'Do not be frightened, Shiv Sena will support you' | ‘खचून जाऊ नका, शिवसेना तुमच्या पाठीशी’
‘खचून जाऊ नका, शिवसेना तुमच्या पाठीशी’

ठळक मुद्देउद्धव ठाकरे : ‘मातोश्री’वर खैरे यांची भेट


औरंगाबाद : लोकशाहीत विजय आणि पराजय या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पराभवाने अजिबात खचून न जाता पुन्हा जोमाने कामाला लागा, असा सल्ला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी चंद्रकांत खैरे यांना ‘मातोश्री’वर दिला. साडेचार हजार मतांनी निसटता पराभव कसा झाला, याची अत्यंत बारकाईने त्यांनी माहिती घेतली. लवकरच औरंगाबादेत मेळावा घेणार असल्याची घोषणाही ठाकरे यांनी केली.
गुरुवारी सायंकाळीच खैरे यांच्या पराभवाची वार्ता मातोश्रीवर पोहोचली होती. त्यानंतर ताबडतोब उद्याच म्हणजे शुक्रवारी भेटीसाठी मातोश्रीवर या, असा निरोप चंद्रकांत खैरे यांना मिळाला होता. चंद्रकांत खैरे, आ. संजय शिरसाट, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, माजी महापौर विकास जैन आज दुपारी १.३० वाजता मातोश्रीवर पोहोचले. प्रारंभी, उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पराभवाची कारणे समजून घेतली. पराभव जिव्हारी न लावता पुन्हा एकदा जोमाने कामाला लागा, असे सांगितले. पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असे आश्वासनही त्यांनी दिले. पक्षबांधणीसाठी लवकरच औरंगाबादेत विभागीय मेळावा घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
भाजपची भूमिकाही समजून घेतली
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी खैरे यांच्या विरोधात शड्डू ठोकल्याने खैरे यांना पराभवास सामोरे जावे लागले. जालन्यात दानवे यांनी अर्जुन खोतकर यांच्या मनधरणीसाठी उद्धव ठाकरे यांना मध्यस्थी करायला लावली होती. एकीकडे स्वत: निवडून येण्यासाठी सेनेची मदत घेतली. दुसरीकडे जावयाला सेना उमेदवाराच्या विरोधात उभे केले. भाजपचे हे राजकारणही उद्धव ठाकरे यांनी समजून घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
लवकरच पक्षात फेरबदल
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे औरंगाबाद शहरावर विशेष प्रेम होते. १९८८ पासून २०१९ पर्यंत खैरे यांनी कधीच पराभव बघितला नव्हता. खैरे यांना पहिल्यांदाच पराभवास सामोरे जावे लागले. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच संघटनेतही मोठ्या प्रमाणात फेरबदल करणार असल्याचे सूत्रांनी नमूद केले. पक्षातील मरगळ दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे.


Web Title: 'Do not be frightened, Shiv Sena will support you'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.