कोरोना रुग्ण वाढले; औरंगाबादमध्ये ५ वी ते ९ वी, ११वीचे विद्यार्थी पुन्हा ऑनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 05:28 PM2021-02-19T17:28:17+5:302021-02-19T17:34:43+5:30

तीन दिवसांत शाळांना करावी लागणार ऑनलाईनची तयारी

Corona patient increased; 5th to 9th, 11th class students online again in Aurangabad | कोरोना रुग्ण वाढले; औरंगाबादमध्ये ५ वी ते ९ वी, ११वीचे विद्यार्थी पुन्हा ऑनलाईन

कोरोना रुग्ण वाढले; औरंगाबादमध्ये ५ वी ते ९ वी, ११वीचे विद्यार्थी पुन्हा ऑनलाईन

googlenewsNext
ठळक मुद्दे फक्त दहावी, बारावीचे वर्ग सुरू २२ ते २८ फेब्रुवारीपर्यंत निर्बंध

औरंगाबाद : शहरात कोरोना रुग्णांच्या सख्येत वाढ होत असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी शहरात इयत्ता ५वी ते ९वी आणि ११वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग २२ ते २८ फेब्रुवारीपर्यंत बंद करून पुन्हा ऑनलाईन वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १०वी, १२वीच्या बोर्ड परीक्षा असल्याने ते विद्यार्थी शाळेत उपस्थित राहू शकतील, अशी माहिती महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

पाचवी, सहावी, सातवी, आठवी आणि नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्यापासून सूट देण्यात आली आहे. ते ऑनलाईन वर्गांना हजेरी लावतील. शाळेची प्रशासकीय कामे मात्र सुरू राहतील; परंतु दहावी आणि बारावीचे विद्यार्थी शाळा-महाविद्यालयांत येतील. याबाबत सर्व शाळांना सूचना दिल्या आहेत. २२ ते २८ फेब्रुवारीपर्यंत हे निर्बंध राहणार आहेत. शहरातील मंगल कार्यालये, मॉल्स, बाजार, भाजीमंडई, व्यापारपेठा आणि पंचतारांकित हॉटेल्स या सर्वांना गर्दी करू नये, याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यासोबत येथील गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिका आणि पोलीस विभागांचे पथक नियुक्त केले आहेत.

कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने इयत्ता ५वी ते १२वीपर्यंतच्या शाळा सुरू केल्या होत्या. मात्र, रुग्णसंख्या वाढत असल्याने शाळांमधून कोरोनाचा प्रसार अधिक प्रमाणात होऊ नये, यासाठी शहरातील १०वी आणि १२वीचे वर्ग वगळून इयत्ता ५वी ते ९वी आणि ११वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांनी शाळेत न येता पूर्वीप्रमाणे ऑनलाईन वर्ग करावेत, असे प्रशासक पाण्डेय यांनी सांगितले.

पोलीस आयुक्तांची माहिती अशी :
शहरात १४४ कलम लागू आहे. त्यामुळे शिवजयंती उत्सव साजरा करताना कलमाचे उल्लंघन होणार नाही, याची सर्व आयोजकांनी दक्षता घ्यावी. एका वेळेस १०० पेक्षा जास्त जणांची गर्दी नसावी, मिरवणूक काढता येणार नाही. मास्क सर्वांना असावा. मिरवणूक काढल्यास गुन्हे दाखल होऊ शकतात, असा इशारा पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिला. पुन्हा लॉकडॉऊन करण्याची वेळ येणे योग्य ठरेल काय, याचा गांभीर्याने विचार करून प्रत्येकाने खबरदारी बाळगत नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असेही ते म्हणाले. पोलीस अधीक्षक पाटील यांनी मास्क प्रत्येकाने वापरावा, असे आवाहन केले.

स्वागत समारंभ केला रद्द
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या मुलीच्या विवाहानिमित्त २६ फेब्रुवारी २०२१ रोजी एका हॉटेलमध्ये आयोजित केलेला स्वागत समारंभ कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रद्द केला आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण पाठविलेल्या सर्वांनी घरूनच शुभेच्छा देण्याची विनंती जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केली आहे.

Web Title: Corona patient increased; 5th to 9th, 11th class students online again in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.