महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे स्वबळ : शिवसेना, राष्ट्रवादी अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 07:18 PM2020-10-17T19:18:29+5:302020-10-17T19:24:13+5:30

महाविकास आघाडीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर

Congress's will fight own in municipal elections: Shiv Sena, NCP alert | महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे स्वबळ : शिवसेना, राष्ट्रवादी अलर्ट

महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे स्वबळ : शिवसेना, राष्ट्रवादी अलर्ट

googlenewsNext
ठळक मुद्देशिवसेनेचीही स्वबळावर तयारी भारतीय जनता पक्षामध्येही उत्सुकता 

औरंगाबाद : महापालिका निवडणुका केव्हा होणार हे सर्वाेच्च न्यायालयातील निकालानंतरच  स्पष्ट होणार असले तरी काँग्रेसचे औरंगाबादचे संपर्कमंत्री अमित देशमुख यांनी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा केल्यानंतर महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अलर्ट झाले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीनेदेखील स्वबळावर लढण्याची तयारी असल्याची भूमिका ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केली. 

देशमुख यांचे विधान पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये स्फूर्ती देण्यासाठी असू शकते. त्यांनी स्वबळाची भाषा जरी केली असली तरी निर्णय तर वरिष्ठ पातळीवरच होणार असल्याचे मत शिवसेना-राष्ट्रवादीच्या गोटातून व्यक्त होत आहे. महाविकास आघाडीचे राज्यात सरकार आहे. त्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सहभागी आहे. औरंगाबाद महापालिकेत एप्रिल २०२० पर्यंत शिवसेना-भाजप सत्तेत होते. ११५ नगरसेवकांच्या आकड्यांत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे १० ते १२ नगरसेवक होते. सोबत एमआयएमचे २६ नगरसेवक होते. उर्वरित सत्तेचा आकडा शिवसेना-भाजपच्या बाजूने होता. मनपाच्या निवडणुकांबाबत सध्या अनिश्चितता आहे. 

सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालानंतरच निवडणूक कधी होईल, हे स्पष्ट होणार असले तरी कार्यकर्त्यांमध्ये जीव ओतण्याच्या भूमिकेतून शिवसेना आणि काँग्रेसने आघाडी घेतली आहे. भाजपसमोर पूर्ण क्षमतेने लढण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्रित जाण्याचे मनसुभे ठेवलेले असताना काँग्रेसने स्वबळाची भाषा केल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. महाविकास आघाडीचे राज्यात सरकार जरी असले तरी आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही आघाडी होणार की नाही, याबाबत आता आघाडीतील तिन्ही पक्षांसह भाजपमध्येही उत्सुकता आहे. 

संपर्कमंत्री देशमुख म्हणाले होते...
काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नेहमी स्वबळावरच लढते. त्यामुळे औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकादेखील काँग्रेस स्वबळावरच लढणार आहे.  शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस पक्ष राज्यात महाविकास आघाडीच्या रूपाने सत्तेत्त आहेत. मग तीच आघाडी महापालिकेच्या निवडणुकीत कायम न राहण्यामागे नेमके कारण काय आहे, यावर संपर्कमंत्री देशमुख यांनी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मागणी स्वबळावर निवडणूक लढण्याची असल्याचे सांगितले होते. 

आम्हीही ११५ वार्डांची तयारी केली आहे
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे यांनी सांगितले, काँग्रेसचे मंत्री देशमुख यांचे मत पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांत जोश निर्माण करण्यासाठी असेल. महाविकास आघाडीचा निर्णय वरिष्ठ पातळीवरच होणार आहे. तत्पूर्वी शिवसेनेनेदेखील ११५ वॉर्डांमध्ये पूर्ण क्षमतेने वॉर्डनिहाय बैठका घेत तयारी केली आहे. 

...तर राष्ट्रवादीही स्वबळावरच
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विजयराज साळवे यांनी सांगितले, महाविकास आघाडी होण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. महाविकास आघाडीत निवडणूक होईल; पण काँग्रेस जर स्वबळाची भाषा करीत असेल तर आमच्या शुभेच्छा आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढण्याबाबत वरिष्ठच निर्णय घेतील. आम्हीदेखील ११५ वॉर्डांमध्ये बैठकांसह आढावा घेत तयारी केली आहे.

 

Web Title: Congress's will fight own in municipal elections: Shiv Sena, NCP alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.