CoronaVirus News: अवघ्या 10 मिनिटांत खोली निर्जंतुक करणारा रोबो; कर्मचाऱ्यांवरील ताण होणार कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 01:11 PM2020-07-06T13:11:03+5:302020-07-06T13:15:00+5:30

प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरू; खर्च आणि वेळ वाचण्याची शक्यता

CoronaVirus Robot disinfecting room in just 10 minutes trial starts on experimental basis | CoronaVirus News: अवघ्या 10 मिनिटांत खोली निर्जंतुक करणारा रोबो; कर्मचाऱ्यांवरील ताण होणार कमी

CoronaVirus News: अवघ्या 10 मिनिटांत खोली निर्जंतुक करणारा रोबो; कर्मचाऱ्यांवरील ताण होणार कमी

googlenewsNext

औरंगाबाद : मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद या महानगरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्वाभाविकच, प्रशासनावरील ताणही वाढतोय. त्यामुळे कामाचं नियोजन, सुसूत्रीकरण करून आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने हा भार हलका कसा करता येईल, यादृष्टीने प्रयत्न होत आहेत. अशावेळी, रोबोटिक्सचा वापर अतिशय फायद्याचा ठरू शकतो. हे ओळखूनच एका खासगी कंपनीने निर्जंतुकीकरणाचं काम वेगानं करणारा रोबो तयार केला आहे. या रोबोचा डेमो औरंगाबाद महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी शनिवारी बघितला.

औरंगाबाद शहरातील २२ अलगीकरण कक्षांमध्ये असलेले ९०० पेक्षा अधिक नागरिक, कोविड केअर सेंटरमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांवर सुरू असलेले औषधोपचार, रुग्णांना आणण्यासाठी होणारा शहर बसचा वापर, या प्रत्येक ठिकाणी महापालिकेला निर्जंतुकीकरण करावे लागते. या कामासाठी मनुष्यबळाचा वापर करण्याऐवजी शहरातील काही केंद्रांवर प्रायोगिक तत्वावर रोबोचा वापर करण्यात येणार आहे.



आपण बनवलेला रोबो किरणोत्सर्ग पद्धतीने एका बंद खोलीतील जंतूंचा नाश करतो, असा दावा कंपनीने केला आहे. रोबोटला मोशन सेन्सर बसविण्यात आला असून, अवघ्या दहा मिनिटांमध्ये २० स्क्वेअर मीटरची खोली तो निर्जंतुक करून देतो. महापालिकेने तयार केलेल्या वेगवेगळ्या अलगीकरण कक्षांमध्ये याचा प्रयोग करण्यात येणार आहे. अलगीकरण केंद्रात राहणारा संशयित रुग्ण नंतर पॉझिटिव्ह आढळून आल्यास त्याची खोली २४ तास रिकामी ठेवण्यात येते. निर्जंतुकीकरण करून नंतर खोलीचा वापर करण्यात येतो. रुग्णांना ने-आण करण्यासाठी महापालिकेने २० बसचा वापर सुरू केला आहे. प्रत्येक वेळी बसला निर्जंतुक करावे लागते. या कामातही रोबोटची मदत होऊ शकते. शहरातील काही अलगीकरण केंद्रांवर हा प्रकल्प यशस्वी झाल्यास सर्वच ठिकाणी रोबोटचा वापर करण्यात येणार आहे.



सध्या महापालिकेकडून अवलंबण्यात आलेल्या मानवी निर्जंतुकीकरण पद्धतीपेक्षा रोबोटचा खर्च अत्यंत कमी असल्याचा दावा करण्यात येत आहे. रोबोटच्या पाहणीप्रसंगी महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी नीता पाडळकर यांची उपस्थिती होती. या प्रयोगाची माहिती राज्य सरकारलाही दिली जाणार आहे.

दरम्यान, परवडणारी कोरोना टेस्ट किट्स, स्वस्त पोर्टेबल व्हेंटिलेटर, डिजिटल स्टेथोस्कोप, निर्जंतुकीकरणासाठी ड्रोन, रुग्णालयांसाठी संसर्गरोधक कापड, अशा कोरोना रुग्ण आणि वॉरियर्सना उपयुक्त ठरणाऱ्या वस्तू आणि उपकरणं देशभरातील आयआयटीच्या विद्यार्थी-प्राध्यापकांनीही तयार केली आहेत. त्यापैकी काही बाजारात दाखलही झाली आहेत.

कल्याणमध्ये रोबो कोरोना रुग्णांच्या सेवेत
कल्याणमधल्या होलिक्रॉस कोविड रुग्णालयात एक रोबो रुग्णसेवा करत आहे. कोरोना संकट काळात हजारो परिचारिका, वॉर्डबॉय जीव मुठीत घेऊन काम करत आहेत. त्यातल्या अनेकांना कोरोनाची बाधा झाली आहे. हा धोका लक्षात घेऊन डोंबिवलीतील सुनील नगर येथील रहिवासी असलेला अभियांत्रिकीचा विद्यार्थी प्रतीक तिरोडकरने मोबाईलवर ऑपरेट करता येईल असा कोरो रोबोट तयार केला आहे. तो सध्या कल्याण येथील होलीक्रॉस कोविड रुग्णालयात सेवा करत आहे.

पुण्यातील रुग्णालयात रोबोट ट्रॉली
पुण्यातील विराज राहुल शहा या १५ वर्षीय विद्यार्थ्याने स्वत:ची कल्पकता लढवत रोबोटिक कोविड १९ वॉर बॉट (ट्रॉली) तयार केली आहे. ही रोबोट ट्रॉली महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयाला भेट देण्यात आली. रुग्णांना औषधे, चहा, नाश्ता, जेवण आणि आवश्यक साहित्य देण्यासाठी रुग्णाच्या वॉर्डात जावे लागते. त्यासाठी पीपीई किट घालावे लागते. ते किट सहा तास काढता येत नाही. त्या काळात काही खाता येत नाही की नैसर्गिक विधीही करता येत नाहीत. हा त्रास कमी करण्यासाठी काय करता येईल याचा विचार विराजच्या मनात सुरु होता. इंटरनेटचा वापर आणि त्याची आवड याची सांगड घालत त्याने रोबोटची प्रतिकृती तयार करण्याचा विचार केला. अभियांत्रिकीचे कोणतेही ज्ञान नसतानाही त्याने धडपड करीत रोबोट विकसित केला. त्याला करण अजित शहा (वय १९) आणि दीप विवेक सेठ (वय १९) या दोन संगणक अभियंता मित्रांनी मदत केली. सलग ४० दिवस सातत्याने काम करुन त्याने हा रोबोट विकसित केला.

पीपीई किट, एन-९५ मास्क २० वेळा वापरता येणार
कोरोनापासून बचाव करण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी पीपीई किट्स आणि एन-९५ चा वापर करतात. मात्र या वस्तू एकदाच वापरता येत असल्यानं उपचारांवरील खर्च वाढत होते. त्यावर लखनऊमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टॉक्सिकोलॉजी रिसर्च (IITR) ने उपाय शोधून काढला. आयआयटीआरने मेजर टेक्नॉलॉजीच्या मदतीने एक निर्जंतुकीकरण यंत्र विकसित केले. या यंत्राच्या मदतीने कमीतकमी 20 वेळा एन-९५ मास्क आणि पीपीई किट पुन्हा वापरण्यायोग्य होणार आहे. कोरोना चाचणी केंद्रांसाठी आणि रुग्णालयांसाठी हे अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. यंत्रामुळे उपचार करताना येणारा खर्चही थोडा कमी होणार आहे. दररोज नवीन वस्तू वापरण्याऐवजी यंत्राच्या मदतीने एकच मास्क आणि किट काही दिवस वापरणं सहज शक्य होणार आहे. 
 

Web Title: CoronaVirus Robot disinfecting room in just 10 minutes trial starts on experimental basis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.