कार्तिकी एकादशीच्या वारीला वारकऱ्यांना झाले नाथाचे मनमोकळे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 07:44 PM2020-11-26T19:44:21+5:302020-11-26T19:45:18+5:30

पोलीसांच्या कडक भूमिकेमुळे  मंदिर परिसरात होणारी गर्दी  आज झाली नाही यामुळे मनमोकळेपणाने भाविकांना दर्शन घेता आले.

On the day of Karthiki Ekadashi, Warakaris had a free visit to Nath Samadhi | कार्तिकी एकादशीच्या वारीला वारकऱ्यांना झाले नाथाचे मनमोकळे दर्शन

कार्तिकी एकादशीच्या वारीला वारकऱ्यांना झाले नाथाचे मनमोकळे दर्शन

googlenewsNext
ठळक मुद्देकार्तिकी एकादशीला जे वारकरी व भाविक पंढरपूर येथे जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेऊ शकत नाही, असे वारकरी पैठण येथे येतात. मंदिर परिसरात होणारी गर्दी लक्षात घेता पोलीस व नाथ संस्थानच्या वतीने यंदा चोख नियोजन करण्यात आले होते.

पैठण : 
आषाढी कार्तिकी विसरू नका 
मज सांगतसे गुज पांडुरंग...
वारकरी संप्रदायाच्या दृष्टीकोनातून आषाढी व कार्तिकी एकादशीचे मोठे  महत्त्व आहे. कोरोनाची तमा न बाळगता कार्तिकी एकादशीच्या वारीला आज मोठ्या संख्येने हजेरी लावून वारकऱ्यांनी नाथसमाधीचे दर्शन घेतले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात वाहनबंदी करून दुकाने बंद ठेवण्याचा स्थानिक पोलीसांचा निर्णय वारकऱ्यांच्या पथ्यावर पडला. पोलीसांच्या कडक भूमिकेमुळे  मंदिर परिसरात होणारी गर्दी  आज झाली नाही यामुळे मनमोकळेपणाने भाविकांना दर्शन घेता आले. कार्तिकी एकादशीच्या मुहुर्तावर गुरुवारी लाखो वारकरी व भाविकांनी पैठण येथे नाथ समाधीचे दर्शन घेत  कोरोनाच्या मुक्ती सह बळिराजाची ईडा पिडा दूर होऊदे असे साकडे घातले. वैष्णवांच्या गर्दिने पैठण शहर आज गजबजून गेले होते, बघावे तिकडे हरिनामाचा गजर व विठ्ठल नामाचा जयघोष सुरू होता. 

कार्तिकी एकादशीला जे वारकरी व भाविक पंढरपूर येथे जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेऊ शकत नाही, असे वारकरी पैठण येथे येतात. कार्तिकीला गोदावरीत स्नान करून नाथांच्या समाधीचे  दर्शन घेण्याची परंपरा पैठण येथे शेकडो वर्षापासून सुरू आहे.  कोरोनाचे सावट असतानाही परंपरा कायम राखत गुरुवारी वारकऱ्यांनी, भाविकांनी पैठण येथे हजेरी लावली. दिवसभरात लाखभर भाविकांनी नाथ मंदिरात दर्शन घेतल्याचे नाथ संस्थानचे कार्यकारी विश्वस्त दादा पा बारे  यांनी सांगितले. आज पहाटे पासून पैठण शहरात वारकरी व भाविकांचे आगमन सुरू झाले.

गळ्यात तुळशी माळा, डोक्यावर तुळशी वृंदावन घेत भानुदास एकनाथाचा जय घोष करित महिला भाविकांनी मोठ्या संखेने आज  वारीला हजेरी लावली. टाळमृदंगाच्या गजर, हातात भगवा ध्वज घेऊन माथ्यावर गोपीचंदनाचा टिळा लावलेले वारकरी  नाथमंदीर परिसरात मोठ्या जल्लोषात विठुरायाचा जयघोष करत होते. नाथ मंदिरा पाठिमागिल नाथ घाट, मोक्ष घाटावर गोदावरीच्या पवित्र स्नानासाठी महिला भाविकांची दिवसभर  गर्दी झालेली आढळून आली. पैठण येथे आलेल्या वारकऱ्यांनी रात्री येथील विविध मठात व मंदिरात मुक्कामी थांबून हरि किर्तन व प्रवचन केले त्यामुळे मठा मंदिरातून होणाऱ्या हरिनामाच्या गजराचे स्वर मध्यरात्री पर्यत पैठण शहरात दुमदुमत होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्कृष्ट नियोजन....
कार्तिकी एकादशीला वारकरी व भाविकांची मंदिर परिसरात होणारी गर्दी लक्षात घेता पोलीस व नाथ संस्थानच्या वतीने यंदा चोख नियोजन करण्यात आले होते. नाथ मंदीर परिसरात एकही वाहन जाऊ नये म्हणून सर्व रस्ते बँरेकेटिंग टाकून बंद करण्यात आले होते. मास्क न घातलेल्या वारकऱ्यांना मंदिर परिसरात प्रवेश नाकारण्यात येत होता. विशेष म्हणजे परिसरातील दुकाने बंद ठेवण्यात आल्याने दर्शन घेऊन वारकरी सरळ बाहेर पडत होते. पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे, छोटूसिंग गिरासे, यांच्या सह सुधीर व्हावळ, राजू आटोळे, सविता सोनार आदीसह पोलीस कर्मचारी आज पहाटे पासून मंदीर परिसरात हजर असल्याने कुठेही गर्दी झाली नाही.

कार्तिकी एकादशीला विठ्ठलाची मुर्ती पंढरपूला आणणारे संत भानुदास महाराज
पंढरपूर येथून विठ्ठलाची मुर्ती राजा कृष्णदेवराय त्यांच्या राज्यात घेऊन गेले होते. संत एकनाथ महाराजांचे पणजोबा संत भानुदास महाराज यांनी इ. स.१५०६ मध्ये कार्तिकी एकादशीला कर्नाटक राज्यातील विजय नगर येथून पांडुरंगाची मुर्ती पंढरपुरला आणून वारकऱ्यांचे आराध्य दैवत पुन्हा महाराष्ट्राला मिळवून दिल्याचा ईतिहास आहे. भानुदास महाराजांनी ई स. १५१३ ला पंढरपुर येथे देह ठेवला. मुख्य विठ्ठल रखुमाई मंदीरात त्यांची समाधी आहे. आजही पैठण येथे येणारे वारकरी भानुदास एकनाथ असा जयघोष करतात. यामुळे कार्तिकी एकादशीची पैठण वारी वारकरी मनोभावे करतात.

Web Title: On the day of Karthiki Ekadashi, Warakaris had a free visit to Nath Samadhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.