विद्यार्थिदशेपासून सेवानिवृत्तीपर्यंत ३५ वर्षे केला एकाच सायकलवर प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 07:40 PM2019-08-02T19:40:59+5:302019-08-02T19:44:20+5:30

विद्यापीठातच नव्हे, तर शहरातील कोणत्याही कार्यक्रमाला जाण्यासाठी सायकलचाच वापर

From college days to retirement BAMU employee spent 35 years on a cycle | विद्यार्थिदशेपासून सेवानिवृत्तीपर्यंत ३५ वर्षे केला एकाच सायकलवर प्रवास

विद्यार्थिदशेपासून सेवानिवृत्तीपर्यंत ३५ वर्षे केला एकाच सायकलवर प्रवास

googlenewsNext
ठळक मुद्देविद्यापीठात कंत्राटी कर्मचारी होण्यापूर्वी वडिलांनी एक सायकल घेऊन दिली होती. सायकलवरच विद्यापीठात एम.एड.चे शिक्षण पूर्ण केले.

- राम शिनगारे 

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शारीरिक शिक्षणशास्त्र विभागात पदव्युत्तरच्या अभ्यासक्रमाला १९८५ साली प्रवेश घेतला. तेव्हा नागेश्वरवाडी येथून विद्यापीठात जाण्यासाठी एक सायकल खरेदी केली. तेव्हापासून ते निवृत्तीच्या ३१ जुलैपर्यंतचा प्रवास सुभाष मुंगीकर यांनी याच सायकलवर केला.

विद्यापीठातील परीक्षा विभागात वरिष्ठ सहायक पदावरून सुभाष मुंगीकर ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. मागील २० वर्षांपासून अधिक काळ त्यांनी परीक्षा विभागात लिपिक पदावर काम केले आहे. सुभाष मुंगीकर यांचे वडील दत्तोपंत हेसुद्धा विद्यापीठात चतुर्थ श्रेणी कर्मचारी होते. नागेश्वरवाडी येथे राहण्यास असल्यामुळे दत्तोपंत हेसुद्धा विद्यापीठात जाण्यासाठी सायकल वापरत. त्यांचा मुलगा सुभाष यांनीही शरीरिक शिक्षणशास्त्र विभागात १९८५ साली शिक्षण घेत असताना ये-जा करण्यासाठी एक सायकल खरेदी केली. पुढे १९९० मध्ये त्यांना कंत्राटी कर्मचारी म्हणून विद्यापीठात काम करण्याची संधी मिळाली. १९९७ साली ते पूर्णवेळ कर्मचारी म्हणून रुजू झाले. लिपिक पदावर रुजू झालेले सुभाष हे ३१ जुलै २०१९ रोजी वरिष्ठ सहायक या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात अनेकांनी त्यांच्या सायकल आणि साधेपणाचे कौतुक केले. विद्यापीठात काम करताना प्रत्येकाला मदत करण्याची त्यांची भूमिका सर्वांच्या परिचयाची होती. कोणीही काम घेऊन आल्यास त्यास ‘नाही’ म्हणणे हे त्यांच्या स्वभावातच नव्हते, असे कर्मचारी संघटनेचे डॉ. कैलास पाथ्रीकर यांनी सांगितले. 

विद्यापीठात कंत्राटी कर्मचारी होण्यापूर्वी वडिलांनी एक सायकल घेऊन दिली होती. या सायकलवरच विद्यापीठात एम.एड.चे शिक्षण पूर्ण केले. ही सायकल हेच माझ्या प्रवासाचे साधन बनले आहे. नागेश्वरवाडी ते विद्यापीठ, असा एकूण १० किलोमीटर येण्या-जाण्याचा प्रवास अतिशय सुखाचा असतो. या सायकल प्रवासामुळे आरोग्याच्या समस्याही कधी उद्भवल्या नाहीत, असेही मुंगीकर सांगतात. आता घरात दोन्ही मुलांना दोन मोटरसायकली आहे; पण त्या कधी चालविण्याचा प्रयत्नही केला नाही. विद्यापीठातच नव्हे, तर शहरातील कोणत्याही कार्यक्रमाला जाण्यासाठी सायकलचाच वापर करतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. विद्यापीठातील कर्मचारी त्यांना सायकलस्वार म्हणूनच ओळखतात. सेवानिवृत्त झाल्यानंतरही मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे त्यांना तात्पुरत्या  स्वरूपात      सेवेत कायम ठेवण्यासाठीचा प्रस्तावही परीक्षा विभागाने प्रशासनाला दिल्याचे समजते.

समाजात सद्य:स्थितीत जवळ चार पैसे आले की, ऐषोआरामी जीवन जगण्याकडेच प्रत्येकाचा ओढा असल्याचे आपल्याला दिसून येते. अशा समाजातही सुभाष मुंगीकर यांच्यासारखी व्यक्ती साधेपणाचे जीवन जगते. हा आदर्श प्रत्येकाने घेतला पाहिजे. -डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू
 

Web Title: From college days to retirement BAMU employee spent 35 years on a cycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.