CoronaVirus: कोरोना नियमांचे उल्लंघन, शिवसेनेचे मंत्री भुमरे यांच्यावर कारवाईची राष्ट्रवादीच्या गोर्डे यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:08 PM2021-05-07T16:08:50+5:302021-05-07T16:09:42+5:30

CoronaVirus: सर्वसामान्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत असताना मंत्री महोदयांंना कायदा लागू नाही का ? अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

CoronaVirus: NCP's Gorde demands action against Shiv Sena minister Bhumare for violating Corona rules | CoronaVirus: कोरोना नियमांचे उल्लंघन, शिवसेनेचे मंत्री भुमरे यांच्यावर कारवाईची राष्ट्रवादीच्या गोर्डे यांची मागणी

CoronaVirus: कोरोना नियमांचे उल्लंघन, शिवसेनेचे मंत्री भुमरे यांच्यावर कारवाईची राष्ट्रवादीच्या गोर्डे यांची मागणी

googlenewsNext

पैठण : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरातून बाहेर पडू नका असे राज्याचे मुख्यमंत्री जनतेला हात जोडून विनंती करत आहेत. तर दुसरीकडे राज्याचे रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे हे मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेलाच छेद देत कार्यकर्ते, ग्रामस्थ यांच्या गर्दीत विविध विकास कामांच्या उद्घाटनाचा सपाटा लावत असल्याचे दिसून येत आहे. पोटापाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या गोरगरिबांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत असताना मंत्री महोदयांंना कायदा लागू नाही का ? अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मंत्री भुमरे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांनी केली आहे.  

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पैठण तालुक्यातील ग्रामीण भागाला विळखा घातला आहे. यामुळे कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून मृत्यूचा आकडासुद्धा चिंताजनक आहे. कोरोना थोपविण्याचा प्रशासन उपाययोजना करत असताना राज्याचे मंत्रीच नियम पायदळी तुडवून सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवत असल्याचे चित्र पैठणमध्ये दिसून आले. बुधवारी ( दि. ५ ) पैठण तालुक्यातील देवगाव येथील रोजगार हमी योजनेच्या विविध कामाचे उदघाटन रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते झाले. यावेळी मंत्री भुमरे यांचे पुत्र तथा जिल्हा परिषद सदस्य विलास  भुमरे, चित्तेगावचे जिल्हा परिषद सदस्य अक्षय जायभाये, देवगावचे सरपंच रामलाल कोथळी, पंचायत समिती सदस्य सोपान थोरे,  देवगावचे उपसरपंच बाळासाहेब गीते, तंटामुक्ती अध्यक्ष भास्कर गीते, भगवान ढगे ,पंढरीनाथ गीते, दीपक ढाकणे, अमोल गीते , ग्रामरोजगार सेवक मदन बोंदरे यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्र्यांच्या कार्यक्रमात मोठ्याप्रमाणात गर्दी झाल्याने कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचे चित्र होते.  

कोरोना प्रसारावर ग्रामीण भागात प्रभावीपणे उपाय योजना राबविण्यात प्रशासनास अपयश येत असताना मंत्री संदिपान भुमरे यांनी नियमांचे उल्लंघन करून कार्यक्रम घेतल्याने त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दत्ता गोर्डे यांनी केली. गोर्डे यांनी पैठणचे उपविभागीय अधिकारी गोरख भामरे यांना कारवाईची मागणी करत एक निवेदन दिले. विशेष बाब म्हणजे, मंत्री भुमरे यांच्या गावात सध्या मोठ्या संख्येने कोरोनाचे रूग्ण असून परिसरात १० रुग्णांचा मृत्यू  झाला आहे. 

Web Title: CoronaVirus: NCP's Gorde demands action against Shiv Sena minister Bhumare for violating Corona rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.