काँग्रेस-राष्ट्रवादीची १९१ मते फुटली; एमआयएमची मतेही शिवसेनेच्या पारड्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 12:34 PM2019-08-23T12:34:42+5:302019-08-23T12:38:59+5:30

भाजपने शेवटच्या क्षणापर्यंत दगाफटका करण्याची रणनीती आखली असती तरीही कुलकर्णींना २९० च्या पुढे जाता आले नसते.

Congress-NCP's 191 and AIMIM's votes are goes to Shiv Sena's candidates | काँग्रेस-राष्ट्रवादीची १९१ मते फुटली; एमआयएमची मतेही शिवसेनेच्या पारड्यात 

काँग्रेस-राष्ट्रवादीची १९१ मते फुटली; एमआयएमची मतेही शिवसेनेच्या पारड्यात 

googlenewsNext
ठळक मुद्देकुलकर्णी यांना १०६ मते ४ मते अवैध ठरविण्यात आली. 

औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे यांनी ५२४ मते घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार भवानीदास ऊर्फ बाबूराव कुलकर्णी यांचा ४१८ मतांनी पराभव केला. कुलकर्णी यांना १०६ मते मिळाली, तर अपक्ष उमेदवार शाहनवाज खान यांना ३ मते मिळाली. एकूण ६५७ पैकी ६४७ मतदान झाले होते. मतमोजणीअंती ६३३ मते वैध ठरली. १० मतपत्रिका कोऱ्याच होत्या, तर ४ मते अवैध ठरविण्यात आली. 

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची फुटलेली १९१ मते आणि कुलकर्णी यांना मिळालेली १०६ मते मिळून २९७ मते होतात. सुमारे २५० मते आघाडीची होती. त्यातील फक्त १०६ मते काँग्रेसच्या उमेदवाराला मिळाली. उर्वरित मतांमध्ये एमआयएमच्या सुमारे २८ पैकी बहुतांश मते आणि अपक्षांची ९ मते शिवसेनेला मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मातोश्रीच्या आदेशाने आखलेल्या रणनीतीमुळे दानवे यांचा विक्रमी विजय झाला; त्या तुलनेत आघाडीच्या नेत्यांनी कुलकर्णी यांच्या विजयासाठी परिश्रम घेतल्याचे दिसले नाही. दरम्यान दानवे यांनी विजयी झाल्याचे प्रमाणपत्र निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडून स्वीकारले. यावेळी राज्यमंत्री अतुल सावे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर,  महापौर नंदकुमार घोडेले, डॉ. भागवत कराड, जि.प. अध्यक्ष देवयानी डोणगावकर, आ. संतोष दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे आदींची उपस्थिती होती.

भाजपची मते बोनस 
महायुतीकडे शिवसेना-भाजप मिळून २९२ आणि ४० पुरस्कृत अशी ३३२ मते होती. यात भाजपचा आकडा १८० च्या आसपास होता. भाजपची जेवढी मते होती, तेवढीच मते राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची आघाडी व एमआयएम, अपक्षांची फोडण्याचे शिवसेनेचे नियोजन यशस्वी ठरले. भाजपने शेवटच्या क्षणापर्यंत दगाफटका करण्याची रणनीती आखली असती तरीही कुलकर्णींना २९० च्या पुढे जाता आले नसते. दानवेंना ३४४ मते पहिल्या पसंतीची मिळतील हे निश्चित होते. त्यामुळे भाजपची शिवसेनेला मिळालेली मते बोनसच असल्याचे दिसते. 

तीन दशकांनंतर मराठा नेतृत्व
१९९० नंतर पहिल्यांदाच शिवसेनेने शहरात मराठा उमेदवाराला विजयी करण्यासाठी संघटनात्मक प्रयत्न केले. दानवे यांच्या रूपाने समाजाला नेतृत्व मिळाले. मराठा समाजाच्या उमेदवाराचे गटबाजीतून नुकसान होत असल्याचे आरोप वारंवार आजवर होत आले आहेत. त्या आरोपांवर दानवे यांचा विजय हा उतारा असल्याचे मानले जात आहे.

एक तासातच लागला निकाल
चिकलठाणा एमआयडीसीतील मेल्ट्रॉन या कंपनीच्या सभागृहात मतमोजणीला सकाळी ८ वा. प्रारंभ झाला. पाच टेबलांवर प्रत्येकी १२५ मतांची मोजणी झाली. एका तासातच निकालाचे चित्र स्पष्ट झाले. ५५ कर्मचाऱ्यांनी मतमोजणी प्रक्रियेत सहभाग नोंदविला. 

दुसऱ्या पसंतीची कमी मते
एकूण ६३३ वैध मतांच्या ५० टक्के अधिक १ म्हणजेच ३१७ मतांचा कोटा विजयासाठी होता. पाच टेबलांवर प्रत्येकी १२५ मतांसाठी पहिल्याच फेरीत मतमोजणी झाल्यानंतर त्यात दानवे यांना ५२४ मते मिळाली. विशेष म्हणजे युतीच्या मतदारांनी दुसऱ्या पसंतीसाठी मतदानच केले नाही. आघाडी व एमआयएममधील जी मते शिवसेनेने फोडली होती, त्यांनीच दुसऱ्या पसंतीचे मतदान केले.  

प्रामाणिकपणाचा विजय
संघटना, पक्षाशी प्रामाणिक राहिलो, त्याचे फळ मिळाले. संघटनेमुळेच विजयी झाल्याचे आ. अंबादास दानवे यांनी सांगितले, तर पराभूत उमेदवार भवानीदास कुलकर्णी म्हणाले, हा प्रामाणिकपणाचा पराभव आहे. अर्ध्या तासात निकालाची दिशा लक्षात येताच कुलकर्णी यांनी मतमोजणी केंद्र सोडले.

Web Title: Congress-NCP's 191 and AIMIM's votes are goes to Shiv Sena's candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.