corona virus : अफवा आणि सत्य; जाणून घ्या सर्वसामान्यांच्या मनातील ७ शंकांची डॉक्टरांनी दिलेली उत्तरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 11:51 AM2020-03-16T11:51:54+5:302020-03-16T11:55:18+5:30

सर्वसामान्यांमध्ये अनेक शंका, भीतीयुक्त प्रश्न निर्माण होत आहेत.

corona virus: know the answers to the 7 doubts in the common mind from doctors | corona virus : अफवा आणि सत्य; जाणून घ्या सर्वसामान्यांच्या मनातील ७ शंकांची डॉक्टरांनी दिलेली उत्तरे

corona virus : अफवा आणि सत्य; जाणून घ्या सर्वसामान्यांच्या मनातील ७ शंकांची डॉक्टरांनी दिलेली उत्तरे

googlenewsNext
ठळक मुद्देकाही प्रश्नांची उत्तरे तज्ज्ञांनी दिलीउष्णता वाढल्यास कोरोना विषाणूचा प्रसार रोखला जाईल?

औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोना विषाणूने शिरकाव केला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये अनेक शंका, भीतीयुक्त प्रश्न निर्माण होत आहेत. यातील काही प्रश्नांची उत्तरे तज्ज्ञांकडून जाणून घेण्यात आली.

प्रश्न क्रमांक -१ : जलतरण तलावात पोहताना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का?
उत्तर : जलतरण तलावात पोहताना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाही. कारण जलतरण तलावातील पाण्याचे क्लोरिनेशन केलेले असते. तलावाचे व्यवस्थापन होत असेल तर संसर्ग टळू शकतो. अन्यथा संसर्गाचा धोका नाकारता येणार नाही. त्याशिवाय तलावाबाहेर बाधित व्यक्तीमुळे संसर्ग होऊ शकतो. 
-डॉ. अजित दामले, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, आयआयएमएसआर (जि. जालना)

प्रश्न क्रमांक-२ : फ्लू आणि कोरोना विषाणूच्या लक्षणात काय फरक आहे?
उत्तर : फ्लूमध्ये सर्दी, खोकला, ताप असतो. परंतु ३ ते ५ दिवसांत हा फ्लू बरा होतो. याउलट कोरोना विषाणूच्या लक्षणात कोरडा खोकला, ताप आणि श्वास घेण्यास त्रास ही प्रमुख लक्षणे आहेत. यात रुग्णाचे नाक गळत नाही. जे बाधित देशातून आलेले आहेत आणि अशी काही लक्षणे असतील, तर काळजी घेण्याची गरज आहे. 
- डॉ. आनंद निकाळजे, फिजिशियन

प्रश्न क्रमांक -३ : उष्णता वाढल्यास कोरोना विषाणूचा प्रसार रोखला जाईल?
उत्तर :  इन्फ्यूईजा, आडिनो व्हायरस यासारख्या वर्गातील विषाणूचा प्रादुर्भाव प्रामुख्याने हिवाळ्यात अधिक दिसून येतो. कोरोना विषाणू हा याच वर्गातील नवीन विषाणू आहे. त्यामुळे त्याचा प्रादुर्भाव उष्णता वाढल्यानंतर म्हणजे उन्हाळ्यात कमी होण्याची शक्यता आहे. परंतु नेमके काय होते, हे आगामी काही दिवसांत दिसून येईल. 
- डॉ. जयंत तुपकरी, बालरोगतज्ज्ञ

प्रश्न क्रमांक -४ : मास्क घातल्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबतो का, कोणत्या प्रकारचा मास्क वापरला पाहिजे?
उत्तर : सर्वसामान्यांनी मास्क घालण्याची गरज नाही. कोरोना बाधित, संशयित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी मास्क वापरला पाहिजे. सर्वसामान्य व्यक्तींनी शिंकताना, खोकलताना तोंडातील तुषार उडणार नाहीत, यासाठी रुमाल वापरला पाहिजे. हाताच्या कोपऱ्याचाही अशा वेळी वापर करता येतो. मास्क म्हणून चेहऱ्यावर रुमालही बांधता येईल. 
- डॉ. दत्ता कदम, बालरोगतज्ज्ञ

प्रश्न क्रमांक -५ : कोरोना विषाणूवर लस विकसित होईल का?
उत्तर : कोरोना विषाणूवर लस विकसित करण्याचे काम सध्या सुरू आहे. ही लस विकसित होईल. मात्र, त्यासाठी २ ते ३ महिने लागू शकतात. हा विषाणू नवीन आहे. त्यामुळे त्याच्या संसर्गाची शक्यता अधिक आहे. परंतु नागरिकांनी घाबरून जाता कामा नये. 
- डॉ. संजय पाटणे, अध्यक्ष, औरंगाबाद फिजिशियन असोसिएशन

प्रश्न क्रमांक - ६ : एखाद्याला कोरोनाचा संसर्ग झाला, तर त्याने थेट रुग्णालयात संपर्क साधावा का?
उत्तर : कोरोनासारखी काही लक्षणे वाटत असतील तर संबंधिताने घरी बसून राहता कामा नये. जवळच्या जनरल प्रॅक्टिसनर्सकडे जाता येते. तेथे काही लक्षणांवरून जोखीम वाटली तर संबंधित रुग्णाला मोठ्या संस्थेत रेफर करता येते. जोपर्यंत निदान होणार नाही, तोपर्यंत धोक्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन रुग्णालयात गेले पाहिजे.
- डॉ. प्रशांत देशमुख,जनरल प्रॅक्टिशनर

प्रश्न क्रमांक - ७ : कोरोना विषाणूवर काही घरगुती औषधोपचार उपलब्ध आहे का?
उत्तर : कोरोना विषाणूवर काहीही घरगुती उपचार उपलब्ध नाही. सामाजिक माध्यमांवर जे संदेश फिरत आहेत, ते चुकीचे आहेत. त्यावर विश्वास ठेवता कामा नये. कोरोनाच्या रुग्णाला आयसोलेशन करावे लागते. तसेच प्रतिजैविके, तापेची औषधी दिली जातात. 
- डॉ. सत्यनारायण सोमाणी, अध्यक्ष, आयएमए.

Web Title: corona virus: know the answers to the 7 doubts in the common mind from doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.