CCTV cameras will be under examination | ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांच्या निगराणीत होतील परीक्षा
‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांच्या निगराणीत होतील परीक्षा

ठळक मुद्देसंस्थाचालकांच्या बैठकीत निर्णय : जिल्ह्यातील कॉपीमुक्तीसाठी एक पाऊल पुढे

औरंगाबाद : यापुढे दहावी आणि बारावीच्या परीक्षासीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली घेऊन संपूर्ण जिल्हा कॉपीमुक्त करण्याचा निर्णय शनिवारी शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या संस्थाचालकांच्या बैठकीत घेण्यात आला.
सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या सभागृहात शनिवारी दुपारी संपूर्ण जिल्हा कॉपीमुक्त करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी स.भु. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा उद्योजक राम भोगले, आमदार सतीश चव्हाण, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण, मानसिंग पवार, डॉ. सर्जेराव ठोंबरे, एस.पी. जवळकर, वाल्मीक सुरासे, एम.आर. सोनवणे आदींसह संस्थाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत काही उपद्रवी परीक्षा केंद्रे आणि केंद्र संचालक बदलण्याच्या निर्णयाला संस्थाचालकांनी उत्स्फूर्तपणे संमती दिली. यावेळी आमदार सतीश चव्हाण म्हणाले, शिक्षण विभागाचेही नियंत्रण महत्त्वाचे आहे. अनेक संस्था अशा आहेत जिथे पन्नास विद्यार्थी क्षमतेची सुविधा नाही; पण परीक्षेच्या काळात तिथे पाचशे विद्यार्थी दिसतात. शिक्षण विभागाने कारवाई केल्यास हे चित्र बदलता येईल. मात्र, कारवाईबाबत शिक्षण विभाग उदासीन आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी आम्ही सर्व सहकार्य करू, शिक्षण विभागानेही नियमांची अंमलबजावणी करावी, असेही चव्हाण म्हणाले.
यावेळी राम भोगले यांनी शंभर टक्के कॉपीमुक्तीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. मानसिंग पवार म्हणाले, विनाकारण अडचणी सांगू नका. संस्थाचालकांकडे बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक होत आहे. विद्यार्थी घडवणे, त्याला ज्ञान देण्याचे काम शिक्षण संस्थांचे आहे. सामाजिक परिणामांचाही विचार करायला हवा. वाल्मीक सुरासे म्हणाले, आम्ही कॉपी होऊ देणार नाही. मात्र, त्यासाठी प्रवेश प्रक्रियेला देखील आळा घालायला हवा. वर्षभर शाळेत न येणारे अनेक विद्यार्थी ऐनवेळी परीक्षेला दिसतात.
शेवटी शिक्षणाधिकारी चव्हाण यांनी सांगितले की, आम्ही प्रशासनाच्या काही चुका असतील, तर त्या स्वीकारतो. मात्र, येणाºया परीक्षेपासून कॉपीमुक्त अभियान कडकपणे राबविण्यात येईल. सर्व केंद्रांवर ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे असतील. आक्षेपार्ह परीक्षा केंद्र आणि केंद्र संचालक बदलण्यात येतील.

परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात ही सर्वांची जबाबदारी आहे. शिक्षक, संस्थाचालक आणि शिक्षण विभागाने ठरवले आणि योग्य वेळी कारवाई केली, तरच कॉपीमुक्त परीक्षा होऊ शकतील. यास सर्व संस्थाचालकांनी पाठिंबा दिला आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश देणाºया संस्थांवरही शिक्षण विभागामार्फत कारवाई केली जाईल.
-शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण


Web Title: CCTV cameras will be under examination
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.