Death of young engineer in truck and wall accident | ट्रक व भिंतीमध्ये दबल्याने तरुण अभियंत्याचा मृत्यू 

ट्रक व भिंतीमध्ये दबल्याने तरुण अभियंत्याचा मृत्यू 

औरंगाबाद : सिमेंट कंपनीच्या गोदामात भिंतीलगत थांबलेला अभियंता ट्रकखाली दबून मृत्युमुखी पडल्याची घटना बीड बायपास परिसरातील देवळाई रोडवर गुरुवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली. 

गणेश तात्याराव ढोले (३२, रा. जयभवानीनगर) असे मृत अभियंत्याचे नाव आहे. सातारा पोलिसांनी सांगितले की, बीड बायपास परिसरातील देवळाई रस्त्यावर वंडर सिमेंट कंपनीचे गोदाम आहे. कंपनीचे वरिष्ठ तांत्रिक सहायक गणेश ढोले हे सकाळी १० वाजताच तेथे उपस्थित होते. यावेळी एक चालक सिमेंट नेण्यासाठी ट्रक घेऊन आला होता. गोदामातील सिमेंट गोण्या पाहत असताना चालकाने अचानक वेगात ट्रक मागे घेतला. तेथे उभ्या असलेल्या मजुरांनी आरडाओरड करून ट्रक थांबविण्याचे सांगितले. मात्र, चालकाच्या लक्षात येण्याअगोदरच ट्रक गणेश यांच्या अंगावर गेला. यात त्यांचा चेंदामेंदा झाल्याने ते घटनास्थळीच गतप्राण झाले. चालकाला सुनावल्यानंतर त्याने ट्रक पुढे घेतला. त्यानंतर गंभीर जखमी गणेशला बाहेर काढून वाहनातून घाटी रुग्णायात दाखल करण्यात आले. अपघात विभागातील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याविषयी सातारा पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी ट्रक जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी दिली.

गणेश सिव्हिल इंजिनिअर
गणेश हे सिव्हिल इंजिनिअर होते. गेल्या काही वर्षांपासून ते वंडर सिमेंट कंपनीत नोकरी करीत होते. त्यांच्या मृत्यूची वार्ता कळताच मित्र आणि नातेवाईकांनी घाटीत गर्दी केली आणि हंबरडा फोडला. गणेशच्या मागे पत्नी आणि एक मुलगी आहे.
........

Web Title: Death of young engineer in truck and wall accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.