Chandrakant Khaire's third angle of complaint! | चंद्रकांत खैरेंच्या तक्रारीचा तिसरा कोन !
चंद्रकांत खैरेंच्या तक्रारीचा तिसरा कोन !

- सुधीर महाजन

निवडणुकीचा शिमगा ओसरल्यानंतर कवित्वाला बहर आला आहे साहजिकच आहे ते, कारण निवडणूक ही एक प्रकारचे युद्ध असते. ते रणांगणावर, दिवाणखाण्यात, सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि मानसशास्त्रीय या सर्वच पातळ्यांवर लढावे लागते. जसा युद्धाचा एक धर्म असतो तोच निवडणुकीत मित्र पक्षांचाही धर्म असतो मित्र पक्षांकडून घात अपेक्षित नसतो; परंतु औरंगाबादचे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी मित्रपक्ष म्हणजे भाजप आणि त्यातही भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी युतीधर्म न पाळता घात केला असा थेट आरोप करून खळबळ उडवून दिली. औरंगाबादच्या निवडणुकीकडे साऱ्यांचेच लक्ष आहे. कारण येथे शिवसेना, एम.आय.एम. आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव अशी तिहेरी लढत झाली. जाधवांच्या उमेदवारीने जशी रंगत वाढली तसा तिढाही, कारण जाधवांच्या मागे मराठा मतदार उभा राहिल्याचे चित्र निर्माण झाले होते. मराठा आंदोलनानंतर मराठा मतांचे धृवीकरण करण्याचा प्रयोग जाधवांच्या उमेदवारीतून झाल्याची चर्चा आहे. हर्षवर्धन जाधवांचे महत्त्व एवढेच नाही; तर ते रावसाहेब दानवेंचे जावई आहेत.

या निवडणुकीत रावसाहेब दानवेंनी शिवसेनेला मदत न करता हर्षवर्धन जाधवांना मदत केल्याचा खैरेंचा आरोप आहे. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर दानवेंनी जाधवांना ५० लाखाची आर्थिक रसद पुरवली असा आरोप केला. या निवडणुकीत भाजप प्रचारात नव्हती त्यामुळे आपल्याला मदत मिळाली नाही अशी तक्रार आहे. खैरे यांनी ही तक्रार थेट अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे केली; पण यांचे स्पष्टीकरण पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सुजीतसिंग ठाकुर यांनी केले. वास्तविक ते प्रदेशाध्यक्ष या नात्याने दानवे यांच्याकडून अपेक्षित होते आणि या घटनेपासून दानवेही कुठे दिसत नाहीत.

औरंगाबाद महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजप अशी सत्ताधारी आघाडी असली तरी येथेही युतीधर्माचे पालन होतानां दिसत नाही. शहरात तीव्र पाणी टंचाई आहे, त्यावर उपाय शोधण्याऐवजी भाजप नगरसेवकांनी आंदोलने केली, खरे तर ते सत्ताधारी; पण निवडणुकीपूर्वी शिवसेने विरोधात जनक्षोभ वाढविण्याचे काम भाजपने केले. पालिकेत पावलापावलावर एकमेकांना पद्धतशिरपणे कोलदांडा घालण्याचे काम हे दोन्ही पक्ष करतात. त्यामुळे विरोधीपक्षांना कामच राहिले नाही. निवडणुकीच्या काळात पक्षातील काही नेते मंडळी नागपूर, बीड, मुंबई, पुणे या शहरांमध्ये प्रचारासाठी गेली होती. शिवसेनेचा प्रचार टाळण्याचा हा उत्तम मार्ग त्यांनी शोधून काढला. प्रचार केला नाही असा आरोप करण्यास वाव न देण्याचा हा प्रकार म्हणावा लागेल.

खैरेंच्या  या तक्रारीला आणखी एक राजकीय पदर असल्याचे जोरदार चर्चा आहे. दानवे विरोधात काम करतात अशी तक्रार निवडणूक काळातच करता आली असती; पण ती नंतर केली. कारण रावसाहब दानवे यांनी आपले स्थान मराठवाड्यात भक्कम करतांना पक्षातील विरोधकांची व्यवस्थित व्यवस्था करून ठेवल्याने आज मराठवाड्याचे नेते अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यातून त्यांची नजर मुख्यमंत्री पदावर आहे, यामुळे त्यांचे पंख छाटण्यासाठी खैरेंच्या मार्फत भाजपमधूनच ही खेळी खेळली गेली अशी ही चर्चा आहे. खैरेंच्या आरोपांचे उत्तर दानवेंनी दिले असते तर संशयाचे मळभ हटले असते; पण आजपर्यंत ते समोर आले नाही, त्यामुळे संशय वाढला आहे. निकालापूर्वी नव्या साठमारीला सुरूवात झाली. निकालानंतर काय ?


Web Title: Chandrakant Khaire's third angle of complaint!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.