‘मी आज जाणार आहे’ असे पतीला सांगून डॉक्टर महिलेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 12:53 PM2021-04-21T12:53:11+5:302021-04-21T12:55:59+5:30

पतीला आवाज देऊन उठवले आणि ''आज मी जाणार आहे'' असे सांगितले.

Doctor commits suicide by telling her husband ‘I am leaving today’ | ‘मी आज जाणार आहे’ असे पतीला सांगून डॉक्टर महिलेची आत्महत्या

‘मी आज जाणार आहे’ असे पतीला सांगून डॉक्टर महिलेची आत्महत्या

googlenewsNext
ठळक मुद्दे अडीच वर्षाच्या सोहमच्या रडण्याच्या आवाजाने पती झोपेतून उठल्यावर घटना आली समोरसुसाईड नोटमध्ये ''माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये'' असे लिहून त्याखाली स्वाक्षरी केली आहे.

औरंगाबाद: ''आज मी जाणार आहे'' असे पतीला सांगून डॉक्टर विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी कांचनवाडी येथील ग्रॅण्ड कल्याण सोसायटीमध्ये घडली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत (सुसाईड नोट) त्यांनी त्यांच्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये असे नमूद केले.

डॉ. प्रियंका प्रमोद क्षीरसागर (२७) असे मृत विवाहितेचे नाव आहे. प्रियंका यांचे पती डॉ. प्रमोद हे घाटी रुग्णालयात एम. डी. या वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी प्रियंका आणि औरंगाबाद तालुक्यातील प्रमोद यांचा २०१६ मध्ये विवाह झाला. प्रियंका बीएएमएस तर डॉ. प्रमोद हे एमबीबीएस होते. त्यांना अडीच वर्षाचा सोहम हा मुलगा आहे. ग्रॅण्ड कल्याण सोसायटीतील फ्लॅटमध्ये हे कुटुंब राहत होते. गेल्या काही महिन्यापासून डॉ. प्रियंका या फारसे कुणासोबत बोलत नव्हत्या. पतीलाही त्या तुम्हाला माझ्यापेक्षा चांगली पत्नी मिळाली असती आणि भेटू शकते, असे म्हणत असत. ती मजाक करीत असेल असे समजून डॉ. प्रमोद हे त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत.

प्रमोद यांना घाटी रुग्णालयात निवासी डॉक्टर म्हणून काम करणे आणि एमडीचा अभ्यास करण्यासाठी रात्रभर जागावे लागते. यामुळे ते बऱ्याचदा सकाळी उशिरा झोपेतून उठत. नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करून प्रमोद झोपले. मंगळवारी सकाळी ६:३० ते ७ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे प्रियंका झोपेतून उठल्या, तेव्हा त्यांच्यासोबत सोहमही उठला. तो हॉलमध्ये खेळायला गेला. यावेळी त्यांनी पतीला आवाज देऊन उठवले आणि ''आज मी जाणार आहे'' असे सांगितले. अर्धवट झोपेतील पतीला वाटले, ती माहेरी जाण्याविषयी बोलत आहे, असे समजून ते पुन्हा झोपी गेले. यानंतर प्रियंका यांनी शेजारच्या खोलीत जाऊन पंख्याला दोरीने गळफास घेतला.

चिमुकला सोहम रडू लागला अन् ...
सकाळी ८:३० ते ८:४५ वाजता सोहमच्या रडण्याचा आवाज ऐकून डॉ. प्रमोद झोपेतून उठले. त्यांना वाटले पत्नी बाथरूममध्ये असेल म्हणून त्यांनी बाथरूमचे दार लोटले. मात्र आत प्रियंका नव्हत्या. त्यांनी शेजारच्या बेडरूमचे दार उघडून पाहिले असता प्रियंका यांनी गळफास घेतल्याचे त्यांना दिसले. या घटनेची माहिती त्यांनी सातारा पोलिसांना कळविली.

घटनास्थळी सुसाईड नोट सापडली
पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, उपनिरीक्षक अनिता फसाटे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तेव्हा तेथे सुसाईड नोट आढळून आली. या नोटमध्ये ''माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये'' असे लिहून त्याखाली स्वाक्षरी केली आहे. ही नोट पोलिसांनी जप्त केली. मृतदेह घाटी रुग्णालयात हलविला. याविषयी सातारा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. फौजदार विक्रम वडणे तपास करीत आहेत. या घटनेविषयी त्यांच्या मृताच्या नातेवाईकांनी तक्रार नसल्याचे पोलिसांना सांगितले. नैराश्येतून त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

Web Title: Doctor commits suicide by telling her husband ‘I am leaving today’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.