेत्रात असूनही सेवा-सुविधांपासून नागरिकांना कोसोदूर ठेवण्यात आलेले आहे. धोकादायक डीपींना कुंपण लावण्याची गरज आहे.
- आशिष चव्हाण

अविकसित परिसर
कामगार व मजूर कुटुंबियाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असून, चिखलामुळे रस्त्यावर वाहन चालविता येत नाही. घराजवळ चिखल असल्याने वाहन घरीच ठेवून पायपीट करीत कामावर जाण्याची वेळ परिसरातील नागरिकांवर पावसाळ्यात येते. या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्वरित रस्ता, ड्रेनेज, लाईट सेवा मनपाने पुरवाव्यात.
- डॉ. सूरज स्वामी 

गैरसोयीत वाढ
रस्त्याचे सिमेंटीकरण होणार असून, बायपासपर्यंत सोयीचा होणार आहे. परंतु ठेकेदाराने टाकलेल्या खडीमुळे त्यातून वाहनाला वाट काढणे कठीण झाले आहे. दुचाकीने वाट काढता येऊ शकते. परंतु चारचाकी वाहनाला वळसा घेऊनच देवळाई किंवा झाल्टा फाटामार्गे जालना रोडवरून स्वराजनगर, राजनगर, मुकुंदनगर गाठावे लागत आहे. 
- शेख आक्रम 

डीपीला कुंपण नाही
परिसरात एकही डांबर व सिमेंट रोड तयार करण्यात आलेला नाही. चिखलमय रस्त्यालगत उघड्या डीपी आहेत. शाळकरी मुले आणि नागरिकांना रस्त्यावरून जाताना धोका होण्याची भीती वाढली आहे. परिसरातील उघड्या डीपीसाठी संरक्षक कुंपण लावण्याची मागणी केली; परंतु त्याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेले नाही. 
- साहेबराव कांबळे

 

 

Web Title: During the monsoon season, the residents of Mukundnagar and Rajnagar are facing the difficulties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.