निजाम राजवटीत मराठीच्या प्रचारासाठी सुरू झालेल्या ‘बलवंत’ची शताब्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 02:17 PM2019-08-01T14:17:58+5:302019-08-01T14:55:15+5:30

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १ ऑगस्ट १९२० सुरुवात

The centenary of 'Balwant Library'; which began with the promotion of Marathi in Nizam Era | निजाम राजवटीत मराठीच्या प्रचारासाठी सुरू झालेल्या ‘बलवंत’ची शताब्दी

निजाम राजवटीत मराठीच्या प्रचारासाठी सुरू झालेल्या ‘बलवंत’ची शताब्दी

googlenewsNext
ठळक मुद्देबलवंत वाचनालयाच्या शताब्दी वर्षास सुरुवातऔरंगाबाद शहरातील पहिले वाचनालय  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १ आॅगस्ट १९२० ला स्थापना

- रुचिका पालोदकर

औरंगाबाद : निजामी राजवटीमुळे शहराची मराठी संस्कृती ढासळतेय की काय, अशी परिस्थिती जवळपास १०० वर्षांपूर्वी निर्माण झाली होती. त्यामुळे निजामशाहीतही मराठी वाचन संस्कृती टिकून राहावी, मराठी वाचनाचा प्रचार आणि प्रसार होण्यासह भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ औरंगाबाद शहरात १ आॅगस्ट १९२० रोजी ‘बलवंत’ वाचनालय सुरू झाले. यंदा हे वाचनालय शताब्दी वर्षाकडे यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. 

संस्थेचे विद्यमान कोषाध्यक्ष डॉ. सुभाष झंवर आणि ग्रंथपाल आशा कोरान्ने यांनी सांगितले की, लक्ष्मणराव नेवासेकर, आनंदकृष्ण वाघमारे, वि. गो. कर्वे, गणपतराव वैद्य, विजयेंद्र काबरा, कृ. वि. भगूरकर, ज. प. मुळे, हनुमंतराव वैष्णव, के. टी. राजन, पु. बा. जोशी, प्र. का. भालेराव, द. र. वैद्य, रमणलाल बाकलीवाल, जुल्फेकार हुसैन या मंडळींच्या संकल्पनेनुसार त्या काळी औरंगाबाद शहरातील या पहिल्या-वहिल्या वाचनालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. या मंडळींसोबत अनेक ज्ञात, अज्ञात लोकांचे सहकार्य या वाचन चळवळीला हातभार लावणारे होते. 

सुरुवातीला शहरवासीयांसाठी वाचनालय हा कौतुकाचा विषय असला तरी ही गोष्ट अगदीच नावीन्यपूर्ण होती. त्यामुळे वाचकांना ग्रंथालयापर्यंत आणण्यासाठीही त्या काळात नवनवीन उपक्रम घेण्यात यायचे. साहित्यिकांच्या भेटी, पुस्तक प्रकाशन झाल्यावर पुस्तकावर आधारित कार्यक्रम, वाचन कार्यशाळा अशा कार्यक्रमांतून मग वाचक वर्ग जोडला जाऊ लागला आणि ग्रंथालयाचा विस्तार वाढत गेला. 

सध्या ज्या ठिकाणी हे वाचनालय आहे, त्याच ठिकाणी त्या काळात अगदी लहानशा जागेत वाचनालयाची सुरुवात झाली. वाचनालय नवीन असले तरी त्या काळीही ते साहित्य संपदेने अगदी संपन्न होते. ६००० पुस्तकांच्या सोबतीने तेव्हा ग्रंथालयाचा प्रवास सुरू झाला होता, तो आता ७२ हजार १३० पुस्तकांवर येऊन ठेपला आहे आणि आजही दिवसागणिक वाचनालय अधिकच साहित्यसंपन्न होण्याकडे वाटचाल करीत आहे. त्या काळातही प्रामुख्याने बालकांना वाचन चळवळीकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न होत होता. त्यामुळे सुरुवातीला ५० बालवाङ्मये वाचनालयात होती. आज ही संख्या ८,७५६ झाली आहे. आज बलवंत वाचनालयातील वाचकसंख्या १० हजारांपेक्षाही अधिक असून, त्यापैकी ३ हजार नियमित वाचक आहेत. 

वसंतराव नाईक, रफिक झकेरिया, ए. आर. अंतुले, विलासराव देशमुख, शिवाजी सावंत, ल. श. कुलकर्णी, वा. मा. जोशी यासारख्या अनेक दिग्गजांनी बलवंत वाचनालयाला भेट दिली आहे. विद्यमान अध्यक्ष बिपीनकुमार बाकलीवाल, कोषाध्यक्ष डॉ. सुभाष झंवर, चिटणीस एस. एम. बांगड यांच्या मार्गदर्शनाखाली काळानुसार वाचन संस्कृतीतील बदल स्वीकारून ग्रंथालयाची वाटचाल प्रभावीपणे सुरू आहे.

काळानुसार वाचन संस्कृती बदलत जात आहे. त्यामुळे बलवंत वाचनालयानेही हे बदल स्वीकारून वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक नवनवीन उपक्रम सुरू केले आहेत. या अंतर्गत शाळांमध्ये, कारागृहात मोफत पुस्तके देत आहोत. तसेच ‘पेरीफेरल लायब्ररी’ ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत बेरोजगार, वृद्ध मंडळींनी बलवंत वाचनालयातून मोफत पुस्तके घ्यायची, स्वतंत्र ग्रंथालय सुरू करून ही पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचवायची आणि ठराविक कालावधीने ती बदलून घ्यायची, अशी संकल्पना आहे. 

- डॉ. सुभाष झंवर

Web Title: The centenary of 'Balwant Library'; which began with the promotion of Marathi in Nizam Era

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.