देश- विदेशातील पर्यटन ठप्प; आगाऊ बुकिंगमध्ये पर्यटकांचे अडकले सुमारे ८० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 01:25 PM2020-05-27T13:25:57+5:302020-05-27T13:28:37+5:30

विविध विमान कंपन्यांनी तिकिटांचे पैसे परत करण्याऐवजी वर्षभरात तिकिटाच्या पैशावर विमान प्रवास करण्याचा पर्याय दिला.

Country- Overseas tourism stalled; Tourists About 80 crore rupees are stuck in advance booking | देश- विदेशातील पर्यटन ठप्प; आगाऊ बुकिंगमध्ये पर्यटकांचे अडकले सुमारे ८० कोटी

देश- विदेशातील पर्यटन ठप्प; आगाऊ बुकिंगमध्ये पर्यटकांचे अडकले सुमारे ८० कोटी

googlenewsNext
ठळक मुद्देमार्च  ते जूनअखेर हा पर्यटन कालावधी म्हणून ओळखला जातो.मराठवाड्यातील १५ हजार पर्यटक 

औरंगाबाद : कोरोना महामारीमुळे जगभरातील पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे. देश-विदेशांतील सहलीसाठी हॉटेल, विमान आणि रेल्वे प्रवासाचे आगाऊ बुकिंग करणाऱ्या मराठवाड्यातील सुमारे १८ ते १९ हजार  पर्यटकांचे सुमारे ८० कोटी रुपये अडकून पडले आहेत. विविध विमान कंपन्यांनी तिकिटांचे पैसे परत करण्याऐवजी वर्षभरात तिकिटाच्या पैशावर विमान प्रवास करण्याचा पर्याय दिला. रेल्वेने मात्र, नियमानुसार पैसे परत देण्याची तयारी दर्शविली आहे. 

मार्च  ते जूनअखेर हा पर्यटन कालावधी म्हणून ओळखला जातो. यावर्षीही औरंगाबादमधील ट्रॅव्हल एजंटांनी पर्यटकांचा व्हिसा ते विमान, रेल्वे, बस प्रवासाची आगाऊ तिकिटे आणि राहण्यासाठी हॉटेलची बुकिंग केली. मात्र, डिसेंबर-जानेवारीपासून जगभरातील विविध देशांत  कोरोना महामारीची साथ आली आणि पर्यटन व्यवसाय ठप्प झाला. विविध देशांनी व्हिसा रद्द केला. आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांची उड्डाणे रद्द केली. भारतात दोन महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत यापुढे आणखी किमान सहा महिने तरी पर्यटकासाठी विविध देशांची दारे उघडण्याची शक्यता नाही. साहजिकच सर्व सहली रद्द झाल्या आहेत. परिणामी, ट्रॅव्हल एजंटांकडे सहलीसाठी नोंदणी करणाऱ्या पर्यटकांचे आगाऊ विमान तिकीट बुकिंग आणि हॉटेल बुकिंगमध्ये सुमारे ८० कोटी रुपये अडकली आहेत.

ही रक्कम परत मिळावी याकरिता पर्यटकांनी  ट्रॅव्हल एजंटची दारे ठोठावण्यास सुरुवात केली. यामुळे  ट्रॅव्हल एजंटांनी देश-विदेशातील विमान कंपन्या आणि हॉटेल्सकडे तगादा सुरू केला. मात्र, हॉटेल आणि विमान कंपन्यांनी बुकिंग रद्द करून पैसे परत करण्यास असमर्थता दर्शवून त्याच व्यक्तीला आगामी काळात विमान प्रवास करण्याची तयारी दर्शविल्याची माहिती औरंगाबाद ट्रव्हल एजंट असोसिएशनचे अध्यक्ष आशुतोष बडवे यांनी दिली. ते म्हणाले की, असे असले तरी आगामी काळात प्रवासभाडे वाढल्यास वाढीव रक्कम प्रवाशांना भरावी लागणार आहे. दुसरीकडे, रेल्वे तिकीट बुकिंग रद्द करण्याचे पैसे नियमाप्रमाणे परत मिळतील. पर्यटकांचे नुकसान होऊ नये, याकरिता आम्ही संबंधित विमान कंपन्या आणि हॉटेल व्यवस्थापन यांच्याकडे पाठपुरावा करीत आहोत.

मराठवाड्यातील १५ हजार पर्यटक 
मराठवाडा आणि शेजारील जिल्ह्यांतील  सुमारे १५ ते १६ हजार पर्यटक देशांतर्गत, तर साडेतीन ते चार हजार पर्यटक देशाबाहेर पर्यटनासाठी जातात. त्यासाठी औरंगाबादेतील विविध ट्रॅव्हल एजंटकडे ही मंडळी आगाऊ बुकिंग करतात.  

आणखी सहा ते सात महिने पर्यटन व्यवसायावर संक्रांत
आपल्याकडे देशांतर्गत पर्यटन मोठ्या प्रमाणात होते. ‘कोरोना’ची साथ आटोक्यात आल्यानंतर पर्यटन सुरू होईल, तर विदेशातील पर्यटन हे संबंधित देशांच्या निर्णयावर अवलंबून आहे. यापुढे आणखी सुमारे सहा ते सात महिने पर्यटन व्यवसाय ठप्प राहण्याची चिन्हे दिसत आहेत. 
-आशुतोष बडवे, अध्यक्ष, औरंगाबाद ट्रॅव्हल एजंट असोसिएशन 

Web Title: Country- Overseas tourism stalled; Tourists About 80 crore rupees are stuck in advance booking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.