corona virus : मराठवाड्यात कोरोनाची धास्ती; मायक्रो इकॉनॉमीला दररोज ५० कोटींचा फटका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 04:58 PM2020-03-16T16:58:38+5:302020-03-16T17:04:33+5:30

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांतील मोठ्या यात्रा, आठवडी बाजार आदी रद्द केले जात आहेत.

corona virus: Corona threat in Marathwada; Micro economy hits 50 crore a day | corona virus : मराठवाड्यात कोरोनाची धास्ती; मायक्रो इकॉनॉमीला दररोज ५० कोटींचा फटका 

corona virus : मराठवाड्यात कोरोनाची धास्ती; मायक्रो इकॉनॉमीला दररोज ५० कोटींचा फटका 

googlenewsNext
ठळक मुद्देमहाराष्ट्राची वार्षिक आर्थिक उलाढाल सुमारे ६० लाख कोटींची आहे. मराठवाड्याचा वाटा १२ टक्के म्हणजेच ७ ते ७.२५ लाख कोटींच्या आसपास ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवरही परिणाम दिसण्याची शक्यता

- राजेश भिसे 

औरंगाबाद : मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत कोरोना संशयित रुग्ण आढळून येत आहेत. त्यातील बहुतांश रुग्णांचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह येत असले तरी भीतीचे वातावरण कायम आहे. अशा स्थितीत दक्षता म्हणून उपाययोजना करण्यात येत असल्या तरी याचा परिणाम मायक्रो इकॉनॉमीवर दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील मायक्रो इकॉनामीला दररोज सरासरी ५० कोटींचा फटका बसत असल्याचे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. आगामी काळात हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

जगभरात कोरोना या संसर्गजन्य विषाणूने थैमान घातले आहे. युरोप, अमेरिकेसह जगातील सर्वच देशांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या साथीपासून बचाव करण्यासाठी अनेक देशांनी उपाययोजना आखल्या असून, बहुतांश देशांनी आयात-निर्यातीसह इतर अनेक गोष्टींवर निर्बंध घातले आहेत, तर कोरोना संशयित रुग्ण मुंबई, पुण्यापाठोपाठ मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड, जालना, हिंगोली या जिल्ह्यांतही आढळून येत असल्याने याचा फटका विविध छोट्या-मोठ्या व्यवसायांना बसण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राची वार्षिक आर्थिक उलाढाल सुमारे ६० लाख कोटींची आहे. त्यात मराठवाड्याचा वाटा १२ टक्के म्हणजेच ७ ते ७.२५ लाख कोटींच्या आसपास आहे. याचा दरमहा विचार करता ही उलाढाल ५५ ते ६० हजार कोटींपर्यंत जाते.

औरंगाबाद, जालना बीड, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली लातूर या जिल्ह्यांत असंघटित क्षेत्रासह कृषी, अन्न प्रक्रिया उद्योग, सेवा उद्योग, हॉटेल उद्योग यासह इतर अनेक छोट्या-मोठ्या व्यापारातून दररोज २ हजार कोटी रुपयांची उलाढाल होत असते. मायक्रो इकॉनॉमीमुळे ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळून तेथील अर्थव्यवस्थाही सुदृढ होत असते. मात्र, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांतील मोठ्या यात्रा, आठवडी बाजार आदी रद्द केले जात आहेत. गर्दी होणारी ठिकाणे टाळली जात आहेत. मायक्रो इकॉनॉमीत महत्त्वाचे घटक असलेल्या या सेवा, हॉटेल, कृषी, अन्न प्रक्रिया व इतर क्षेत्रांतील उलाढालींवर याचा परिणाम दिसून येत आहे. याचा मराठवाड्यात दररोज सरासरी ५० कोटींचा फटका या मायक्रो इकॉनॉमीला बसत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. त्यातच औरंगाबादेतील आॅटो इंडस्ट्री बंद राहिली तर मात्र हा आकडा जवळपास ८० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांसह उद्योजकांनी व्यक्त केली आहे. 

असंघटित क्षेत्राला सर्वाधिक फटका ?
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात एकूण उलाढालीच्या दोन ते तीन टक्के परिणाम दिसू शकतो. याचा असंघटित क्षेत्राला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. भयभित न होता दक्षता घेणे हाच एकमेव मार्ग आहे.     - मुकुंद कुलकर्णी,  मराठवाडा अध्यक्ष, कॉन्फेडरेशन 
    आॅफ इंडियन इंडस्ट्रीज तथा सदस्य, मराठवाडा विकास महामंडळ.

मराठवाड्यात काय-काय बंद राहणार?
औरंगाबाद  :
सर्व मॉल, शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे, कोचिंग क्लासेस, सार्वजनिक कार्यक्रम, यात्रा, उत्सव.

परभणी : शहरातील स्विमिंग पूल, व्यायामशाळा, शाळा, महाविद्यालये, मॉल, चित्रपटगृहे, कोचिंग क्लासेस, अंगणवाड्या.

जालना : शहरी भागातील शाळा,महाविद्यालये, मॉल, चित्रपटगृहे, कोचिंग क्लासेस, परवानगी असलेले सर्व सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रम.

बीड : २४ मार्चपासून सुरु होणारा आष्टी तालुक्यातील मच्छिंद्रगडावरील नियोजित यात्रा उत्सव, अंगणवाड्या, शाळा, महाविद्यालये, मॉल, चित्रपटगृहे, कोचिंग क्लासेस.

नांदेड : महाविद्यालये, मॉल, चित्रपटगृहे, कोचिंग क्लासेस, ग्रामीण व शहरी भागातील शाळा, अंगणवाड्या.
(रविवारी नांदेड शहरातील कुसुम सभागृहात एमपीएससी विद्यार्थ्यांसाठीचे मार्गदर्शन शिबीर पोलिसांनी बंद केले)

लातूर : आठवडी बाजारांसह शाळा, महाविद्यालये, मॉल, चित्रपटगृहे, कोचिंग क्लासेस, सार्वजनिक कार्यक्रम.

हिंगोली : मॉल, कोचिंग क्लास, अंगणवाड्या, मंगळवारचा बाजार, शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे.

उस्मानाबाद : शाळा, मॉल, कोचिंग क्लासेस, महाविद्यालये, चित्रपटगृहे, सार्वजनिक कार्यक्रम, अंगणवाड्या.

Web Title: corona virus: Corona threat in Marathwada; Micro economy hits 50 crore a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.