coronavirus : पुढचे सात दिवस महत्त्वाचे; अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 04:44 PM2020-03-19T16:44:30+5:302020-03-19T16:48:44+5:30

महापौर नंदकुमार घोडेले, मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांचे आवाहन

coronavirus : The next seven days are important; Exit only if there is an urgent task | coronavirus : पुढचे सात दिवस महत्त्वाचे; अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडा

coronavirus : पुढचे सात दिवस महत्त्वाचे; अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडा

googlenewsNext
ठळक मुद्देसर्व आठवडी बाजार राहणार बंदशासकीय आणि मनपाची यंत्रणा सज्ज

औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका सज्ज असून, शहरात येणाऱ्या व्यक्तींच्या तपासणीसाठी रेल्वेस्टेशन, मध्यवर्ती बसस्थानक, सिडको बसस्थानक, छावणी टोलनाका या चार ठिकाणी स्क्रीनिंग सेंटर सुरू केले आहेत. शहरातील सर्व आठवडी बाजार बंद केले जाणार आहेत. पुढील ७ दिवस अत्यंत महत्त्वाचे असून, नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन महापौर नंदकुमार घोडेले, मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी बुधवारी संयुक्त पत्रकार परिषदेत केले.

शहरावर घोंगावणाऱ्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी शासकीय यंत्रणा १०० टक्के सज्ज आहे. नागरिकांनी अजिबात घाबरू नये, प्रशासनाला सहकार्य करावे. धूत, एमजीएम, हेडगेवार, सिग्मा रुग्णालयात आयसोलेशन वॉर्ड तयार केले असून, क्वॉरंटाईन वॉर्डदेखील तयार ठेवले जाणार आहेत. मंगल कार्यालये, लॉन्स, सभागृह ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश यापूर्वीच दिले आहेत. औरंगाबाद व्यापारी महासंघ, कपडा असोसिएशन, आयएमए यांच्याकडून मनपाला मदत करण्यात येत आहे. 

आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले की, शहरात चार ठिकाणी स्क्रिनिंग सेंटर सुरू आहेत. शहरात खासगी ट्रव्हल्सने येणाऱ्या प्रवाशांची स्क्रिनिंग होणार आहे. विमानतळावर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत स्क्रिनिंग केले जात आहे. या स्क्रिनिंग सेंटरमध्ये तीन शिफ्टमध्ये १२ कर्मचारी राहणार असून, २४ तास हे सेंटर सुरू राहणार आहे. 

वॉर्ड कार्यालयांना १ लाख रुपये
वॉर्ड कार्यालयांना सॅनिटायझर, मास्क व इतर साहित्य खरेदीसाठी १ लाख रुपये खर्चाची परवानगी दिली आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार उपाययोजना करण्यात येत आहेत. 

डीपीसीतून १ कोटी येणार
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेला जिल्हा नियोजन समिती व एसडीआरएफमधून प्रत्येकी १ कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. या निधीतून औषधी, उपकरणे व साहित्य खरेदी केले जाईल.

मनपाकडून ४ कोटी १७ लाखांची मागणी 
महापालिकेने आरोग्य विभागासाठी आवश्यक लागणाऱ्या साहित्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे ४ कोटी १७ लाख रुपयांचा प्रस्ताव सादर केला आहे. 

क्वॉरंटाईन, आयसोलेटेड वॉर्डची व्यवस्था
एखादा रुग्ण आढळून आल्यास त्यास तातडीने तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले जाईल. कोरोनाच्या रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयात ५० बेड आयसोलेटेड तर ५० बेड क्वॉरंटाईन, घाटी रुग्णालयात १०० बेड क्वॉरंटाईन तर ५० बेड आयसोलेटेड, महापालिका ५० क्वॉरंटाईन आणि ३० आयसोलेटेड बेडची व्यवस्था करणार आहे.

मनपात येण्याची गरज नाही
नागरिकांनी मनपामध्ये न येता घरबसल्या तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आयुक्तांच्या कंट्रोल रूमच्या नंबरवर व्हॉटस्अ‍ॅपद्वारे किंवा व्हिडिओ कॉल करून तक्रार नोंदविता येईल. ई-मेल उपलब्ध करून देण्यात आला आहे. पत्र पाठवून तक्रार करू शकतात. आपल्या तक्रारींची ७ दिवसांत दखल घेऊन तक्रार सोडविली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.

Web Title: coronavirus : The next seven days are important; Exit only if there is an urgent task

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.