जायकवाडीचे पाणी सुखना धरण आणि परिसरातील तलावात आणण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 04:53 PM2019-08-16T16:53:12+5:302019-08-16T16:55:30+5:30

तांत्रिक पाहणी करून प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा

Demand for Jayakwadi water to be brought to Sukhna dam and pond in the area | जायकवाडीचे पाणी सुखना धरण आणि परिसरातील तलावात आणण्याची मागणी

जायकवाडीचे पाणी सुखना धरण आणि परिसरातील तलावात आणण्याची मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देएक्स्प्रेस जलवाहिनी उपलब्ध 

- श्रीकांत पोफळे 

शेंद्रा (औरंगाबाद ) : जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरणार असल्याने धरणाचे पाणी दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या औरंगाबाद तालुक्यातील सुखना धरणात, तसेच करमाड-हिवरा तलावात सोडणे शक्य होईल का, याची तांत्रिक पाहणी करण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. 

जायकवाडी धरण सध्या ९० टक्के भरले आहे. आणखी दीड महिना पावसाळा शिल्लक आहे, त्यामुळे ते पूर्ण क्षमतेने भरणार आहे. या परिस्थितीचा फायदा औरंगाबाद तालुक्याला मिळावा, असे औरंगाबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना वाटत आहे. औरंगाबाद तालुका सध्या दुष्काळाच्या छायेत असून, अनेक गावांत उन्हाळ्याप्रणाणे टँकर सुरू करण्यात आले आहे. या परिस्थितीत शेंद्रा एमआयडीसीपर्यंत आलेल्या एक्स्प्रेस जलवाहिनीद्वारे सुखना धरणात आणि करमाड-हिवरा शिवारातील तलावात पाणी सोडणे तांत्रिकदृष्ट्या शक्य होईल का, याची पाहणी करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. 

तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे का? 
पैठणहून शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीसाठी सिंदोन-भिंदोनमार्गे एक्स्प्रेस जलवाहिनी टाकण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी या वाहिनीद्वारे शेंद्रा एमआयडीसीत पाणी येऊ लागले. सुखना धरणात चित्ते आणि सुखना या दोन नद्यांचे पाणी येते. या दोन्ही नद्यांतून धरणात पाणी येण्याच्या ठिकाणाजवळून ही एक्स्प्रेस वाहिनी गेली आहे. करमाड-हिवरा शिवारात असलेल्या जडगाव लघु पाटबंधारे तलावात पाणी येणाऱ्या नदीतून एक्स्प्रेस जलवाहिनी गेलेली आहे. यामुळे याच जलवाहिनीद्वारे जायकवाडी धरणातील पाणी सुखना धरणात सोडणे शक्य आहे का, याची तांत्रिक पाहणी करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. सुखना धरणाच्या अगदी जवळून एक्स्प्रेस जलवाहिनी गेल्याने सुखनामध्ये पाणी आणणे ही बाब फारशी खर्चिक ठरणार नाही, असे शेतकऱ्यांना वाटते. 

काय होईल फायदा?
एक्स्प्रेस जलवाहिनीद्वारे सुखना धरणात पाणी आले तर  दुष्काळाच्या गडत छायेत असलेल्या औरंगाबाद तालुक्यातील जवळपास ६० गावांची पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होईल. याशिवाय जवळपास २० गावांतील शेतकऱ्यांना रबी पिकेदेखील घेता येतील. या परिसरातील अनेक शेततळी कोरडी पडली आहेत. पाणी उपलब्ध झाल्यास फळबागा वाचतील. त्यामुळे जायकवाडीचे पाणी औरंगाबाद तालुक्यातील पूर्व भागातील धरण आणि तलावांत सोडले तर त्याचा शेतकऱ्यांना निश्चितपणे फायदा होणार आहे. 

धरणाची क्षमता
सुखना धरणाची क्षमता २१.५ दशलक्ष घनमीटर इतकी आहे, तर हिवरा तलावाची क्षमता सुखना धरणाच्या एक टक्का इतकी आहे. दोन्ही ठिकाणी पाणी सोडले तर जायकवाडीच्या पाण्याची किंचितशी घट होणार आहे. त्यामुळे या मागणीचा तांत्रिक पाहणीच्या दृष्टीने विचार व्हावा आणि शेतकऱ्यांंना पाणी द्यावे, अशी मागणी श्रीमंत चौधरी, मुरलीअण्णा चौधरी, शैलेश चौधरी, शिवाजी भोसले, अनिल चौधरी, सुनील चौधरी, भास्कर चौधरी, संतोष पवार, शाम पवार, कल्याण पोफळे, शिवाजी भोसले, जयाजी सरोदे आदी शेतकऱ्यांनी केली आहे.

अधिकारी, अभियंत्यांचे मत
करमाड परिसरातील शेतकऱ्यांच्या या मागणीसंदर्भात एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांंना विचारले असता त्यांनी अशा पध्दतीने एक्स्प्रेस जलवाहिनीद्वारे पाणी आणण्याबाबत काही सांगण्यास असमर्थता दर्शविली. शेतकऱ्यांची मागणी असेल तर त्याबाबत जिल्हाधिकारी किंवा वरिष्ठ अधिकारी निर्णय घेऊ शकतील, असे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. जायकवाडी धरणाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सुखना धरणाच्या जवळून गेलेल्या एक्स्प्रेस जलवाहिनीतून सुखना धरणात पाणी सोडणे शक्य आहे की नाही याबाबत तांत्रिक माहिती घ्यावी लागेल. तांत्रिक माहितीशिवाय काहीही सांगता येणार नाही. 

Web Title: Demand for Jayakwadi water to be brought to Sukhna dam and pond in the area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.