chain snatching of a guy who speaks on the mobile phone in Aurangabad | मोबाईलवर बोलणाऱ्या तरुणाच्या गळ्यातील सोनसाखळी पळविली
मोबाईलवर बोलणाऱ्या तरुणाच्या गळ्यातील सोनसाखळी पळविली

ठळक मुद्देतरुणाने आरोपींच्या मोटारसायकलचा क्रमांक ओळखला होता. दोन्ही संशयित पसार आहेत

औरंगाबाद :  मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणाच्या गळ्यातील सुमारे पावणेअकरा ग्रॅमची सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी तोडून नेल्याची घटना ७ जून रोजी औरंगपुरा परिसरातील जिल्हा परिषद मैदानाजवळ घडली. याविषयी दुचाकीस्वार चोरट्यांविरोधात क्रांतीचौक पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

बारुदगरनाला येथील रहिवासी उमेश अंबादास लोखंडे (२९) हे खाजगी नोकरी करतात. ७ जून रोजी रात्री पाऊण वाजेच्या सुमारास जिल्हा परिषद मैदानावर ते मोबाईलवर बोलत उभे होते. यावेळी त्यांनी १ तोळा ८० मिली ग्रॅमची सोन्याची चेन गळ्यात घातलेली होती. त्यांच्या गळ्यातील चेन स्पष्टपणे दिसत होती. उमेश मोबाईलवर बोलण्यात मग्न असल्याचे पाहून दुचाकीस्वार चोरट्यांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसका देऊन तोडली. यानंतर तो पळत साथीदाराच्या दुचाकीकडे जाऊ लागला तेव्हा उमेशने त्याला पकडले. मात्र, यावेळी उमेशच्या हाताला झटका देऊन आणि खाली लोटून आरोपी साथीदाराच्या दुचाकीवर बसून पळून गेला. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी उमेश हे कामात व्यग्र असल्याने त्यांना पोलिसांत लगेच तक्रार करता आली नाही. दरम्यान, १३ जून रोजी त्यांनी क्रांतीचौक ठाण्यात फिर्याद दाखल केली. 

उमेश यांनी मात्र आरोपींच्या मोटारसायकलचा क्रमांक ओळखला होता. या क्रमांकाच्या आधारे क्रांतीचौक ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ आणि कर्मचाऱ्यांनी तपास करून मोटारसायकल मालक हनुमान सरवदे यांची चौकशी केली तेव्हा त्यांनी त्यांच्या मालकीची ही मोटारसायकल पवन अग्रवाल यास विकल्याचे सांगितले. मात्र पवन अग्रवाल याच्याकडे याविषयी अधिक चौकशी केली तेव्हा पवनने केवळ पाच हजार रुपयांसाठी नरेंद्र कागडा याच्याकडे ती मोटारसायकल तारण ठेवल्याचे सांगितले.  पोलीस नरेंद्र कागडा आणि अन्य संशयिताचा शोध घेत आहेत. दोन्ही संशयित पसार असून, ते अद्याप हाती लागले नसल्याचे सहायक निरीक्षक सूर्यतळ यांनी सांगितले. 

जिल्हा परिषद मैदानावर मद्यपींचा रात्रीस खेळ चाले
औरंगपुऱ्यातील जिल्हा परिषद मैदान रात्री बेवारस स्थितीत असते. रात्री सात वाजेनंतर तेथे मद्यपी दारूच्या बाटल्या घेऊन मद्य प्राशन करीत असतात. शिवाय परिसरातील विविध कोचिंग क्लासेस आणि वसतिगृहातील प्रेमीयुगुलांच्या भेटण्याचे ते ठिकाण झाले आहे. मध्य वस्तीतील हे निर्जन ठिकाण झाल्याचे दिसून येते.


Web Title: chain snatching of a guy who speaks on the mobile phone in Aurangabad
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.